‘ते बंदीच्या घोषणांचे मी बघतो, नंतर काय काय सुरू करायचे व कसे कसे सुरू करायचे ते तुम्ही बघा,’ अशी कामाची विभागणी शीर्षस्थ पातळीवर झाली की काय अशी दाट शंका यावी, अशीच परिस्थिती आहे. गेल्या काही वर्षांतील अनुभव बघता असे काही ठरले असेल याची शाश्वती कमीच आहे, पण सध्या बंदीच्या काळात कुजबुजीशिवाय दुसरा उद्योग नसल्याने या गोपनीय ठरण्यावर मत व्यक्त करणे राष्ट्रहितासाठी आमचे कर्तव्यच ठरते. तर झाले असे की, तुम्हाआम्हा सर्वाचे लाडके  नितीनभाऊ  परवाच  वाहतूकदारांच्या ऑनलाइन संमेलनात आशावादी सूर लावताना दिसले. लवकरच सार्वजनिक वाहतूक सुरू होणार वगैरे वगैरे.. असा त्यांच्या सुराचा आशय होता. चाळीस दिवसांच्या बंदीमुळे घरातच अडकू न पडलेल्या व निराशेच्या गर्तेत अडकलेल्या कोटय़वधी  लोकांना हे ऐकू न दिलासा मिळाला. तसेही दु:खावर फुंकर घालणे, धीर देणे, सांत्वन करणे, हे देशातील प्रत्येक नेता त्यांचे राष्ट्रीय कर्तव्यच मानत आला आहे. बरेचदा हे समाधानाचे बोल नाटकी असतात, पण तरीही लोकांना असे पाठीवर हात ठेवणे आवडत असते. आपले भाऊ मात्र तसे नाहीत. जे पोटात तेच तोंडात असा त्यांचा आजवरचा खाक्या राहिला आहे. कु णाचीही भीडमूर्वत ते ठेवत नाहीत. त्यामुळे बरेचदा ते बाजूला सारले जातात. पण त्याची त्यांना फिकीर नाही.

त्यामुळे त्यांनी केलेले विधान सत्यच समजायचे असेल तर दिल्लीत बंदी घालायची एकाने व उठवायची दुसऱ्याने अशी कामाची विभागणी झाली असल्याची दाट शक्यता आहे. आपल्या तेजोमयी नेतृत्वाचा एकू ण लौकिक बघता अशा विभागणीला त्यांनी मान्यता दिली असेल का, असा प्रश्न अनेक  नतद्रष्टांना पडू शकतो, पण त्याकडे दुर्लक्ष करून भाऊंच्या आशादायक बोलण्याचे स्वागत करायला हवे.

हा आशाादायी सूर लावतानाच भाऊ पुढे असेही म्हणाले की, या वाहतुकीच्या दरम्यान निर्जंतुकीकरण, विषाणूरोधकाचा वापर, प्रवाशांमधील अंतर, मुखपट्टी वगैरे याचेही पालन करावेच लागेल. आता हे करायचे म्हटले तर प्रवासीसंख्या निम्म्यापेक्षा कमी होईल, भाडे वाढेल, एकू णच प्रवास जिकिरीचा होईल हे ओघाने आलेच. या अडचणींची जाणीव जनतेला व्हावी यासाठी ते बोलले असतील. वाहतूक कधी सुरू करावी हे कदाचित त्यांच्या हातातही नसेल. यावरून वरिष्ठ पातळीवर काही ठरले नसेल असा निष्कर्ष  टीकेसाठीच जन्मलेले काही गणंग काढतील, पण तरीही भाऊंचे म्हणणे गांभीर्याने घेणे गरजेचे आहे कारण दिल्लीतील एकमेव सच्चे नेते तेच आहेत. वरिष्ठ वर्तुळात असे काही ठरलेले नसताना हे कोण बंदीचा चक्र व्यूह भेदणारे, असा प्रश्न तेजोमयी नेतृत्वाच्या डोळ्यावर समजा आलाच असेल तर त्याचे प्रतिबिंब  नजीकच्या भविष्यात कधीतरी ‘प्राइमटाइम’मध्ये दिसेलच..

तोवर भाऊंचे म्हणणे खरे आहे असे मानून घेण्यास काय हरकत आहे. शेवटी करोनाकाळात प्रत्येकाचेच जगणे बदलणार आहे. त्यामुळे वाहतूक सुरू होवो अथवा न होवो त्याचे सूतोवाच जर भाऊ करत असतील तर ते चांगलेच म्हणायचे. तेजोमयी बोलतील तेव्हा ठरवू काय करायचे ते! तोवर प्रवासाची स्वप्ने बघू या की!