केंद्रात भाजपला सत्ता मिळाली आणि पक्षाच्या उभारणीसाठी आयुष्य वेचणाऱ्या बुजुर्गाच्या मनात, मानाचे स्थान मिळेल अशा आशेची किरणे चमकू लागली. तोवर बुजुर्गासाठी खास पदे निर्माण झाली. आरामदायी आसनेही तयार झाली. एका एका बुजुर्गाला सन्मानाने त्या आसनांवर बसविण्यात आले. ‘येथे बसा आणि आम्हाला आशीर्वाद द्या’, असा संदेश सहजपणे त्यांच्याकडे पोहोचेल अशी व्यवस्थाही निर्माण करण्यात आली. मग ‘पक्षाचे पीतामह’ म्हणून सर्वात उंचावर मानाचे आरामदायी आसन मिळालेल्या लालकृष्ण अडवाणींनी आपल्या हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफली आणि मनगटे उंचावून हनुवटीला आधार देत, नव्या नजरेने ते या आरामदायी आसनावरून सत्तेचा खेळ न्याहाळू लागले. पुढे त्यांना तेच तेच न्याहाळण्याचा कंटाळाही येऊ लागला. ‘या असल्या सत्तेत मन रमत नाही,’ असेही वाटू लागले. त्यांच्या या स्थितीकडे पाहून मग अन्य बुजुर्गानीही, आपल्या वाटणीस आलेल्या आरामखुर्चीवर पहुडणेच पसंत केले. सत्ताधारी पक्षातील बुजुर्गाच्या या स्थितीकडे पाहात लखनऊच्या विक्रमादित्य मार्गावरील घनदाट झाडीने वेढलेल्या, ‘नेताजींच्या’ बंगल्याच्या भिंती एकमेकींच्या कानाशी लागून खुसखुसायच्या. या बंगल्यात अशा आरामखुच्र्या नाहीत याचा त्यांना अभिमानही वाटायचा. बाजूचा अखिलेशचा सफेद बंगलादेखील या बंगल्याच्या तोऱ्यापुढे झुकूनच असायचा. अचानक एक वादळ आले, बंगल्याभोवतीची झाडी थरारली आणि बंगल्याच्या भिंती गोंधळून गेल्या. सफेद बंगल्याचा तोरा अचानक वाढला. उत्तर प्रदेशच्या राजकारणात नेताजींना मानाचे स्थान कधीपासूनच होते. पुत्र अखिलेशचा मुख्यमंत्रिपदावर राज्याभिषेक करून देऊन नेताजी मुलायमसिंह राष्ट्रीय राजकारणात उतरले, तेव्हा उद्याच्या राजकारणातील नव्या वादळाची चिन्हेदेखील आसपास नव्हती. पिता-पुत्राच्या या अनोख्या राजकीय सौख्याचे गोडवे गात आणि त्या नात्याकडे कौतुकाने पाहात दोन्ही बंगले एकमेकांच्या बगलेत सुखाने नांदत होते. पण आता, झाडीने वेढलेल्या या बंगल्यात एक आलिशान ‘आरामखुर्ची’ येऊ घातली आहे.  ‘नेताजी’ म्हणून एक मानाचे पद आणि उंचावरचे एक आरामदायी आसन तयार होत असल्याची चाहूल बंगल्याला लागली आणि दोन बंगल्यांना आतून जोडणारा एक दरवाजा असतानाही, बंगल्यांमधील अंतर वाढले. येत्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात नेता कोण यावर शिक्कामोर्तब करण्याचा एक उपचार संपन्न होईल. समाजवादी पार्टीतील यादवीनंतर अखिलेश यादव तर त्याआधीच ‘नेता’ झाले. आता मुलायमसिंह ‘नेताजी’ होऊन नात्याने गर्द झाडीने वेढलेल्या त्या  बंगल्याच्या दिवाणखान्यातील उच्च पदावरील आरामदायी आसनावर स्थानापन्न होऊन, हाताची बोटे एकमेकांत गुंफून व हनुवटीला मनगटांचा आधार देऊन सत्तेचे नवे समीकरण न्याहाळतील का, ‘या सत्तेत मन रमत नाही’, असे त्यांनाही वाटेल का, यावर बंगल्याच्या भिंती एकमेकींच्या कानाशी लागून चर्चा करत आहेत.