03 June 2020

News Flash

कोण कर्ता, कोण करविता..

राज्यपालपद ही राजकारणातील निवृत्तांच्या निवास व पुनर्वसनाची सोय आहे

एकीकडे उभा देश सातत्याने पंतप्रधानांची ‘मन की बात’ ऐकत असताना, राज्यांचे विश्वस्त म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या राज्यपालांना मात्र, ‘दिल की बात’ व्यक्त करण्यासाठी अगतिकपणे दिल्लीकडे पाहावे लागते यासारखी क्लेशकारक गोष्ट दुसरी कोणतीच असू शकत नाही. जम्मू काश्मीरचे बेधडक राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आपली ही ‘दिल की बात’ बोलून दाखविली; पण अशा बोलण्याने दिल्लीश्वर नाराज तर होणार नाहीत ना, याचे भय तेव्हाही त्यांच्या मनातून बाहेर डोकावलेच. राज्याच्या राजधानीच्या शहरांतील सर्वात रम्य, आलिशान आणि सुखवस्तू वस्तीच्या कुशीतील भव्य प्रासादातील निवास, दिमतीला विनम्र नोकरचाकर, सुखसुविधांची रेलचेल यांमुळे कोणासही हेवा वाटावा अशा या राज्यपालपदावरील व्यक्तींच्या डोक्यावरील मुकुटही काटेरीच असतो हेच गुपित जणू सत्यपाल मलिक यांनी उघड केले. उमेदीची उभी हयात सक्रिय सत्ताकारणातील सुखे उपभोगल्यानंतर त्या कामगिरीची बक्षिसी म्हणून उतारवयातील, निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी बहाल करण्यात आलेले पद म्हणजे राज्यपालपद असा समज असलेल्या सर्वसामान्य समाजाच्या समजुतींचा फुगा मलिक यांनी आपल्या स्पष्ट विचारांच्या टाचणीने फोडून टाकला हे एका परीने बरेच झाले. लोकांना राज्यपालपदाची सुखे दिसतात, पण त्या पदावरील व्यक्तीला काय काय भोगावे लागते याची कल्पना अन्यथा कधी कोणासच आली नसती. राज्यपालपद ही राजकारणातील निवृत्तांच्या निवास व पुनर्वसनाची सोय आहे, असे परखड विचार पूर्वी एका माजी पंतप्रधानांनी व्यक्त केले होते. अनेक राज्यांमध्ये या पदावर बसणाऱ्यांकडे पाहून तर जनतेची तशी खात्रीदेखील होत असे. आता मात्र सत्यपाल मलिक यांनी हा गैरसमजाचा पडदा दूर केला आहे. राज्यपाल हा केवळ रबर स्टॅम्प असतो, असाही एक समज नाहक रूढ झाला होता. ‘‘आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त केल्यास दिल्लीतील कुणाच्या भावना दुखावणार तर नाहीत ना, याची सतत भीती असते,’’ असे सांगून मलिक यांनी सामान्य जनतेचा तो समज मात्र जपला आहे. एकंदरीत, राज्यपालपद हे काटेरी गुलाबासारखे असते असे आता समजावयास हरकत नाही. दुरून मोहक दिसणाऱ्या या फुलास उमलण्यासाठी काटेरी फांदीतून उभरून यावे लागते, हेच खरे! राज्यपाल हे दुर्बल पद आहे, हे मलिक यांचे विधान म्हणजे राजकारणातील उतरत्या टप्प्यावरील व्यक्तीच्या व्यथेचे शब्दरूप आहे. केवळ उतारवयातील आरोग्यविषयक गरजा भागविण्याची आणि विश्रांतीची सरकारी सोय म्हणजे राज्यपालपद या परंपरागत गैरसमजातून समाजाने बाहेर यावे यासाठी मलिक यांची ही ‘दिल की बात’ म्हणजे झणझणीत अंजनच आहे. तसेही, सरकार बदलले की पहिल्या राज्यपालाची गच्छन्ती आणि नव्याची नियुक्ती अशीही एक प्रथा असल्याने, राजभवने म्हणजे राजकारणाचा आखाडा असतो असाही एक समज समाजात रूढ झालेला असतो. आज आपल्या मनातील खंत बोलून दाखवत या पदावरील व्यक्तीची व्यथा मांडणाऱ्या मलिक यांच्याविषयीही असेच काहीसे झाले होते. पण या पदावरील व्यक्ती दुर्बल असल्याचे ते स्वत:च सांगत असल्यामुळे, असे समज पक्के होणारे कधी काही घडलेच, तर राज्यपाल हा केवळ ‘निमित्तमात्र’ असतो, कर्ता-करविता आणखी दुसराच कुणी असतो, हे आता आपणास कळले असेलच! मग तो कर्ता म्हणजे दिल्लीश्वर हेसुद्धा सत्यपाल मलिक यांनीच सांगावयास हवे का?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2019 12:09 am

Web Title: jammu and kashmir governor satyapal malik express anger zws 70
Next Stories
1 असाध्य ते साध्य, करिता सायास..
2 कोणता झेंडा घेऊ हाती?
3 हीच ती वेळ आहे..
Just Now!
X