विसरा हो ते दिवस आता… नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ शोधू नये असे म्हणण्याचे. सध्या पौराणिक उत्खननाला सुगीचे दिवस आलेत. कुळाचे मूळ असलेल्या वंशावळीच्या पोथ्यांवरची धूळ झटकली गेलीय. काही दिवस थांबा, कूळ ठाऊक नसलेल्यांना बेकायदा ठरवण्याचा कायदासुद्धा येईल! अशा गोष्टींची हवा राजकारण्यांना आधी लागते, म्हणून ते सध्या कुळाच्या मागे लागलेत. ते तरी काय करणार म्हणा! काळाचा महिमा! आता दीदींचेच बघा ना… कुणाला ठाऊक होते त्यांचे गोत्र शांडिल्य आहे म्हणून. आता हे गोत्रनिर्माते शांडिल्य कोण, हे विचारू नका. मृत्यूनंतर आत्म्यात विलीन होणे हेच आयुष्याचे साध्य, असे ते म्हणून गेले. दीदींनाही निवडणुकीनंतर सत्तेवर विराजमान व्हायचेच आहे ना! आत्मा म्हणजे परब्रह्म, असेही शांडिल्य म्हणतात. दीदींसाठी जनताच ब्रह्म नाही का? मग गोत्राचा आधार घेतला तर त्यात वावगे काय? विश्वगुरू तिकडे थेट शेजारच्या देशात जाऊन ठाकुरांच्या मंदिरात माथा टेकून आले. शेवटी प्रश्न १६ टक्के मतुआ मतांचा आहे. मग उगीच दीदींना दोष देण्यात काय अर्थ! हो, नाही आली त्यांना डाव्यांशी लढताना गोत्राची आठवण; नसतील पाळत डावे गोत्र; पण कधी चुकूनमाकून मंदिरात गेलेच, तर पुजारी त्यांच्या नावामागे कश्यप लावतोच की! या माहीत नसलेल्या गोष्टी उघड करण्याची वेळ आली ती नव्या शत्रूमुळे. अहो, डावे सोडून सारेच या कुळाचाराच्या मागे लागलेत. ते राहुलजी बघा कसे भोलेबाबाच्या नादी लागलेत. शेवटी देशव्यापीच देव तो! त्यामुळे आता तरी त्यांना ‘पप्पू’ म्हणून चिडवू नका. शंकरासारखेच भोळे आहेत हो ते. म्हणूनच तर त्यांनी मध्यंतरी सुपरमॅनने पँटवर लंगोट घालावी तसे शर्टावर जानवे घातले होते. आजकाल नुसते तोंडाने सांगून काही होत नाही, शरीरावरसुद्धा भूमिकेच्या खुणा दिसायला हव्यात. विश्वगुरूंची दाढी बघा ना कशी खुलून दिसते…अगदी रवीन्द्रनाथांसारखी! सामान्यांवर प्रभाव पाडण्यासाठी हे गरजेचेच. ती आजचीच छायाचित्रे बघा. लाल कपड्यात कामाख्या मंदिरात राहुलजी किती देखणे दिसत होते… आणि ते दिल्लीचे केजरीवाल. निघाले ना हनुमानभक्त! कशी धडाधड ‘चालिसा’ म्हणतात! आधी विश्वगुरूंना फायदा, मग केजरीवालांना लाभ, म्हणून साऱ्यांनीच अनुकरण करायचे ठरवले तर त्यात चूक काय? शेवटी ‘जसा देश तसा वेश’ हेच सूत्र महत्त्वाचे! आता, विश्वगुरू शेजारच्या देशात गेले व दंगली सुरू झाल्या, असले हेत्वारोप करू नका. देश तर शांत आहे ना, मग हेच आपल्यासाठी महत्त्वाचे. तसेच ते राहुलजी यश मिळावे म्हणून भोलेनाथाला सोडून हनुमानास जवळ करणार असेही तर्क लढवू नका. स्थळ, काळ बघून गोत्र, कूळ व देवाची निवड करण्याचे तंत्र या साऱ्यांनी गेल्या काही वर्षांत आत्मसात केलेय. काय करणार? निवडणुका म्हणजे संकटाशी मुकाबलाच. मग संकटसमयी देवच आठवणार ना! आणि ते पुरोगामित्वाचे वगैरे सोडा आता. काळजी करायची असेल तर वंशावळी बरोबर घेऊन फिरणाऱ्या भाटांची करा. बिच्चारे नेत्यांची दारे फिरून फिरून थकलेत हो!