ठिकाण कुठलं ते नीट कळत नव्हतं; पण बऱ्याच मराठी वृत्तवाहिन्यांवर अगदी महत्त्वाच्या नेत्याच्या प्रचारसभेचं थेट प्रक्षेपण दाखवलं जात असतानाच, त्या नेत्यानं आज कुठला फेटा धारण केला आहे, हे प्रेक्षकांना दिसूच नये अशा बेतानं ब्रेकिंग न्यूजच्या पट्टय़ा सुरू झाल्या : ‘कडकनाथ म्हणून ब्रॉयलरची विक्री’, ‘पोलिसांनी उघड केला प्रकार’, ‘अमुकतमुक जिल्हय़ातील घटना’,  ‘केसांचा कलप कोंबडीला’, ‘हेअरडाय पाकिटांसह दोघांना अटक’ – या वाक्यांमधून तयार होणारी बातमी म्हणा, गोष्ट म्हणा, कहाणी म्हणा- इथं जितक्या वाचकांना जितक्या वेळात समजली असेल त्याहून जास्त संख्येनं वृत्तवाहिन्यांच्या प्रेक्षकांना त्याहून कमी वेळात सारं सारं समजलं होतं आणि त्यांच्यापैकी काही जण चित्रवाणी संचाकडे खदिरांगारासारख्या डोळ्यांनी पाहून पुटपुटू किंवा ओरडू लागले होते : ‘‘तुडवले पाहिजेत साल्यांना.. ब्रॉयलर कोंबडी आधीच महाग आणि हे तिलाही केसांचा कलप लावून काळी करून, कडकनाथ कोंबडी म्हणून आणखी महाग विकताहेत.. तुडवले पाहिजेत हरामखोरांना..’’   हाच, नेमका हाच ‘तुडवले पाहिजेत..  ना’चा तणावहारक तीन शब्दी मंत्र आता इन्स्पेक्टर ससाणेसुद्धा (आणखी सामिष अपशब्दांसह) जपू लागले होते. वृत्तवाहिन्यांच्याच निमंत्रणावरून घटनास्थळी पोहोचून, जिथल्या तिथे कॅमेऱ्यांसमोरच मुद्देमाल – केसांची लावण्याच्या काळ्या रंगांची पाकिटं – कॅमेऱ्यांत दिसेल अशा कोनातून  ‘बाइट’सुद्धा देऊन झाला होता. पकडलेल्या दोघांचं काय करायचं हा प्रश्न आता समोरच्या टेबलापेक्षाही मोठ्ठा ‘आ’ वासून इन्स्पेक्टर ससाणेंपुढे होता.. कुठली कलमं लावायची या दोघांवर? प्राणी-छळ तर नक्की; पण ग्राहकांची फसवणूक? की खाद्यपदार्थ भेसळ प्रतिबंधक कायदा? नाही, नको. ससाणेसाहेबांना कोंबडय़ांचं हे प्रकरण उगाच अन्न व औषध प्रशासन वगैरे खात्यांकडे जाऊ  नये; शक्यतो आपल्याच टेबलावर निपटून जावं, असं वाटत होतं. त्यातच पकडलेल्या बाबू आणि बाळूंपैकी बाबू लई बाराचा होता. मार खाल्ल्यानंतरही सारखा म्हणत होता, ‘‘साहेब, तुम्ही नाय का कलप लावत? लावताय की! मंग त्या कारागिरावर गुन्ना होतो का? ’’ आपण पुरते फसलो, प्रकरण आपल्या हातनं जाणार हे ससाणेसाहेबांना कळून चुकलं अस्तानाच एका कुठल्या तरी खरेदी-विक्री संकेतस्थळावर पाटी झळकू लागली होती : ‘ आम्ही केवळ कडकनाथ जातीच्याच नव्हे तर सर्व काळ्या कोंबडय़ांची आणि काळ्या अंडय़ांची विक्री तातडीने; अनिश्चित काळासाठी थांबवत आहोत. नोव्हेंबर २०१६ पासून कडकनाथ कोंबडय़ांच्या आम्ही करत असलेल्या विक्रीला आमच्या ग्राहकांनी भरपूर पाठिंबा दिला; त्याबद्दल धन्यवाद! कडकनाथ कोंबडय़ांच्या ग्राहकांची गैरसोय होऊ  नये म्हणून आगाऊ  नोंदणी मात्र आम्ही सुरू ठेवली आहे. नोंदणीसाठी इथे क्लिक करा.’ या कहाण्या १ एप्रिल २०१८ रोजी घडल्या होत्या .. त्यांचा मूळ हस्तलिखित कागद आत्ता तरी काळाच दिसतो आहे. लोक म्हणतात की तो २०२२ पर्यंत पांढरा होऊ  शकतो.

Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray in nagpur
फडणवीस यांची उध्दव ठाकरेंवर टीका; म्हणाले, “त्यांना तोंडाच्या…”
children holidays, holidays, Parents worry,
सांदीत सापडलेले : सुट्टी!
jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
swanand kirkires article on kumar gandharv
आठवणींचा सराफा: गुरू तो सारिखा कोई नाही…