दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या कार्यक्रमाला सन्मानाने बोलावणे तर दूर, हिंग लावून न विचारल्याने भाजपची २०१४ नंतर उदयाला आलेली पिढी भलतीच संतापली होती. सात्त्विक संताप कसा उफाळून आला. मनसेमार्गे भाजपमध्ये आलेले पूर्वाश्रमीचे शिवसैनिक प्रवीण दरेकर यांनी तर मनातील ही सल बोलूनही दाखवली. वृत्तवाहिन्यांवर या सर्व घडामोडी बघत भाजपचे जुने आणि नवे निष्ठावंत प्रदेश कार्यालयात बसले होते. मागे ठाकरे स्मारकाचा असाच काहीसा कार्यक्रम झाला तेव्हा, म्हणजे युती असताना, ठाकरे-फडणवीस कसे एकत्र दिसत होते याची आठवण कु णी तरी काढली आणि मग आताच देवेंद्रभाऊंना आणि प्रवीणभाऊंना न बोलावण्याचा काय अर्थ असा सवाल एका जुन्याजाणत्या निष्ठावंताला के ला. पक्ष विचारत नसला तरी अजून कोणी तरी काही तरी विचारतो म्हटल्यावर निष्ठावंताची कळी खुलली. अरे तुम्हा नवीन लोकांना अद्याप ठाकरे आणि त्यांची खुन्नस नीट समजलीच नाही. एक काळ असा होता की महाराष्ट्रात वाढण्यासाठी भाजपने शिवसेनेला मोठा भाऊ मानून कमीपणा घेतला. गेल्या दोन लोकसभा-विधानसभा निवडणुकांत भाजप मोठा भाऊ झाला. आपले वागणे बदलले. २०१४ मध्ये विधानसभेवेळी आपण आयत्या वेळी युती तोडली. मागच्या विधानसभा निवडणुकीनंतर वचन तोडले असे शिवसेनेचे म्हणणे. गेले वर्षभर आपण महाविकास आघाडी फोडणार व सरकार पाडणार अशा पवित्र्यात! तोंडावर मुंबई महापालिके च्या निवडणुका आहेत. हे लक्षात ठेवून नीट पाहा काय सुरू आहे… महापौर बंगल्यात ठाकरे स्मारकाचे भूमिपूजन. कोण कोण आहे तर ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात. मागच्या वेळी कोण होते तर ठाकरे व फडणवीस. याचा अर्थ काय तर ठाकरे मागच्या वेळी आपल्यासोबत युतीमध्ये होते म्हणून आपण तिथे होतो. आता ते पवार-थोरातांसोबत आहेत म्हणून ते तिथे आहेत. अर्थ स्पष्ट आहे, तरीही तो समजत कसा नाही? मुंबईच्या म्हणजेच महाराष्ट्राच्या भूमीवर काहीही करायचे असेल तर शिवसेना सोबत असेल तरच तुम्हाला स्थान, हाच की नाही ठाकरे यांचा संदेश?  ठाकरेंनी भाजपला सोडले म्हणून भाजपला या ठिकाणी स्थान नाही मिळाले. ठाकरेंनी पवार-थोरातांची साथ दिली म्हणून आज ते दोघे महाराष्ट्रात सत्तेत आहेत. राजकीय संदेश देण्याची ही खास ठाकरी शैली, असे वृत्तवाहिन्यांवरील विश्लेषकाच्या थाटात शेवटचे वाक्य टाकत जुन्या निष्ठावंताने नव्यावर हुक मी नजर टाकली.  यावर नवा म्हणाला : अच्छा, पण मग ती एकनाथ शिंदेंबद्दल काय म्हणाल तुम्ही? ते तर शिवसेनेचे नेते आहेत, नगरविकासमंत्री आहेत तरी निमंत्रण पत्रिके वर त्यांचे नाव नाही… ते मात्र दिसत आहेत.

स्मित कायम ठेवून जुना म्हणाला, पुन्हा तेच… शिंदे हे भाजपमधल्या कोणाचे खास मानले जातात, हेही आम्हीच सांगावे का तुम्हाला? जो आमच्या शत्रूचा गरजेपेक्षा जास्त मित्र त्याला निमंत्रण पत्रिकेत सन्मानाचे स्थान नाही. पण पक्षात असल्याने नाव नसतानाही बोलावल्यावर यावे लागेल. म्हणजे तुमचा सन्मान हा शिवसेनेशी निगडित आहे, याची जाणीव करून द्यायची ही ठाकरी शैली!

तुम्ही जुन्याच दिवसांत रमलेले दिसता अजून… आता कसली शैली? या प्रश्नावर जुन्याचे उत्तर सडेतोड होते :  पूर्वीची शिवसेना आता नाही, मग आता कशाला निमंत्रणाची चर्चा?