आधुनिक नारदांच्या कानात ‘सूत्रां’पैकी कोणीतरी मंत्रपठण केल्यासारखे बोलले- शरद पवार आणि अमित शहा यांची अहमदाबादेत भेट… महाराष्ट्रात सत्ताबदल निश्चित! काय घडले- किंवा घडले नाही- ते सर्व काही ‘देशाला जाणून घ्यायचे’ असल्याने हे पठण नक्की खरे किंवा कसे, हा प्रश्नच नाही. उलट, (अ)तर्क गरजेचाच. राज्यात तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार पवारांनी ‘६ जनपथ’मध्ये बसून स्थापन केले, ते पाडायला त्यांना अहमदाबादमध्ये का बरे जावे लागेल? शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे तीनचाकी सरकार बनवण्याचा घाट घातला जात असताना पवार संसदेत उघडपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले. तब्बल ४० मिनिटे गप्पा मारल्या. मग पवारांनी राज्यात भाजपला धोबीपछाड दिला. तेव्हाचे नाट्य नवनारदांना आठवले नाही. पण नवनारदांची स्मरणशक्ती कमीच. खरे तर पवार आणि शहा या दोघांचीही घरे ल्युटन्स दिल्लीत काही मिनिटांच्या अंतरावर! मग कोण कशाला गुजरातेत जाईल राजकारण करायला? पण हा प्रश्न न पडताच नारदांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी रेखाटून टाकल्या. शरद पवारांचे निवासस्थान ‘६ जनपथ मार्गा’वर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे निवासस्थान ‘६-ए कृष्ण मेनन मार्ग.’ याच बंगल्यात वाजपेयी राहत असत. कारमधून एकमेकांकडे जायचे तर तीन-चार मिनिटांत पोहोचता येते. पवारांचे सहकारी प्रफुल पटेल यांचेही निवासस्थान नवी दिल्लीतच. रकाबगंज परिसरात. संसदेच्या पलीकडे. तिथून कृष्ण मेनन मार्गावर जायचे तर चार-पाच मिनिटे लागतात. राजधानीत हाकेच्या अंतरात राहणारे हे तिघे एकमेकांना भेटण्यासाठी दोन तासांचा विमानप्रवास करून कोणा उद्योजकाच्या घरी गेले होते म्हणे… तिथे त्यांनी हितगुज केले म्हणे. मग शहा दिल्लीला परतले आणि पवार-पटेल मुंबईला गेले म्हणे. त्यातही नवनारदांना कशाचे कौतुक, तर म्हणे जेवण शाकाहारी होते.आता कोणी म्हणाले की, नितीन गडकरी अकबर रस्त्यावरून मोटारीने येता-जाताना दिसतात! याच रस्त्यावर गडकरींचे निवासस्थान असेल तर गडकरी तिथे दिसणारच. त्यांच्या समोर सोनिया गांधींचेही ‘१० जनपथ’ हे निवासस्थान आहे. गडकरींच्या शेजारी मनमोहन सिंग राहतात. पलीकडे काँग्रेसचे मुख्यालयही आहे. एवढ्यावरून ‘गडकरी नाराज, धरला काँग्रेसचा रस्ता’ अशा बातम्या कोणी दिल्या तर ते खरे कोण मानेल?  शहा म्हणतात ते खरे आहे… सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात. शहा त्या उद्योजकाच्या घरातून पवार येण्याआधीच निघून गेलेले असू शकतात. त्यांनी शाकाहारी नाश्ता केलाही असेल. शहा गेल्यानंतर अर्धा-पाऊण तासाने पवार आले असतील, किंवा नेमके उलटेही झाले असू शकेल. शहा काय किंवा पवार काय, सगळ्या गोष्टी सांगतील कशा? पवार आणि शहा भेटलेही असतील; पण त्या उद्योजकाला! तेही वेगवेगळ्या वेळी. एकमेकांना नव्हे. पण नवनारदांच्या डोक्यात शिरले भलतेच. त्यांनी ‘एकमेकांच्या भेटी’चे तर्कट लढवले आणि भेटीगाठीची रहस्यकथा ईहलोकी आणली. आता नवनारदांनी सत्तांतराची नवी कहाणी लिहिण्यासाठी बैठक मारली आहे. फक्त कानात कोणीतरी पुटपुटण्याचा काय तो विलंब…