16 January 2019

News Flash

कायद्याचा आधार..

विलंबाने का होईना, कृपाशंकर सिंह यांना न्याय मिळाला.

खडतर राजकीय संघर्षांच्या वाटचालीतून ‘वपर्यंत’ पोहोचलेले काँग्रेसचे कृपाशंकर सिंह आणि पाठोपाठ त्यांच्या कुटुंबीयांनाही न्यायालयाने दोषमुक्त केले, ही राजकारणातील अनेक नेत्यांसाठी एक दिलासादायक बाब आहे.  गेल्या काही वर्षांत कृपाशंकर सिंह आणि त्यांच्या कुटुंबीयांना कोणत्या अन्यायदिव्याचा सामना करावा लागला, त्यांच्या राजकीय अस्तित्वाला काळानेच कसे आव्हान दिले आणि त्यातून तावूनसुलाखून बाहेर पडण्यासाठी कृपाशंकर सिंह यांना कशाकशाचा आधार घ्यावा लागला हे पाहिले, तर सध्याच्या काळातील ती एक सुरस राजकीय अग्निदिव्य कथा ठरेल. पण विलंबाने का होईना, कृपाशंकर सिंह यांना न्याय मिळाला. त्यांनी बेहिशेबी मालमत्ता गोळा केली, उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांहून अधिक माया जमविली, ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी आरक्षित भूखंडावर त्यांनी आपली साईप्रसाद इमारत उभी केली, अशा अनेक गुन्ह्य़ांचा ठपका ठेवून या नेत्याची कारकीर्द मलिन करण्याचा मोठा डाव उधळून लावण्यासाठी विद्यमान सरकारने कनवाळू होऊन त्यांना मदतीचा हात दिला. बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवरून त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यासाठी सरकारने परवानगी दिली असती, तर एक मोठे पातक सरकारच्या माथी बसले असते. ती परवानगी न दिल्याने कृपाशंकर सिंह दोषमुक्त झाले. एखाद्या प्रकरणातील मुख्य आरोपीच दोषमुक्त असेल, तर त्या प्रकरणातील सहआरोपी आरोपांचे ओझे माथ्यावर घेऊन खितपत पडणे हा घोर अन्याय असतो. आरोपपत्र दाखल करण्यास सरकारने परवानगी न दिल्यामुळे कायद्याच्या कसोटीवर त्यांच्यावरील आरोपपत्र टिकणार नाही हे स्पष्ट झाले आणि कृपाशंकर सिंह यांचा दोषमुक्तीचा मार्ग सुकर झाला. आणखी एक आनंदाची बाब म्हणजे, येत्या वर्षभरात देशात निवडणुका होऊ घातल्या असताना मुंबईतील उत्तर भारतीयांचा आवाज आता सिंह यांच्या रूपाने मुंबईत पुन्हा बुलंद होऊ शकतो. परप्रांतीयांच्या आक्रमणामुळे धास्तावलेला मराठी माणूस एका बाजूला एकवटलेला असताना, मुंबईतील उत्तर भारतीयांना एकत्र आणू शकणाऱ्या शक्तींचे संघटन ही आज एक राजकीय गरज आहे. आता कृपाशंकर सिंह यांना दोषमुक्त केल्याच्या पुण्याची फळे भाजपला मिळाली आणि त्या पक्षाची ही राजकीय गरज परस्पर भागली, तर तो योगायोग असला, तरी ऐतिहासिक असेल यात शंकाच नाही. कृपाशंकर सिंह हे भाजपमध्ये जाणार अशी कुजबुज गेल्या काही दिवसांत सुरू झाली आहे. पण भाजप हा एक पवित्र आणि वेगळ्या संस्कृतीचा पक्ष असल्याने प्रतिमा डागळलेल्या कोणासही पक्षाचे दरवाजे सहजासहजी उघडत नसतात. कृपाशंकर  यांना न्यायालयाने दोषमुक्त केलेले असल्याने, ते स्वच्छ असल्याचे सिद्ध झाले आहे. आता अशा कोणत्याही आरोपाचा साधा डागदेखील कारकीर्दीवर नसलेला आणि एका प्रादेशिक समुदायावर प्रभाव असलेला नेता पक्षात येऊ पाहात असेल, तर त्याचे स्वागत पक्षाने केले पाहिजेच, पण जनतेनेही अशा स्वच्छ चारित्र्याच्या नेत्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. कृपाशंकर  यांना आता उजळ माथ्याने राजकीय भविष्य घडविण्याची संधी मिळाली आहे. याबद्दल कायद्याचे आभार मानले पाहिजेत..

First Published on May 24, 2018 2:01 am

Web Title: kripashankar singh discharged in assets case