News Flash

‘कमळ निरूपण’..

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. अर्थात संत साहित्यास स्थळाची बंधने नसतात, तशी काळाचीही बंधने नसतात.

(संग्रहित छायाचित्र)

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. अर्थात संत साहित्यास स्थळाची बंधने नसतात, तशी काळाचीही बंधने नसतात. आजच्या काळाशीही त्यांचे जवळचे नाते आढळते. म्हणूनच, प्रश्न पडले की संत साहित्याचा आधार घ्यावा आणि ते काळाच्या ताज्या घडीशी पडताळण्याचा प्रयत्न करावा. मग कोडी उकलतात आणि संतांच्या भविष्यवेधी दृष्टीचे कौतुक वाटू लागते. संतसाहित्याचे पारायण केवळ पुण्यसंचयासाठी नव्हे, तर आयुष्य घडविण्यासाठीही उपयुक्त असते. संतविचारांचे निरूपण हा कोणा एका वयोगटातील पिढीच्या श्रवणभक्तीचा विषय नसतो. संतविचारांचे अमृत संसाराच्या कोणत्याही क्षेत्राला संजीवनी देते. संतसाहित्यात थेट उपदेश नसतो. तो दृष्टान्तरूपात दडलेला असतो. ज्याने त्याकडे जसे पाहावे, तसा उपदेश त्यातून प्राप्त होत असतो. कधी एखाद्या गोष्टीतून, तर कधी एखाद्या अभंगातूनही समस्यांची उत्तरे सापडतात आणि स्वत:ची ओळख पटविणे सोपे होते.

आजकालच्या संभ्रमावस्थेत जगणाऱ्या जगाकडे पाहताना, आपण कोण आहोत, कोठे आहोत, आपल्या जगण्याचे नेमके ध्येय काय, अशा प्रश्नांवरील उत्तरांच्या शोधात स्वत:ची अवस्था गुरफटल्यागत होते. उत्तरे सापडण्याऐवजी नवे प्रश्न तयार होतात आणि संभ्रम अधिकच वाढतो. अशा वेळी, संतसाहित्याचा साकल्याने अभ्यास करावा.. अन्यथा, एखाद्या सुंदर तळ्याच्या तळाशी राहणाऱ्या आनंदी बेडकांसारखी अवस्था होते. त्या तळ्यात कमळे फुललेली असतात, कमळवेलींच्या कंदमुळांशी साचलेल्या चिखलात अनेक बेडकांचे समाधानी संसार फुललेले असतात. प्रभातीची कोवळी किरणे तळ्याच्या पाण्यावर पडू लागतात आणि मिटलेली कमलदले अलगद उमलू लागतात. याची चाहूल लागताच, भ्रमरांचे थवे उमलत्या कमळांभोवती घिरटय़ा घालू लागतात. त्यातील मकरंद चाखण्यासाठी स्पर्धा सुरू होते.. अवघे कमळवन गुंजारवाने भारून निघते.

तळ्याच्या तळाशी, कमळांच्या कंदमुळांनजीकच्या चिखलात वावरणाऱ्या बेडकांना याचे आश्चर्य वाटत असते. आपण कमळवनाचे ‘मूळनिवासी’ आहोत, तरी बाहेरून येणारे भ्रमरांचे थवे कमळांभोवती घिरटय़ा का घालतात, हे त्यांना कळत नसते. एक बुजुर्ग बेडूक याचे उत्तर शोधतो. कमळदलांत दडलेला मकरंद चाखण्यासाठी ही भृंगदळे जमा होतात, हे त्यांना कळते आणि कमळांच्या सहवासात असूनही आपल्याला मकरंदाची चव कशी समजली नाही, याचे त्यांना कोडे पडते.. मग काही बेडूक मकरंद चाखण्यासाठी निघतात. एक बुजुर्ग बेडूक म्हणतो, ‘त्या मकरंदाची चव आपण कधीच चाखलेली नाही. ती आपल्याला माहीतही नाही. त्यामुळे, आधी पोटभर चिखल खाऊन घ्यावा, अन्यथा उपाशी राहण्याचीच वेळ यायची!’.. बेडकांना ते पटते. भरपूर चिखल चाखून बेडूक कमळदलांतील मकरंदाच्या शोधासाठी बाहेर येतात, तोवर भ्रमरांनी सारा मकरंद संपविलेला असतो.. भ्रमरांच्या मूर्खपणास दूषणे देत सारे बेडूक पुन्हा कमळवनाच्या तळाशी, कमळकंदांशी असलेल्या चिखलात आनंदाने विहार करू लागतात. ‘आपल्या जगातच खरा आनंद आहे’ असेही स्वत:स समजावतात आणि कमळदलांभोवती घिरटय़ा घालणाऱ्या भ्रमरांकडे कुचेष्टेने पाहात बसतात..

..संतांनी या गोष्टीचे सुंदर दृष्टान्तात वर्णन केले आहे. महाराजा, ‘अभंग ज्ञानेश्वरी’च्या नवव्या अध्यायातील एका अभंगांत स्वामी स्वरूपानंद म्हणतात,

‘कमळाचा कंद

तळ्यामाजी असे,

तेथेचि तो वसे, बेडूक हि..

परि मकरंद सेवावा भ्रमरे,

बेडकासि उरे चिखल चि..’

.. बोला, पुंडलीऽक वरदाऽऽ हाऽरी विठ्ठल!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2019 12:02 am

Web Title: leader in maharashtra join bjp abn 97
Next Stories
1 अवघा परिसर व्हावा ‘गो’मय!
2 ‘बाबूशाही’ येता घरा..
3 जाऊ शब्दांचिया गावा..
Just Now!
X