15 December 2018

News Flash

सबलीकरणाची शंभर वर्षे..

आज चिंतूला जरा लवकरच जाग आली, पण तो अंथरुणातच लोळत पडला.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

आज चिंतूला जरा लवकरच जाग आली, पण तो अंथरुणातच लोळत पडला. नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरातून भांडय़ांचा आवाज येण्याची वाट पाहून कंटाळलेला चिंतू अखेर उठला. बळेबळेच हसतमुखाने स्वयंपाकघराकडे गेला आणि त्याचे डोळे विस्फारले. स्वयंपाकघरात गाण्याचे सूर ऐकू येत होते. चिंतू घाबरला. तसाच मागे वळला. सवयीप्रमाणे मोबाइल हातात घेऊन त्याने व्हॉट्सअ‍ॅप उघडले. ‘स्वत:ची काळजी घ्या. घाबरू नका, शक्यतो शांत राहा, ईश्वर तुमच्या पाठीशी आहे.’ तो संदेश पाहून चिंतूला आठवले, आज ८ मार्च. त्याने घाईघाईने तो संदेश बंद केला. तोवर पुन्हा मोबाइलची घंटी वाजली. नवा संदेश हजर झाला होता. ‘आमच्यासारख्या वाघांची शेळी बनविणाऱ्या महिलावर्गास महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा’.. तो संदेशही डिलीट करून तो किचनमध्ये गेला. बायको त्याच्याकडे पाहून गोड हसत होती. आजचा दिवस काही वेगळाच आहे, अशी त्याची खात्रीही पटली आणि त्यानेही मस्त हसून बायकोला प्रतिसाद दिला. पण लगेचच तो मनात घाबरला. सावधपणे आजच्या दिवसाला सामोरे जावे, असे स्वत:शीच ठरवून त्याने मोबाइल लेंग्याच्या खिशात लपविला, तेवढय़ात पुन्हा नव्या संदेशाची घंटी वाजलीच! मित्रांकडून आलेल्या अशा कोणत्याही संदेशावर आज कोणतीच प्रतिक्रिया द्यायची नाही, असा त्याने निश्चय केला.  त्याने काही क्षण विचार केला आणि त्याची बोटे भराभर चालू लागली. ‘समस्त महिलांना आजच्या महिलादिनी शुभेच्छा.. महिलांच्या हक्कांसाठी, महिला सबलीकरणासाठी शंभर वर्षांहून अधिक काळ जगभर सुरू असलेल्या तुमच्या लढय़ात, आम्ही तुमच्यासोबत आहोत. यापुढील कित्येक वर्षे ही लढाई अशीच सुरू राहो आणि पुढील अनेक वर्षे महिला सक्षमीकरणाच्या लढय़ाचा सन्मान म्हणून साजरा केला जाणारा हा दिवस यापुढेही असाच वर्षांनुवर्षे जगभर साजरा होत राहो.  स्त्रीशक्तीच्या सन्मानार्थ साजरा केल्या जाणाऱ्या आजच्या दिवसाच्या निमित्ताने, पुन्हा एकदा महिलांच्या हक्कांचा गजर जगभर घुमू दे.. महिलांना पुरुषांच्या बरोबरीने सामाजिक स्थान मिळाले पाहिजे, यासाठी यापुढेही कित्येक वर्षे लढायची शक्ती महिलांच्या अंगी यावी, याकरिता आम्ही त्यांच्यासोबत आहोत. महिलांचे सबलीकरण होणे गरजेचे आहे, कारण सशक्त महिला आपल्यावरील अन्यायाविरुद्ध प्रखर लढा देऊ  शकेल. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी महिलांचे सबलीकरण गरजेचेच आहे..’ एवढी वाक्ये टाइप करून झाल्यावर चिंतूने पुन्हा एकदा सारा मजकूर वाचून काढला. ‘महिला सबलीकरणाच्या आणि महिलांच्या हक्कांच्या लढय़ाची शंभर वर्षे’ या विषयावर आणखीही काही तरी लिहावे, असा एक विचारही त्याच्या मनात चमकून गेला, पण त्याची त्यालाच लाज वाटली. आपल्या हक्कांसाठी ज्या जगात महिलांना शेकडो वर्षे जगभर लढा द्यावा लागतो आणि तेच जग त्या लढय़ाचा सन्मान करते.. ही लढाई कधी संपणार, या विचाराने चिंतू खंतावला. त्याने मोबाइलवरचे सारे संदेश पुरते डिलीट केले, तो किचनमध्ये गेला. बायको हळूच थँक्यू म्हणाली आणि चिंतू खळखळून हसला..

First Published on March 9, 2018 2:20 am

Web Title: international womens day 10