संपूर्ण अंगभर, पायघोळ असे वातसंरक्षक, संपूर्ण डोई झाकून टाकेल असे शिरस्त्राण, नेत्र वगळता संपूर्ण चेहरा झाकणारे वदनसंरक्षक, दोन्ही हातांमध्ये हस्तरक्षापटल, दोन्ही पायांमध्ये पदरक्षक असा जामानिमा केलेली, मोठय़ा दमाच्या छातीची ती बलदंड आकृती वादसभेत उभी राहिली. ती उभी राहताच वादसभेत चिडिचूप शांतता पसरली. आकृतीने समोर बसलेल्या विरुद्ध पक्षगणांवर शांतपणे नजर फिरवली आणि बोलण्यास सुरुवात केली.. ‘‘विरोधी पक्षगणाचे एक प्रमुख मनसबदार स्नान करताना वर्षांसंरक्षक वापरतात, असे विधान आम्ही केले होते. त्यावर जणू महाप्रलय झाल्यागत आमच्यावर असंख्य प्रजाजन टीकेचे वार करीत आहेत. आमच्या बोलण्याचा अर्थ विशद करण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. हे आमच्या अंगावरील वातसंरक्षक. किती प्रांतांत फिरत असतो आम्ही. प्रत्येक ठिकाणची वातस्थिती निराळी. ती शरीरास बाधू नये म्हणून हे संरक्षक. खेरीज आमची जनमान्यता मोठी असली तरी ती अमान्य असणारे काही नतद्रष्ट आमच्यावर मागून, पुढून वार करण्याचे यत्न करीत असतात. त्याने देहास अपाय होऊ नये, म्हणून या वातसंरक्षकास आतून चिलखताची झालरही आहे. त्यामुळे छाती सुरक्षित राहते आणि हृदयही. डोईवर हे शिरस्त्राण कशासाठी? (असे म्हणताना आकृतीच्या आवाजात जरा हसू मिसळले.) आमचेच काही पक्षगण आमच्याही नकळत अर्वाच्य असे काही उद्गारत असतात. त्यांचे उत्तरदायित्व हे आमचे नाही. त्याची जाणीव समस्तांना व्हावी, यासाठी हे शिरस्त्राण. हे पायांत पदरक्षक कशासाठी? जमिनीशी पावलांचा फार संपर्क येऊ देऊ नको, अन्यथा प्रकृतीस त्रास होईल, असे आमच्या गुरुवर्यानी आम्हाला सांगितले आहे. त्यामुळेच आम्ही हे पदरक्षक वापरतो आणि हे हस्तरक्षापटल. किती किती, काय काय कामे करावी लागतात आम्हाला. ते करताना हात अनावृत असतील तर त्यास रंग लागतात नको नको ते. ते एकदा लागले की जाता जात नाहीत. त्यातील आरक्त रंग तर कमालीचा चिकट. कितीही जल वापरा.. अगदी गंगेचे पवित्र जल वापरा.. तो रंग पुसला जात नाही. तो अनुभव एकदा घेतला आम्ही. म्हणूनच सदैव हे हस्तरक्षापटल वापरतो आम्ही. विरोधी पक्षगणाचे मनसबदार वर्षांसंरक्षकानिशी स्नान करतात, या आमच्या म्हणण्याचा अर्थ इतकाच होता की, आत्यंतिक स्तुती वा आत्यंतिक आलोचनेच्या धारांतही ते भिजत नाहीत. अत्यंत स्थितप्रज्ञ आहेत ते. आम्ही खरे तर कौतुकच केले होते त्यांचे. जसा आमचा हा वेश, तसा त्यांचा तो वेश..’’ आकृतीचे बोलणे संपताच तिच्या पक्षगणांनी टाळ्यांचा कडकडाट केला. समोरच्या विरोधी पक्षगणांतून निषेधाचा उद्गार उमटला. त्यासरशी आकृतीने शिरस्त्राणात हात सरकवून ध्वनिरोधक पडदा कानांवर खेचून घेतला. विरोधी पक्षगणांची केवळ तोंडेच हलत असल्याचे तिला दिसले. त्याने हसू अनावर होत ती आकृती खाली बसली. त्या वेळी तिच्या जयजयकाराच्या घोषणा गगनाला भिडू पाहात होत्या..