28 May 2020

News Flash

भाषिक प्रयोगाचे बळी

आमदारपुत्राच्या वाहनाला, त्यातही रेंज रोव्हरसारख्या गाडीला मागे टाकून पुढे जायचे हा सामाजिक गुन्हा आहे.

बिहारमध्ये सत्ताधारी संयुक्त जनता दलाच्या आमदार मनोरमा देवी यांचे सुपुत्र व भावी नेते रॉकी यादव यांनी १९ वर्षीय विद्यार्थी आदित्य सचदेव यास गोळ्या घालून ठार मारले, ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, तमाम राजकीय नेत्यांना त्यामुळे हार्दिक वेदना झाल्या आहेत, यात काही शंका नाही. भारतीय जनता पक्षाच्या बिहारमधील नेत्यांना, ते सत्ताधारी नसल्याने, या घटनेमुळे जरा जास्त दु:ख होणे स्वाभाविकच आहे. त्यामुळे त्यांना बिहारमध्ये जंगलराज परतल्याचा आरोप केला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी तेथे कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आश्वासन दिले होते, परंतु गेल्या दोन महिन्यांत तेथे हत्येच्या तब्बल ५७८ घटना घडल्या. गेल्या एका महिन्यातच हत्या आणि अपहरणाच्या ३०० हून अधिक घटना घडल्या. हे पाहून अनेकांना लालूराजचीच आठवण आली असेल, परंतु मा. रॉकी यादव यांनी केलेली हत्या आणि या घटना यांत एक मूलभूत फरक आहे. तो समजून घेण्यासाठी ती घटना सकारात्मकपणे समजून घेणे आवश्यक आहे. रॉकी यादव हे त्या दिवशी रेंज रोव्हर गाडीतून चालले होते. त्याच रस्त्यावरून आदित्य हा मित्रांसह स्विफ्ट कारमधून चालला होता, परंतु त्यास अवदसा आठवली व तो रॉकी यांच्या गाडीला मागे टाकून पुढे गेला. हा मोठाच गुन्हा आहे. आमदारपुत्राच्या वाहनाला, त्यातही रेंज रोव्हरसारख्या गाडीला मागे टाकून पुढे जायचे हा सामाजिक गुन्हा आहे. त्यामुळेच रॉकी यांनी नियमानुसार त्यास गाडीतून खाली उतरवून मारहाण केली. त्यात ‘चुकून’ आदित्यला गोळी लागली. त्याच्या मृत्यूबद्दल सहवेदना असली, तरी सामाजिक कायद्याच्या दृष्टीने त्याने चूकच केली होती. नेते, त्यांची मुले, त्यांचे चमचे यांच्यापुढे सर्वसामान्यांनी जाणे ही थोरचूकच आहे. नेत्यांच्या पुढे व गाढवाच्या मागे कधीही जायचे नसते, हे सामान्यज्ञानही त्या आदित्यला नव्हते, याला आमदारपुत्र काय करणार? वस्तुत: या लोकशाही देशामध्ये जे जे सत्तेच्या सिंहासनाजवळ आहेत, त्यांच्या नादी कोणीही लागायचे नाही, असा कडक कायदाच करणे गरजेचे आहे. त्याशिवाय अशा घटना टळणार नाहीत. सत्तेच्या जवळ असणारांसाठी वेगळा कायदा करण्याची आवश्यकता नाही. सगळेच कायदे त्यांच्यासाठी असतात. तेव्हा आदित्यहत्या प्रकरणातून मा. रॉकी यादव पुराव्याअभावी निदरेष सुटले व त्याला न्याय म्हटले गेले, तर तेही प्रथेनुसार योग्यच. तेव्हा या घटनेबद्दल उगाच जनतागळे काढण्यात अर्थ नाही. परवा कल्याण स्थानकात भाजपचे नेताजी, खासदार ए. टी. तथा नाना पाटील यांनी त्यांची रेल्वे गाडी चुकल्यानंतर तब्बल ५० मिनिटे राडा घातला, रेल्वे अधिकाऱ्यांना अर्वाच्य शिवीगाळ केली म्हणून बातम्या छापल्या जात आहेत. तोही त्या बातमीदाराचा अडाणीपणाच म्हणावयास हवे. वस्तुत: तेथे कोणा रेल्वे अधिकाऱ्याचा ‘आदित्य’ झाला नाही, म्हणून त्यांचे सत्कारवृत्त प्रसिद्ध करावयास हवे होते. त्याऐवजी त्यांच्यावर टीका करणे हा शुद्ध राजद्रोह झाला. नेत्यांना लोकसेवक किंवा प्रधानमंत्र्यांना प्रधानसेवक असे म्हणणे हा केवळ भाषिक प्रयोग आहे. त्यावर विश्वास ठेवण्याचा गाढवपणा सामान्यांनी करू नये हे या प्रकरणातून तरी सर्वानी ध्यानी घ्यावे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2016 3:54 am

Web Title: jdu leader manorama devis son on the run after shooting youth on road in gaya father held gaya
Next Stories
1 गोवंशप्रतिपालकांचा विजय
2 राज्याश्रम हवा!
3 सिनेमा आणि सर्कस..
Just Now!
X