रात्रीच्या नीरवसमयी शिवाजी पार्कातील एका कोपऱ्यात पुतळ्यांची बैठक सुरू होती. त्या गडद अंधारात त्या पुतळ्यांनाच एकमेकांना चेहरा नीट दिसत नव्हता, तर इतरांना काय दिसणार? कदाचित कोणालाही आपले तोंडही दिसू नये म्हणून त्यांनी मुद्दामच तो अंधाराचा पडदा अंगावर ओढला असावा. बैठकीचा विषयच तसा होता. सवाल अस्तित्वाचा होता. स्मृती तर केव्हाच धूसर झाल्या होत्या. आता उरल्या होत्या त्या केवळ प्रतिमा. ब्राँझमधल्या. पूर्णाकृती, अर्धाकृती पुतळ्यांतल्या प्रतिमा. त्या तरी आता शाबूत राहतील की नाही याच आशंकेने त्या पुतळ्यांच्या पोटात खड्डा पडला होता. खरे तर ते ज्यांचे होते ते कधीच या पंचमहाभूतांत विलीन झाले होते. पण जाताना ते विचार, कार्य, आदर्श असे काही तरी मागे ठेवूनच गेले होते. पुतळ्यांना त्याचेही काही वाटत नव्हते. ते अस्वस्थ होते ते काळजाच्या कुहरातील करुणेने. ही करुणा होती, त्या पुतळे उभारणाऱ्यांविषयीची, मूर्तिपूजक समाजाबद्दलची. विचार नेहमीच अमूर्त. शिवाय अवघडही. त्यांची पूजा करणे म्हणजे त्यांचे पालन करणे. ते सामान्यांस कसे जमावे? तेव्हा समोर हव्या असतात त्या सगुण मूर्तीच. त्यांच्या आरत्या ओवाळता येतात. हे पुतळ्यांना तसे नाही भावत. एका महामानवाने तर आपल्या अनुयायांना तसे बजावूनच ठेवले होते आधीपासून. ते गेल्यावर लोकांनी त्यांचेच पुतळे उभारले हा भाग वेगळा. आता असे सगळेच पुतळे संकटात असल्याची चाहूल त्या पुतळ्यांना लागली होती. सभा होती ती त्यावर विचारविनिमय करण्यासाठीच. एक पुतळा डोळ्यांवरचा चष्मा सावरत म्हणत होता, हे भयंकर आहे. तिकडे त्रिपुरारी पौर्णिमाच साजरी केली त्यांनी. पाडला लेनिनचा पुतळा. हे का बरे झाले? कोणाच्याही पुतळ्यामागे असतात विचार. ते अशाने रोखणार आहात का तुम्ही? हा वैचारिक हिंसेचाच प्रकार. दुसरा पुतळा त्यावर म्हणाला, मग काय उपोषण करणार का तुम्ही त्याविरोधात? पाडला तर पाडला. क्रूरकर्माच होता तो. भगतसिंगांना नायक वाटत असला तरी. आणि काय असतो अखेर पुतळ्यांचा उपयोग? त्यावर एक पुतळा विषण्ण हसला. म्हणाला, खरे आहे. तसाही हल्ली पुतळ्यांचा उपयोग कावळे आणि कबुतरांनाच होतो म्हणा. पुतळे पाडले काय आणि राहिले काय, काय फरक पडतो? तिसरा पुतळा आकाशात उंचावलेले बोट खाली घेत म्हणाला, ही तर आपली संस्कृतीच आहे, पुतळे उभारण्याची आणि पुतळे पाडण्याची. हे फार पूर्वीपासून सुरू आहे.. एक शिवराजांचा अपवाद. बाकी विजयाने धुंद झालेल्या प्रत्येक फौजेने हेच केले आहे. तीच मुघलाई गुणसूत्रे दिसतात आम्हांला त्या घटनेत. पण लक्षात ठेवा – तो पुतळा आपले बोट पुन्हा आभाळात रोखत गर्जला – कोणी मंदिरे पाडली, मूर्ती भंगल्या म्हणून त्यामागचा धार्मिक विचार संपला नाही. विचार असे संपत नसतात. ते लोकांच्या मनात असतात म्हणूनच विचार देणाऱ्यांचे पुतळे उभे केले जात असतात. क्षणभर सुन्न शांतता पसरली तेथे. मग हलकेच एक पुतळा म्हणाला, पण विचार हवे आहेत कोणाला? ते नकोत, म्हणून तर हे चाळे चाललेत ना? विचार विसरत चालले आहेत लोक. आता पुतळेही पाडून फेकले जाणार.. भीती वाटते. फार भीती वाटते. आज पुतळे फोडणारे हात उद्या विचार करणाऱ्या प्रत्येक मेंदूवरही हातोडा टाकल्याशिवाय राहणार नाहीत.. त्यानंतर कोणीच काही बोलले नाही. अंधार एवढा गडद झाला होता, की आता जणू शब्दही दिसेनासे झाले होते.. पुतळ्यांची सभा झाली त्याची ही गोष्ट.