फडणवीसांच्या मुलाखतीतले एकेक वाक्य बारकाईने वाचून झाल्यावर साहेबांनी मिश्कील हसत पेपर बाजूला ठेवला. डोळ्यावरचा चष्मा हातात घेत खुर्चीवर मागे रेलत त्यांनी डोळे पूर्णपणे मिटून घेतले. आता त्यांचे विचारचक्र मागे धावू लागले होते. राजकारण कसे असते, एकाशी बोलताना दुसऱ्याशी हात मिळवतानाच तिसऱ्याला डोळा कसा मारायचा असतो हे या वैदर्भीय पुत्राला कळलेच नाही. विशेष म्हणजे या साऱ्या कृती करताना अजिबात बोलायचे नसते याचेही भान आलेले दिसत नाही. म्हणतो, आम्ही आठ दिवस वाट बघत बसलो. मग भेटीला का आला नाहीत? कारण येण्याचा मार्गच तुम्ही बंद करून टाकला होता. मला जेलात टाकण्याची भाषा सतत करत राहिलात. माझे राजकारण संपवण्याची आवई अकारण उठवत राहिलात. एवढय़ा कटुतेनंतरही मी जर दिल्लीला प्रस्ताव देऊ शकतो तर मातोश्रीला का नाही असा साधा प्रश्नही तुमच्या मनात उमटला नाही. उमटला जरी असेल तरी त्याची वाच्यता तुम्ही आता करू शकत नाही. कारण तेव्हा तुमच्यासमोर दुरून वाट बघण्याशिवाय पर्यायच नव्हता. राजकारणात पर्याय व शक्यता या दोन शब्दांना अनन्य साधारण महत्त्व आहे. ते पर्याय आणि शक्यतांचे दोर मी निवडणुकीच्या काळातच सेनेला अप्रत्यक्षपणे सोबत घेत कापून टाकले होते. तुमच्या ते लक्षात आले तोवर उशीर झाला होता. संपवण्याच्या वल्गनेने कुणाचे राजकारण संपत नसते. माझे तर नाहीच नाही. राजकारणात सत्ताधारी असो वा विरोधक, प्रत्येकाशी संवाद ठेवणे, समोरच्याच्या इच्छेचा मान ठेवत प्रस्तावांची साखरपेरणी करत राहणे यालाच महत्त्व आहे. त्याऐवजी तुम्ही सुडाचे राजकारण केले. सत्ता राबवताना काही प्यादी मोकळी ठेवावी लागतात याचे भान तुम्हाला राहिले नाही. एवढे करूनही आमच्या होकाराची वाट बघत बसला? खरं सांगू, आम्ही तुम्हाला कळलोच नाही. मला ओळखण्याच्या नादात भलेभले राजकारणातले स्थान गमावून बसले हा इतिहास लक्षात घ्यायला हवा. तरीही तुम्ही एका भल्या पहाटे गनिमी कावा केलाच. पण असे कावेबाज राजकारण करायला नुसती सत्ता असून चालत नाही. चौफेर राजकीय दृष्टी असावी लागते. असे अनेक कावे मी आयुष्यात झेलले असल्याने मला त्यातून बाहेर पडायला फारसा वेळ लागला नाही. मुंबईने माणसे तोडायची, फोडायची व दिल्लीने प्रस्तावांची लालूच दाखवत माणसे जोडायची हे राजकारण आमच्या केव्हाच लक्षात आले होते. मग त्याला मात देण्यासाठी तसेच प्रयोग आम्ही वेगवेगळ्या पातळीवर केले तर बिघडले कुठे? राजकारणात काही गुपिते पोटात ठेवूनच जगावे लागते. ही कला तुम्ही शिकायला हवी. साऱ्याच गोष्टींची वाच्यता करू लागलात की नवे नवे प्रश्न निर्माण होतात व भविष्यात खुले होणारे रस्तेही आपसूकच बंद होऊन जातात. माझ्यावर टीका करण्याआधी हे लोक माझे राजकारण का समजून घेत नाहीत, हा प्रश्न अलीकडे मला फारच छळायला लागला आहे.
तेवढय़ात आतून ताई आल्या. साहेबांना न्याहारीला घेऊन गेल्या. इडलीचा एक घास तोंडात टाकल्यावर शहाळ्याचे पाणी पितानासुद्धा साहेबांच्या चेहऱ्यावरचे मिश्कील हसू कायम राहिले. आज पप्पांनी काय वाचले असेल हे ताईंना बरोबर कळले!
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 26, 2020 12:00 am