लाडक्या नेत्याची आभासी सभा संपवून मोरू तावातावात घरी आला. येताच त्याने पुस्तकाच्या कपाटातील राजकारणाची अनेक पुस्तके काढून फेकायला सुरुवात केली. वेगवेगळ्या राजकीय किश्श्यांचा संग्रह असलेली, चाणक्य समजावून सांगणारी विविध भाषांमधील म्हणींचा समावेश असलेली, अशा अनेक पुस्तकांचा गठ्ठा मोरूने एका कापडात बांधून पलंगाखाली सरकवून दिला. नेहमी गल्लीबोळात भाषणासाठी जाताना ही पुस्तके चाळणारा मोरू आज असे का करतोय हे त्याच्या बायकोला कळेच ना! तिच्याकडे दुर्लक्ष करत त्याने संगणकावरून डेल कार्नेजीच्या प्रमुख पुस्तकांची ऑर्डर दिली; शिवाय त्याच धर्तीवरच्या भारतीय लेखकांची अनेक पुस्तके ऑनलाइन खरेदी करून टाकली. मोरूचे नवे वाचन सुरू झाले. एक दिवस कुतूहल म्हणून बायकोने ही नवी पुस्तके चाळली तेव्हा तिला आश्चर्याचा धक्काच बसला. यशस्वी होण्याचे दहा मार्ग, मैत्रीच्या दहा पद्धती, करोडपती होण्याच्या तीन आकर्षक योजना, एकाग्रचित्त होण्याचे सात आधुनिक उपाय, मन:स्वास्थ्याचे आठ नवे उपाय, अपयश पचवण्याचे दहा मार्ग, राजकारणात यशस्वी होण्याचे सात फंडे.. प्रत्येक पुस्तकाच्या नावात आकडे!  इकडे मोरूचे वाचन सुरूच होते. आणखी काही दिवसांनी पुस्तकाचा नवा गठ्ठा आला. त्यात व्यवस्थापनशास्त्राशी संबंधित अनेक पुस्तके होती. मग मात्र बायकोने विचारलेच. ‘हे काय चालवले आहे?’ मंद हसत मोरू म्हणाला. ‘हे नव्या पद्धतीचे राजकारण आहे. आता भाषणे देताना अघळपघळ बोलणे, म्हणींचा वापर, एखादा किस्सा, हे जुने झाले. त्याऐवजी या पुस्तकांचा आधार घेत आकडय़ांचा वापर करत बोलायचे. आकडा सांगितला की, लोकांची जिज्ञासा वाढते हे मानसशास्त्र मला आमच्या शीर्षस्थांनाही उमगले आहे.’ ‘म्हणजे काय?’ पत्नीने विचारताच मोरू पुन्हा करवदला. ‘पाच आय, तीन पी, तीन डी.’- ‘अहो हे काय आणि याचा अर्थ लोकांना कसा कळणार? ’ मोरू म्हणाला, ‘तीच तर गंमत आहे.. समावेशक गुंतवणुकीची इच्छा असणाऱ्यांनी नावीन्यपूर्ण योजना आखत पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर जोर दिला तर देश पुढे जाईल. आता हेच वाक्य पाच ‘आय’मध्ये सांगायचे. पर्यावरणाचा समतोल राखत वसुंधरेचे रक्षण करत औद्योगिक पायाची बांधणी करायची म्हणजे तीन पी.’ आजकाल लोकांना असले आकडे जोडलेली मुळाक्षरे फार आवडायला लागली आहेत. अशा अवजड शब्दांमधून विकासाचा पिसारा फुलवला की लोक भुलतात हे नक्की.. त्यांच्या हाती काही लागो अथवा न लागो. शेवटी शब्दसामर्थ्य महत्त्वाचे! एवढे बोलून मोरू दमला. ‘हे शब्दांचे बुडबुडे सोडणे लोकांची फसवणूक नाही का?’ या बायकोच्या प्रश्नावर मोरू कावून म्हणाला, ‘तुला नाही कळणार राजकारण असेच असते.’ बायको स्वयंपाकघरात गेल्यावर तोही पाठोपाठ गेला. केलेला स्वयंपाक पाहात, ऑर्डर दिल्याच्या थाटात तो म्हणाला, ‘तीन पी, दोन आर, एक एलएफ’ हे ऐकून बायको चाटच पडली. तिचा प्रश्नार्थक चेहरा बघून मोरू उत्तरला ‘तीन पोळ्या, दोन वाटी भात, एक वाटी भेंडीची भाजी.’ यापुढे मी असेच बोलेन. समजून घ्यायचे. बायकोने कपाळावर हात मारून घेतला व नवऱ्याच्या लाडक्या नेत्याच्या दिवाणखान्यातील तसबिरीला दुरूनच हात जोडले.