समोशात जोवर आलू राहील तोवर लालू यांचे शुभनाम राहील हे राजकीय जाहिरातगीत लालू यांच्यावरील खटल्यांना लागू होईल असे कोणास बरे वाटले होते? परंतु आपल्याकडील सर्वोच्च तपास यंत्रणा जी की पिंजऱ्यातला पोपट ऊर्फ सीबीआय, तिच्या कामाचा वेग पाहता जोवर समोशात आलू आणि बिहारात लालू राहतील, तोवर महामहीम लालूप्रसाद यादव यांच्यावरील चारा घोटाळ्याच्या आरोपांचा तपास चालू राहील, यात शंका नाही. लालूप्रसाद यांना चारा घोटाळ्यातील एका प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर झारखंड उच्च न्यायालयाने त्यांच्यावरील कट रचून घोटाळा केल्याचा आरोप फेटाळून लावला. न्यायालयाचे बरोबरच होते. एका नेत्याला एका घोटाळ्यासाठीही शिक्षा होणे हीच खरे तर मोठी बाब. त्यानंतर पुन्हा तशाच गुन्ह्य़ांसाठी पुन्हा नवा खटला भरा. त्याची सुनावणी करा. यात काळाचा किती अपव्यय होतो. न्यायालयापुढे का तेवढे एकच काम आहे? तेव्हा या न्यायालयाने लालूंवर आता वेगवेगळे खटले नका चालवू असा न्याय दिला. त्यावर सीबीआयने अपिलात जाण्याचे काहीच कारण नव्हते. पण तरीही सीबीआय सर्वोच्च न्यायालयात गेली. हीसुद्धा जगावेगळीच बाब आहे. त्यातून एक गोष्ट मात्र आता स्पष्ट झाली आहे, की मोदी सरकारच्या काळात सीबीआय पिंजऱ्यातला पोपट राहिलेली नाही. हा पोपट आता पिंजऱ्याबाहेर आला आहे. फक्त त्याला उडायचे कधी आणि मिठू मिठू करीत दांडीवर झुलत बसायचे कधी हे सांगावे लागते. सवय नाही उरली ना त्याची. त्यामुळेच अपिलात जायला सीबीआयला उशीर झाला. तर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना झापले. हे काही बरे नाही. अखेर सीबीआयलाही अनेक गोष्टींवर लक्ष ठेवावे लागते. खटले काही असे कधीही भरता येत नसतात. कुंडली मांडून, ग्रह-तारे-नक्षत्रांकडे नजर ठेवूनच ते न्यायधर्मकार्य करायचे असते. म्हणजे कधी निवडणूक आहे, नेता कोण आहे, तो आयुष्यभर वाल्याच राहील की त्याचा वाल्मीकी करता येईल, हे सर्व पाहायचे असते. बरे हे पाहण्यासाठी डोळे जरी पोपटाचे असले, तरी नजर पिंजरेवाल्यांकडूनच घ्यावी लागते ना. आता त्या नजरेत कधी लालू भरतात, कधी मायावती सुटतात.. त्याचा काही नेम नसतो. हे सर्व तपासून तपास करायचा तर त्यात कालापव्यय होणारच. पण हे सर्वोच्च न्यायालयास कोण सांगणार? त्यांनी आता मारे खालच्या न्यायालयास कालमर्यादा ठरवून देऊन प्रकरण निकाली काढण्यास सांगितले आहे. पण राजकीय नेत्यांचे खटले असे निकाली काढायचे, तर सीबीआयला कामाला लावावे लागणार. ते कसे होणार? पोपटाला पिंजऱ्याबाहेर काढायचे आणि त्याला पंखही द्यायचे हे कसे करणार? अशाने तुम्ही तर राजकारणच संपवायला निघाल..