X

‘मी प्रचंड आशावादी’..

लहानशी होडी घेऊन सागराचा मध्य गाठण्यासाठी एकाकी प्रवास सुरू करतो.

एका अथांग महासागरात खोलवर उभ्या असलेल्या एका महाकाय जहाजावर स्वारी करण्याच्या महत्त्वाकांक्षेने भारावलेला एक खलाशी आपली लहानशी होडी घेऊन सागराचा मध्य गाठण्यासाठी एकाकी प्रवास सुरू करतो. सागरातील त्या जहाजापर्यंत पोहोचण्यासाठी कितीही अंतर कापावे लागले तरी तेवढा जोर आपल्या मनगटात आहे, अशी त्याची समजूत असल्याने किनारा सोडताना संभाव्य अडथळ्यांचा कोणताही विचार त्याची महत्त्वाकांक्षा विचलित करत नाही. आपल्या एकाकी होडीतून मध्य गाठून त्या महाकाय जहाजावर झेंडा फडकावणे आपल्याला शक्य नाही, असा विचारदेखील त्याच्या मनाला शिवत नाही. किनाऱ्यावर त्याचे चाहते त्याच्या धाडसाचा हा खेळ कुतूहलाने न्याहाळतच असतात. थोडे अंतर कापल्यावर लाटांचे तांडव सुरू होते. आपल्या तारूला तडाखे सोसणार नाहीत हेही त्याला कळू लागते. आपल्या प्रवासाकडे अपेक्षेने पाहणाऱ्या चाहत्यांसाठी तरी आपल्याला होडीतून प्रवास करणे व सागरात झोकून देणे भाग आहे, हे त्याला कळून चुकलेले असते. आता कितीही थकवा आला, कितीही वादळे आली, तरी वल्हे मारत राहण्याशिवाय पर्याय नाही, हेही त्याने ओळखलेले असते. आता केवळ ‘आशावादा’च्याच जोरावर, नजरेस न पडलेल्या ‘भविष्या’च्या दिशेने कूच सुरू ठेवावीच लागणार, हे त्याला जाणवू लागते. किनाऱ्यावरून त्याचे मोजके चाहते त्याच्या या पराक्रमाकडे कौतुकाने पाहातच असतात. अधूनमधून ते टाळ्या वाजवितात. आता ‘भविष्य आपल्याच हाती’ आहे, या आशावादाच्या जोरावर तो अधिक जोराने आपल्या एकाकी तारूचे वल्हे मारू लागतो.. सागरातील जे ठिकाण आपल्याला गाठायचे आहे, तेथे पोहोचणे, आपल्या एवढय़ाशा होडीच्या जोरावर एवढय़ा समुद्रात झोकून देणेही धाडसाचेच आहे, याची त्याला जाणीव असते.  ‘आमचा नावाडी शक्तिमान.. त्या जहाजावर कब्जा करण्याची क्षमता त्याच्या अंगी आहे’, असे त्याच्या एका चाहत्याने किनाऱ्यावरून केव्हाच जाहीर केलेले असते. आपल्या होडीत एवढी ताकद नाही त्यामुळे लक्ष्य गाठणे सोपे नाही, असे सांगून टाकावे, आणि किनाऱ्याकिनाऱ्याने आपले तारू वल्हवत या अथांग सागरातील विहाराचा आनंद उपभोगावा, असेही त्याला वाटत असते. पण त्याच्या चाहत्यांनीच त्याचे परतीचे दोर केव्हाच कापून टाकलेले असतात. आता हे तारू समुद्रात खोलवर ढकलणे भागच आहे, हे त्याच्या लक्षात येते आणि तो तारू ढकलतच राहतो. किनाऱ्यावरचा जल्लोष सुरूच असतो. हळूहळू सागराच्या लाटांची गाज वाढू लागते. किनाऱ्यावरच्या कलकलाटाचे आवाज अंधूक होऊ लागतात, आणि होडी पुढे सरकू लागते. मध्याच्या दिशेने जाण्याचा मार्ग आता आपणच आखला पाहिजे, हे नावाडय़ाला लक्षात येते. पुन्हा तो स्वतला धीर देतो. ‘मी प्रचंड आशावादी, हे भविष्य माझ्या हाती’, असे काही तरी पुटपुटत तो जोराने वल्ही मारू लागतो. समुद्राच्या मध्यावरचे ते महाकाय जहाज संथपणे उभे असते. एक एकाकी तारू आपल्या दिशेने येण्यासाठी किनाऱ्याकडून निघाले आहे, याची त्याला कल्पनाही नसते, तरीही नावाडी मात्र, वल्हे मारतच असतो..