News Flash

भविष्य-पिंजरा…

दैव आणि यंत्रणा सोबत असली की सारे भविष्याबरहुकूम जुळून येते.

(संग्रहित छायाचित्र)

‘आमच्या पोटावर पाय देणाऱ्या नेत्यांचा जाहीर निषेध. या साऱ्यांवर कारवाई जोवर होत नाही तोवर आंदोलन सुरूच राहणार, भविष्यकथनाचा आमचा व्यवसाय हिरावण्याचा अधिकार यांना कुणी दिला? आधीच करोनामुळे आमच्याकडे होणारी गर्दी कमी झालेली; त्यात या नेत्यांनी भविष्यकथन सुरू केल्याने आमच्याकडे येणार कोण?’ न्याहारी करता करता दादांच्या कानी हे शब्द पडताच त्यांनी झटकन टीव्हीकडे मान वळवली. आझाद मैदानावरचा तो मोठा मंडप,  झालेली गर्दी बघून ते काय समजायचे ते समजले. हे नक्कीच त्या सेनेतल्या वकिलाचे कारस्थान असणार! पण आम्हीही चाणक्याचे चेले आहोत, असे म्हणत त्यांनी डोक्यावरून कंगवा फिरवला. तिसरी विकेट लवकरच पडणार असे म्हटल्याबरोबर हे तीनचाकीवाले हादरले; म्हणूनच हे आंदोलनाचे सोंग उभे केलेले दिसते. योग्य वेळ येताच यातलीही हवा काढू. शेवटी सारे भविष्यवाले विचाराने आम्हालाच जवळचे. त्यांची समजूत काय, केव्हाही काढता येईल असे म्हणत एका सहायकाला या आंदोलनावर लक्ष ठेवायला सांगून ते दुसऱ्या कामात गर्क झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी टीव्ही सुरू करताच पुन्हा तीच बातमी. आता आंदोलनात पोपटांच्या मदतीने भविष्य सांगणारी जमात सामील झाल्याचे ऐकताच दादांच्या काळजात चर्र झाले. तिकडे पडद्यावर पोपटपंची सुरू! हा वकील भलताच हुशार दिसतोय. तरीही काही फरक पडणार नाही म्हणा! सामान्यांना भाकिते ऐकायला आवडतात आणि आजवरची सारी खरीच निघाली ना! दैव आणि यंत्रणा सोबत असली की सारे भविष्याबरहुकूम जुळून येते. या आंदोलनाने काय होईल? फार तर थोडे लक्ष विचलित होईल, तेही माध्यमांचे. इतकी वर्षे सोबत राहूनही या सेनेवाल्यांना प्रतिडावपेच आखता येत नाहीत, असा विचार करत दादा उठले. पुन्हा सहायकाला सूचना दिल्या. तिसरा दिवस. सकाळी टीव्ही सुरू करताच दादांचे लक्ष त्याच बातमीकडे गेले. क्रिकेटचे मराठीतून समालोचन करणारे दोन वृद्ध समालोचक पाठिंबा द्यायला मैदानात आलेले त्यांना दिसले. धावा, विकेट, फलंदाज यावर आमचे स्वामित्व असताना नेते कसा काय या शब्दांचा वापर करू शकतात? हा खेळाचा अपमान आहे. समालोचनाची शान राखली जायला हवी. हे ऐकताच दादा गालातल्या गालात हसले. प्रतिहल्ला चढवण्याच्या नादात या वकिलाचे डोके फिरलेले दिसते. काय हा सवंगपणा!  ही नाहक ओरड थांबवायलाच हवी असे म्हणत त्यांनी सहकाऱ्यांना हुकूम दिला. चला आझाद मैदान. सहायकाच्या कानात काहीतरी कुजबुजून दादा आंदोलकांकडे वळले. आम्ही तुमच्याविरुद्ध नाही. पोटावर पाय देण्याचा प्रश्नच नाही असे दादांनी ठणकावून सांगितले. तेवढ्यात पिंजऱ्यातला एक पोपट ‘ओ दादा ओ दादा’ असे ओरडू लागला. दादांच्या सहायकाने लगेच त्या पिंजरामालकाला बाजूला नेत योग्य तो कानमंत्र दिला व पोपटाची चोच रबराने बांधायला लावली. या गडबडीत तो पोपटच पिंजऱ्यातून बाहेर पडत आकाशी उडाला. आंदोलकाचे समाधान झाले असे समजत दादा ताफ्याकडे वळले तर तो पोपट त्यांच्याच वाहनावर बसलेला. चोच बंद असल्याने बोलण्याची फडफड करत असलेला.

तिकडे कलानगरात टीव्हीवर ही सारी दृश्ये बघणारे सारे ओरडले. ‘सापडला अखेर खरा भविष्यवाला. पकडा पोपटवाल्याला नि करा हजर समोर’ असे आदेश सुटताच निष्ठावंत सैनिक तातडीने मैदानाकडे आले… पण तोवर पोपटवाला पिंजऱ्यासह गायब झाला होता!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2021 12:05 am

Web Title: loksatta ulta chashma article abn 97 105
Next Stories
1 चित्रकाराचे कैसे बोलणे…
2 अशाने कसे येणार रामराज्य?
3 ही कसली शैली?
Just Now!
X