18 March 2019

News Flash

टाचमुक्तीचा सोहळा

राजधानीच्या उपनगरातील साई- ‘कृपा’ हवेलीवर रोषणाई करण्यात आली होती.

राजधानीच्या उपनगरातील साई- ‘कृपा’ हवेलीवर रोषणाई करण्यात आली होती. आज एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. टाचमुक्ती सोहळा! सकाळी माध्यमांनी ही बातमी कानोकानी पोहोचविली, आणि आपल्या आपल्या धृतराष्ट्रांसमोर बसून दोन्ही संजयांनी या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण सुरू केले.. हवेलीच्या शानदार सभागृहात मधोमध भव्य सिंहासन मांडण्यात आले होते. हवेलीचे मालक ‘सिंहा’सनावर विराजमान झाले. त्यांनी आसपास एक नजर फिरवली, आणि समाधानाने स्मितहास्य केले. सत्तरच्या दशकात जौनपुरातून निघून रित्या हाताने राजधानीत प्रवेश केल्यानंतरच्या काळातील कठोर परिश्रमातून हे सारे वैभव उभे करताना किती जणांसमोर झुकावे लागले, किती जणांसाठी दलाली करावी लागली, किती जणांचे चरणस्पर्श केले, याची सारी जंत्रीच मालकांच्या मनाच्या पडद्यावर उमटू लागली, आणि गेल्या आठ-दहा वर्षांच्या संघर्षमय आठवणींनी ते काहीसे व्यथितही झाले. पण आता सारे संपले होते. मालकांनी मनातल्या मनात त्या आठवणींवर पडदा टाकला, आणि सेवकवर्गास खूण केली. भजनी मंडळी केव्हाच येऊन दाखल झाली होती. समोरच्या मंचावर इंद्रादी देवांच्या भव्य तसबिरी विराजमान होत्या. मालकांनी नम्रपणे झुकून तसबिरींना प्रणाम केला, आणि भजनी मंडळी सरसावली. सूर लावले गेले, आणि टिपेच्या सुरात पहिले भजन सुरू झाले ‘आता तुम्ही कृपावंत, साधुसंत जिवलग, गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी’..  साथीदारांनी या ओळी आळवण्यास सुरुवात केली, आणि मालकांचे डोळे डबडबले. सिंहासनावरून बसल्या जागीच त्यांनी इंद्राच्या तसबिरीकडे पाहून हात जोडले. इंद्र आश्वासक हास्य करतो आहे, असा भास त्यांना झाला.. भजनाचे सूर हवेलीभर घुमले होते.. पहिले भजन संपले. तोच धागा पकडून दुसऱ्या भजनी मंडळाच्या बुवांनी नवा अभंग घेतला.. ‘तुम्ही संत मायबाप कृपावंत, काय मी पतित, कीर्ती वानू..’  मालकांनी पुन्हा तसबिरीकडे पाहून  हात जोडले. तसबिरीतील इंद्रदेव जणू  आपल्यास आशीर्वाद देत आहे असा भास त्यांना झाला, आणि कानात नव्या भजनाचे सूर घुमू लागले.. ‘कृपावंत किती, दीने बहु आवडती, त्यांचा भार वाहे माथा, करी योगक्षेमचिंता’ .. आता मालकांच्या मिटल्या डोळ्यांतून आनंदाश्रूंच्या धारा वाहू लागल्या होत्या. आपल्यावर साक्षात इंद्रदेवाची कृपा झाली आहे, अशी त्यांना खात्री झाली, आणि ते बसल्या जागी डोलू लागले. टाचमुक्ती सोहळ्याचा मुहूर्तचरण समीप आला होता. थोडय़ाच वेळात साईकृपा हवेलीत असंख्य वाद्यांचा गजर होणार होता, आणि हवेली साऱ्या जगाला टाचमुक्तीची ग्वाही देणार होती. मालकांनी डोळे उघडले. ते सिंहासनावरून उतरले. समोरच्या मंचावरील इंद्रदेवांच्या तसबिरींसमोर त्यांनी लोटांगण घातले, आणि भजनाचा सूर थबकला. मग मालकांनीच खडय़ा आवाजात तसबिरीकडे पाहात भजन सुरू केले. ‘प्रभू तू दयाळू, कृपावंत दाता’..  मालकांचा आज बऱ्याच वर्षांनी मोकळा झालेला सूर ऐकून हवेली थरारली. आनंदलहरी बाहेर पडू लागल्या, आणि त्यामुळे थेट प्रक्षेपणात व्यत्यय आला. संजयांनी चॅनेल बदलण्याचा प्रयत्न केला, पण तोवर धृतराष्ट्र दरबार सोडून गुपचूप निघून गेले होते..

First Published on February 16, 2018 3:04 am

Web Title: loksatta ooltah chashmah 2