22 October 2019

News Flash

असेही ‘सुशोभीकरण’..

एक काळ असा होता, जेव्हा शहरांच्या विद्रूपीकरणाबद्दल खुद्द राज्यपालांनी वारंवार नाराजी व्यक्त केली होती.

(संग्रहित छायाचित्र)

कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या आपल्या ब्रीदवाक्याशी इमान राखण्यासाठी पोलिसांकडून ज्या अफलातून योजना आखल्या जातात, त्याला तोड नाही. सध्या अशाच एका अभिनव योजनेचा राज्यात मोठा बोलबाला आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या गावात, महाराष्ट्राच्या उपराजधानीत नागपूर पोलिसांनी सुरू केलेल्या या उपक्रमामुळे अनेकांचे अनेक उद्देश सफल होणार यात शंका नाही. एक काळ असा होता, जेव्हा शहरांच्या विद्रूपीकरणाबद्दल खुद्द राज्यपालांनी वारंवार नाराजी व्यक्त केली होती. तेवढय़ासाठी कोर्टकचेऱ्यांचे खेटेही घातले. विद्रूपीकरणाविरुद्ध एक चळवळदेखील यातून जन्मास आली होती. त्याबाबत फारशी जनजागृती वगैरे झाली नसली, तरी शहरांच्या सुशोभीकरणासाठी त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अंदाजपत्रकातील काही रक्कम बाजूला काढून ठेवण्याची प्रथादेखील पडली होती. या तरतुदीतून चौकाचौकांमध्ये वाहतूक बेटे, कारंजी, बगीचे वगैरे निर्माण करून शहरे सजविण्याचे उपक्रमही कोठे कोठे राबविले जातात. नागपूर ही तर कल्पक नेत्यांची कर्मभूमी असल्याने या शहरातही अशा योजना आखल्या गेल्या असतील, यात शंका नाही. आता या सुशोभीकरणात पोलिसांच्या नव्या योजनेची भर पडणार असे दिसू लागले आहे. गुन्हेगारीच्या क्षेत्रात नागपूरचे स्थान अव्वल आहे, हे एव्हाना लपून राहिलेले नाही. नामचीन गुंड गुन्हे करून लपण्यासाठी नागपुरात आश्रयास येतात असा नागपूर पोलिसांचा संशय आहे. काही गुंडांवर पोलिसांकडून तडीपारीची कारवाई केली जाते. नागपूर हे अशा तडीपार गुंडांचे आश्रयस्थान असल्याचेही पोलिसांना वाटते. तर, अशा गुंडांना जनतेच्या मदतीने शोधून काढून त्यांच्या लपण्याच्या जागा बुजविण्यासाठी चौकांच्या सुशोभीकरणाची आगळी मोहीम नागपूर पोलिसांनी हाती घेतली आहे. तडीपार गुंडांची छायाचित्रे असलेले फलक चौकाचौकांत मिरविण्याचा निर्णय पोलिसांनी घेतल्याने, चौकांतील बगीचे, कारंजी, उद्याने अशा विरंगुळ्याच्या ठिकाणांनी सुशोभीकरणाच्या नव्या मिती प्राप्त होणार आहेत. शहरांच्या विद्रूपीकरणात अनधिकृत फलक, पोस्टरांचा मोठा वाटा असतो. बघता बघता नेता झालेल्यांच्या आयुष्यातील कोणत्याही प्रसंगाचा उत्सव साजरा करण्याचा हक्काचा उपाय म्हणून, चौकाचौकांत त्यांच्या अभिनंदन वा अभीष्टचिंतनाचे फलक लावणे हे अलीकडे समाज‘शास्त्र’ बनलेच आहे. पोलिसांनीच चौकाचौकांत तडीपारांची छायाचित्रे झळकविण्याचा निर्णय घेतल्याने, त्यापैकी काहींच्या आयुष्यातील अशा उत्सवांच्या निमित्ताने वेगळे फलक लावण्याचे ‘शुभेच्छुकां’चे खर्च वाचण्याची शक्यता आहे. तसेही, ‘तडीपारी’ आणि ‘राजकारण’ यांचे एकमेकांशी सूक्ष्म असे नाते असल्याचेही बोलले जात असते. स्वत:चे छायाचित्रांकित फलक चौकाचौकांतटांगून समाजमनात प्रतिमा रुजविणे हा तर नेता बनण्याच्या प्रक्रियेचा पहिला टप्पा! नागपूर पोलिसांच्या या मोहिमेतून अनेकांचे काम सोपे होऊ शकते. अशा अभिनव प्रसिद्धी योजना मुंबईसारख्या महानगरात पोलिसांनी राबविल्या, तर चौकांच्या सुशोभीकरणाच्या पारंपरिक योजनांची वा त्यासाठी वेगळी आर्थिक तरतूद करण्याची प्रशासनास गरजच राहणार नाही. उलट, असे काही करायचे ठरलेच, तर कदाचित नव्या चौकांचीच निर्मिती करावी लागेल अशी शक्यता संभवते.

First Published on July 4, 2019 12:09 am

Web Title: law and order in india mpg 94