X

सिनेमा आणि सर्कस..

सिनेमा आणि सर्कस यांचे मिश्रण असलेले एक रसायन या निमित्ताने पाहावयास मिळाले..

राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या गंभीर चेहऱ्यावर उमटलेल्या स्मितरेषांमुळे नवी दिल्लीच्या अशोका हॉलला परवा हायसे वाटले असेल. गेल्या दीड-दोन वर्षांत असा हसरा मुखवटा दिल्लीने क्वचितच अनुभवला असावा. मंगळवारच्या चित्रपटांच्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात मात्र, राष्ट्रपती दिलखुलास दिसले. याच सोहळ्यात सैराटचं आणि महेश काळेचं कौतुक झालं. मराठी माणसाला आनंद वाटणारा तो क्षण असला, तरी हा सोहळा लक्षात राहील, तो मात्र कंगनाच्या अनवट उपस्थितीमुळेच!. वेशभूषेपासून वर्तणुकीपर्यंत सारी शिष्टाचाराची पांघरुणे घेऊन सजलेल्या या सोहळ्यात कंगना रनौट या अभिनेत्रीची नोंद वेगळ्या चष्म्यातून प्रत्येकाच्या नजरेने घेतली असणार. अलीकडे कंगना कमालीच्या चर्चेत आहे. अर्थात, बॉलीवूडमध्ये कुणाच्या खासगी आयुष्यात होणारे लहानसे खुट्टदेखील, तृतीयपर्णी पत्रांच्या गॉसिपोद्गारांचे मथळे होतच असतात. वडिलांचा विरोध डावलून बॉलीवूडमध्ये जाण्याचा निर्णय घेत पहिले बंड पुकारणाऱ्या कंगनाने अलीकडे अधिकच आक्रमकपणे बंडखोर रूप धारण केल्याने तिच्यावर विक्षिप्तपणाचा ठपकाही ठेवला जातोय. या पुरस्काराने तिला स्वबळावर यशाच्या शिखरावर नेऊन ठेवल्याने आता ती अधिकच बंडखोर होईल. मी जी कुणी आहे, ती माझी आहे, असे ठणकावणारी कंगना हे चित्रपटसृष्टीतील एक वेगळे रसायन आहे. ज्या जगात लांगूलचालन, लाळघोटेपणा आणि लाचारी हीच गुणवैशिष्टय़े मोठेपण मिळवण्यासाठी सिद्ध करावी लागतात, तेथे कंगना रनौट नावाची ही २९ वर्षांची युवती आपल्या कर्तृत्वावर अमाप विश्वास ठेवून संघर्ष करायला सिद्ध झाली आहे. हृतिक रोशन आणि अध्ययन सुमन यांच्यासोबतच्या खासगी संबंधांची चर्चा चघळून समाजाने आपल्या खासगी आयुष्याची सर्कस केली, अशी कंगनाची व्यथा आहे. सुदैवाने हे सारे पेलण्याची मानसिक तयारी आपण अगोदरच करून ठेवली असली, तरी ते धक्कादायकच होते, हे कंगनाचे वक्तव्य खरे तर सध्याच्या मुक्तिवादाचे मोहोळ माजविणाऱ्या जगाला अंतर्मुख करावयास लावणारे आहे. कारण बॉलीवूड हे आभासी विश्व असले, तरी त्यामध्ये वावरणारी व्यक्तिमत्त्वे वास्तवच असतात. ही माणसे पडद्यावरची कथानके रंगवत असली, तरी त्यांची आयुष्ये हीदेखील स्वतंत्र कथानके असतात. विक्षिप्त, चेटकीण अशा शेलक्या शब्दांची चिखलफेक झेलतानाही, आपल्या खासगी आयुष्यात सुरू झालेला हा संघर्ष पेलून त्याला सामोरे जायची तयारी दाखविणाऱ्या कंगनाचे आयुष्य हे असेच एक वेगळे कथानक आहे. या कथेचा परवा उलगडलेला एक पैलू चमकदारच होता. त्या पैलूने काही क्षण हसरे केले. सिनेमा आणि सर्कस यांचे मिश्रण असलेले एक रसायन या निमित्ताने पाहावयास मिळाले..

  • Tags: kangana-ranaut, national-film-awards, president-pranab-mukherjee, sairat movie,