14 December 2017

News Flash

बिबर फीवर..

आपणा मराठी माणसांना कसलं कौतुकच नाही.

लोकसत्ता टीम | Updated: May 12, 2017 4:32 AM

आपणा मराठी माणसांना कसलं कौतुकच नाही. जगभरातील तरुणाईच्या गळ्यातला ताईत आणि कोटय़वधी फॉलोअर्स असलेला कॅनडाचा पॉप सिंगर जस्टिन बिबर मुद्दाम मुंबईत आला आणि तब्बल दोन तास त्याने युवानेते आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा केली. यासाठी उभ्या दुनियेतील तरुणाई आज आदित्य ठाकरेंचा हेवा करीत असताना, आपण मात्र आदित्य दोन तास काय बोलले असतील, चर्चेत काय ठरले असेल अशा विचारांचा कीस पाडत बसलो आहोत. मराठी माणूस कितीही मोठा झाला तरी मानसिकदृष्टय़ा तो मध्यमवर्गीयच असतो, याचा हा सबळ पुरावा! याच कारणामुळे, मराठी माणूस मोठा व्हावा, त्याला मानसन्मान मिळावा म्हणून ठाकरे घराण्याच्या पिढय़ांनी स्वत:ची आयुष्ये झोकून दिली. आदित्य हे याच परंपरेचे चौथ्या पिढीचे वारस. ते जेमतेम सहा वर्षांचे होते, तेव्हा ते पॉपस्टार मायकेल जॅक्सनच्या अंगाखांद्यावरही खेळले होते असे म्हणतात. मायकेल जॅक्सन मुंबईत आला तेव्हा ‘मातोश्री’वर गेला होता हे आपल्याला अजूनही आठवत असेलच! तेव्हाही, मराठी माणसाच्या उत्कर्षांसाठीच ठाकरे घराण्याच्या तिसऱ्या पिढीने मायकेलला मुंबईत आणले होते आणि मराठी माणसाच्या मनातील उद्योगाची स्वप्ने उत्तुंग व्हावीत म्हणून झटणाऱ्या शिवउद्योग सेनेसाठी मायकेलची पावले मुंबईत थिरकली होती. मातोश्रीच्या मातीवर उमटलेल्या मायकेलच्या पाऊलखुणा अनुभवलेल्या आदित्यला आज वीस वर्षांनंतर बिबरची भुरळ पडावी याचे कौतुक करण्याऐवजी, आम्ही उगीचच राज्यापुढील समस्यांचाच कीस पाडत बसलो. शेतकरी संकटात असताना एका विदेशी गायकावर करोडोंची उधळण करणे योग्य आहे का, असा शेलका मध्यमवर्गीय मराठी सवालही समाजमाध्यमांवर उमटून गेला. शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा खणखणीत इशारा आदित्यच्या बाबांनी दिला आहे, हे खरे आहेच, पण त्यांनी सतत कर्जमुक्तीचाच राग आळवत बसले पाहिजे ही मध्यमवर्गीय मराठी धारणा बाजूला ठेवली पाहिजे. त्यांनाही वैयक्तिक आयुष्य असते, आवडीनिवडी असतात आणि समाजासाठी त्याग करताना विरंगुळ्याचे चार क्षण स्वत:साठी वेगळे काढावेत असे त्यांनाही वाटत असते, हे आपण लक्षातच घेत नाही. आदित्य ठाकरे यांनी जस्टिन बिबरसोबत ज्या अर्थी दोन तास चर्चा केली, त्या अर्थी, मराठी माणसाच्या उत्कर्षांसाठी, राज्यापुढील समस्या सोडविण्यासाठी दोघे मिळून काही करू शकतो का, यावरही विचारविनिमय झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. बंद दरवाजाआडच्या चर्चेचे आपणा मराठी माणसाला फारच कुतूहल असते.  कुणी सांगावे, आदित्य आणि जस्टिनच्या भेटीत मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी एकत्र काम करण्याचा निर्णयही झाला असेल.. मायकेल जॅक्सन मुंबईत मराठी माणसाच्या भल्यासाठीच नाचला होता आणि म्हणूनच मातोश्रीवर त्याच्यासाठी लाल गालिचा अंथरला गेला होता, याचा विसर पडून कसे चालेल?

 

First Published on May 12, 2017 4:32 am

Web Title: justin bieber aditya thackeray michael jackson raj thackeray