रात्रीचे जेवण झाल्यावर आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्या बघताना एका बातमीवर तो थबकला. मोरोक्कोच्या एका महिलेने एकाचवेळी नऊ बालकांना जन्म दिला यावर विश्वासच बसेना; म्हणून वेगवेगळ्या वाहिन्यांवर त्याने पुन:पुन्हा तीच बातमी पाहिली. खरीच होती ती!  त्याचे विचारचक्र  वेगाने फिरू लागले. देशप्रमुखाने लोकसंख्या नियंत्रणाचा मुद्दा राष्ट्रीय नीतीत समाविष्ट केल्यानंतर मोठ्या आनंदाने कुटुंब कल्याण कार्यक्रमाच्या समन्वयक म्हणून रुजू झालेल्या त्याला, ही बातमी म्हणजे मोठे संकट वाटून गेले. सकाळी तो कार्यालयात पोहोचला तेव्हा फलकावर असलेल्या बोधचिन्हाचा त्रिकोण त्याला नऊ कोनी चांदणीसारखा दिसू लागला. काहीही झाले तरी असला संसर्ग आपल्या देशात पसरायला नको. नाही तर आपल्या कार्यक्र माचे बारा वाजायचे. असल्या शक्तिशाली शुक्राचार्यांना वेळीच ओळखून ठेचायला हवे, पण ओळखणार तरी कसे या प्रश्नावर तो थबकला. असले लोण इकडे पसरले तर हाहाकार उडेल या भीतीनेच त्याला कं प सुटला. सध्या नवनव्या कल्पनांना सत्तेकडून प्राधान्य मिळत असल्याने आपल्यालाही काहीतरी सुचायलाच हवे यावर त्याचा मेंदू काम करू लागला. सोनोग्राफीचे व गर्भपाताचे नियम बदलायला हवे. हे सुचताच त्याला थोडी तरतरी आली. सरकारच्या कल्याण कार्यक्र माला बळ मिळावे म्हणून अनेक कायदे के ले गेले. तीन अपत्ये असल्यास निवडणुकीसाठी अपात्र हा त्यातलाच एक. पण एकाचवेळी नऊ जीव जन्माला येण्याचे प्रकार वाढले तर बोजा वाढणार ना! त्यांच्यासाठी वेगळे व मोठे रेशनकार्ड तयार करा, मालमत्ता पत्रिके तले रकाने वाढवा… वाघांचे एकवेळ ठीक आहे, पण माणसांची अशी खाणाऱ्यांची तोंडे वाढत गेली तर देश संकटात येणारच ना! आणि इतकी मुले जन्माला येऊ लागल्यावर त्यांची नावे तरी काय ठेवायची? असा विचार मनात येताच त्याला लालू आठवले. बिहारच्या निवडणुकीत त्यावरून झालेला गदारोळही आठवला व हसू आले. काहीही झाले तरी अशा बातम्या सत्तेच्या मागे ताकदीने उभ्या असलेल्या परिवाराच्या दृष्टीस पडायला नको. त्यातल्या अनेकांना तर  ‘दहा मुले’ हे ध्येय वाटते. त्यातल्या लोकांना हे कळाले तर न जाणे उद्या कुणाला तरी ते मोरोक्कोला पाठवतील व ‘अभ्यास’ करून या म्हणतील. एकदा का असे झाले तर सरकारची नीती खड्डयात गेलीच म्हणून समजा. हा विचार मनात येताच त्याचे मन खट्टू झाले. नीतीच्या अंमलबजावणीबाबत कठोर असलेले देशप्रमुख असल्या दबावाला बळी पडणार नाही याची खात्री पटताच तो हे रोखण्यासाठी आणखी काही नवे उपाय सुचतात का यावर विचार करू लागला. तरीही त्याचे लक्ष लागेना! त्याच्या टेबलासमोर टांगलेल्या सुखी कुटुंबाच्या फलकात त्याला पुन्हा दोन ऐवजी नऊ मुले दिसू लागली. घाबरून त्याने चष्मा पुसला. दुसरीकडे लक्ष वळावे म्हणून त्याने नुकतेच टेबलावर आणून ठेवलेले जन्मदराचे रजिस्टर उघडून बघितले तर तो २४ तासात तीन टक्क्यांनी वाढलेला दिसला. ते बघून त्याला घेरीच याची बाकी राहिली. काही नाही, असल्या माहितीचा प्रसार रोखणे हाच यावरचा जालीम उपाय – पण तो माध्यमांनी पाळला तरी नवमाध्यमे काय करतील? मग  यापुढे अशा बातम्या ‘फॉरवर्ड’ करताना, ‘कुटुंबनियोजन हीच देशभक्ती’ या २०१९च्या लालकिल्ल्यावरील भाषणाचे ध्वनिचित्रमुद्रणही सक्तीने  फॉरवर्ड करावे लागेल, अशी सूचना आता करावी काय?