त्या अमरावतीवाल्या ताईंचा एक गुण घेण्याजोगा. सत्ता कुणाचीही असो, त्याच्या कळपात राहायचे. कुणी पक्षबदलू म्हणो, कुणी आयाराम-गयाराम संस्कृतीच्या पाईक म्हणो की आणखी काही. कश्शाची फिकीर करायची नाही. लोकांना कामे हवी असतात हो. ती सत्तेशिवाय कशी पूर्ण होणार? मग त्यासाठी विचारधारा की काय म्हणतात ती बदलली तर बिघडले कुठे? तशाही आमच्या ताई अभिनयनिपुण! या कलेचा इतका बेमालूम वापर त्यांनी केला की घड्याळवीरांचे भानच हरपले. मग काय, याच कलाकौशल्याच्या जोरावर निवडणूक जिंकणे त्यांना सोपेच गेले. एकदा पद मिळाल्यावर कसला पक्ष अन् कसली आघाडी? अभिनयसम्राटाचा गोतावळाच त्यापेक्षा बरा असा विचार ताईंनी केला असेल तर त्यात काय वाईट? कलाकारांचा पक्ष पाहायचा नसतो हेच खरे! जरा या दृष्टीने ताईंकडे पाहिल्यास, त्यांचेच बरोबर, हे तुम्हाला पटू लागेल. नाही तर ते बीडचे विनायकराव! बसले हात चोळत. चांगले घड्याळ होते हाताला, ते काढून फेकले; कमळाचे देठ हाती घेतले. त्यांना वाटले पुढची ५० वर्षे देठ सुकणारच नाही. झाला ना घात. आजकाल तर ते कुठे दिसतही नाहीत. श्रीगोंद्याचे बबनराव. पाच वर्षांपूर्वी काळाची पावले त्यांनी ओळखली खरी, पण अभिनयात कमी पडले व पराभूत झाले. नंतरची पाच वर्षे अभिनयाचे धडे गिरवले. विजय मिळवला, पण सत्तेनेच दगा दिला. नशीबच फुटके, दुसरे काय? त्यामानाने आमच्या ताई नशीबवान! योग्य वेळी दिल्लीत दाखल झाल्या. ते घड्याळवाले २०२४ चा गजर लावून बसलेत, पण फायदा काय? तोवर ताई कमळावर स्वार झाल्या असतील ना! हो, घेतले असेल त्यांनी जाहीर वचन आघाडीधर्म पाळण्याचे. तोही एक कलाविष्कार होता हे त्या दादा व साहेबांना ओळखता आले नाही, ही काय ताईंची चूक? मूल्यांपेक्षा स्वहित साधणे हाच राजकारणातला खरा परमार्थ. ते नगरचे राधाकृष्णराव. विरोधी पक्षनेते होते. कमळाच्या पाकळ्यांचा वर्षाव झाल्याबरोबर त्यांना ९५ चे दिवस आठवले. पंजा सोबतीला असताना कसे मध्यभागी बसून माध्यमांना सामोरे जायचे. आता असतात उभे नागपूरच्या भाऊंच्या मागे. हाताची घडी करून. सत्ता गेली ते वेगळेच. तीच गत अकलूज व उस्मानाबादच्या घराण्यांची. आता सारे त्या सातारच्या पावसाला दोष देत बसलेत. त्यापेक्षा आमच्या ताई काय वाईट? राजकारणात हवा ओळखता आलीच पाहिजे… पासवानांसारखी. ते ताईंना जमले तर कुणाच्या पोटात दुखायचे कारण काय? बघा, कशा तुटून पडतात त्या वाघांवर. कमळाबाईंच्या गोतावळ्यातल्या भल्याभल्यांना जमत नाही ते करून दाखवतात त्या. ताज्या तक्रारीनंतर तर दिल्लीच्या लॉबीतून अनेक वाघ शेळी बनून त्यांच्यासमोरून जातात म्हणे! उगीच डरकाळी फोडली अन् तक्रार झाली तर करायचे काय या भीतीने. पार सळो की पळो करून सोडलेय त्यांनी या आघाडीवाल्यांना. निवडणुकीनंतर घूमजाव का केले हेही विचारायची सोय ठेवली नाही. हे असे त्वेषाने तुटून पडायला कला असावी लागते अंगी. तीही उपजत. अचूक टायमिंग हा अभिनय कलेतील महत्त्वाचा गुण. तो आमच्या ताईंच्या अंगी आहे. म्हणूनच तर त्यांना बोल लावण्याची बिशाद आघाडीत नाही. हे ताईंनाही ठाऊक आहे.

…तरीही या ताई कोण म्हणून विचारता? मग अज्ञजनांनो, चर्चेऐवजी हा उखाणा ऐका :

आपलं एकच तत्त्व, सत्तेची ताकद जाणा

आमदार रवी राणांचं नाव घेतील,

खासदार नवनीत राणा!