18 January 2019

News Flash

‘सुबुद्धी-पीठां’साठी संभाव्य उमेदवार..

असहिष्णुता, धार्मिक तेढ वेळोवेळी डोके वर काढतच असतात.

उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक

‘भाजपनेते’ हा शिक्का अद्याप पुसला गेला नाही, अशा दोघा राज्यपालांना कुणी ‘सिक्युलर’ आदी शब्दांत हिणवणार तर नाही ना, अशी काळजी आता आम्हांस वाटू लागली आहे.. कासगंजमधील हिंसाचार हा ‘कलंक’ असल्याचे उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी म्हटले आहे. ‘सर्वच धर्म शांततेचा आणि सहिष्णुतेचा संदेश देतात’ असा साक्षात्कार राजस्थानचे राज्यपाल कल्याणसिंह यांना, अगदी परवाच झाला. दोन्ही राज्यांमध्ये भाजपची सरकारे आहेत; तेव्हा असहिष्णुता, धार्मिक तेढ वेळोवेळी डोके वर काढतच असतात. ‘पद्मावत’ चित्रपटाच्या प्रदर्शनाविरोधात करणी सेनेच्या गुंड-पुंडांचा नंगानाच तसा देशभरच, पण राजस्थानात सर्वाधिक होत राहिला; त्या वेळी कल्याणसिंह गप्प होते.. ते का? कारण अखेर कळले! ते असे की, गेला बराच काळ कल्याणसिंहांनी ऋग्वेद, भगवद्गीता, बायबल, कुराण, गुरू ग्रंथसाहिब, सत्यार्थप्रकाश अशा धार्मिक ग्रंथांचे वाचन करण्याचा सपाटा लावला होता! बाबरी मशीद पाडली गेली तेव्हा म्हणजे डिसेंबर १९९२ मध्ये कल्याणसिंह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यातून देशाचे राजकारण, समाजकारण ढवळून काढणारे रामायण घडले. कल्याणसिंह काही काळ भाजपपासून दुरावले, तरी स्वगृही परतलेच. मात्र वाजपेयी/अडवाणी यांच्या तालमीत शिकलेले कल्याणसिंह हे मोदी/शहा/आदित्यनाथ यांच्या युगात आपल्या गुरूंसारखेच ‘समृद्ध अडगळ’ ठरू लागले आणि त्यांची राजस्थानच्या राज्यपालपदावर वर्णी लागली. राजभवनाच्या तटबंदीत त्यांच्या वाचनाने आणि व्यासंगाने जोर घेतला. त्यातून परवाच त्यांना सर्व धर्म सहिष्णुता शिकवतात, असा साक्षात्कार झाला. कल्याणसिंह यांची निरीक्षणे, निष्कर्ष, निरूपणे समग्र स्वरूपात प्रकाशित करून त्यांचा उपयोग धर्म, देश आणि अखिल मानवजातीच्या विकासासाठी करून घेण्याचा मनोदय राजभवन सचिवालयाने बोलून दाखवला आहे. तिकडे राम नाईकही लखनऊच्या राजभवनातून असेच काहीसे निराळे बोलू लागलेत. कासगंजमधील बहुसंख्याक पुंडाईने ते व्यथित झाल्यासारखे दिसतात. राजभवनातील मंडळींनी सहसा काही बोलूच नये, असा संकेत आहे. निराळे वगैरे तर अजिबातच बोलू नये, असा जणू अलिखित नियम असल्यासारखे प्रकार अनेकदा घडले आहेत. मग अचानक कल्याणसिंह, राम नाईक आताच कसे काय बोलू लागले? पश्चातबुद्धी किंवा उपरती असे या प्रकाराचे वर्णन सरसकट केले जाईल; तर काही जणांना ही सुबुद्धी झाल्यासारखेही वाटेल. राजभवनाच्या आणि राज्यपालपदाच्या प्रतिष्ठेचा विचार करता, त्यास सुबुद्धीच म्हणायला हवे. पण एक पूर्णपणे वेगळा विचार होऊ लागल्यास काय बिघडेल? उपरती, सुबुद्धी किंवा पश्चातबुद्धी होणार असेल, तर किती तरी मंडळींना ताबडतोब राजभवनाचा रस्ता दाखविला पाहिजे. प्रवीण तोगडियांविषयी काय म्हणाल? बजरंग दलाचे विनय कटियार यांचेही वैचारिक पुनरुज्जीवन किंवा पुनर्वसन याच प्रकारे शक्य आहे. करणी सेनेचे ते कोण मुखिया.. त्यांचाही विचार व्हायला हरकत नाही. एकंदर  १९ राज्यांमध्ये सध्या भाजपची सरकारे आहेतच. राजभवने ही आपल्या नेत्यांसाठी राजकारणातून पूर्णत: बाहेर पडण्याआधीची सुबुद्धी-पीठे  ठरू शकतात, हे आता धुरिणांनी ओळखायला हवे. अशा नवीन ताज्या दमाच्या राज्यपालांचे  प्रबोधन होण्यासाठी नाईक-कल्याणसिंहांप्रमाणे पंचवीसेक वर्षे थांबायचीही गरज नाही!

First Published on January 31, 2018 1:45 am

Web Title: kasganj violence up governor ram naik