असाल हो तुम्ही चाणक्य; पण फसलात ना बरोबर युवराजाने फेकलेल्या जाळ्यात? कराव्या लागल्या ना सर्वात जास्त सभा रद्द? यात राजकीय नुकसान होईल ते वेगळेच. उगीच त्याला काहीबाही चिडवत असता, सतत अक्कल काढता. आता दिसली ना हुशारी? त्या बंगभूमीत युवराजाच्या सभा झाल्या काय अन् नाही काय? काहीच फरक पडला नसता त्यांच्या पक्षाला! बिचारा अस्तित्वासाठी धडपडतोय… तरीही करोनाचे कारण देत एकदोन सभा रद्द करून मिळवला ना त्याने ‘नैतिक विजय’. अहो, किमान आता तरी त्या पक्षाला कमी लेखू नका. सत्तेची श्रीमंती गेली तरी ती आहे हे दाखवत फिरणाऱ्या लखनौच्या नबाबासारखे आहेत ते. समोरून कुणी येताना दिसले की काजू असलेल्या खिशात हात घालायचा, नाही तर आहेच शेंगदाण्याचा खिसा! तिकडे केरळमध्ये डावे विरोधात; इकडे सोबत. मग अडचण होणारच की प्रचारासाठी. त्यातून मार्ग काढण्यासाठी करोनाचे कारण देणे, याला म्हणतात चतुराई! वारंवार चाणक्याचे नाव घेऊनही तुम्हाला नाही सुचले हे. त्यासाठी दीर्घकाळ सत्तेत रमावे लागते! अल्पकाळातल्या अधाशीपणातून नाही साध्य होत असल्या गोष्टी. हो, तुमच्याएवढे गर्दी जमवण्याचे कसब त्या युवराजाकडे नाहीच, त्यासाठी लागणारे धनही नाही. तरी रडगाणे न गाता त्यांनी केली ना खेळी! तुम्ही आपले बसलात मुखपट्टीविना घसा फोडत. शेवटी जावेच लागले ना त्याच्या पावलावर पावले टाकत. हो, असेल युवराज व दीदीची ‘साठगाठ’. हे खरे की, ‘सभा रद्द’च्या मोहिमेत दीदीलासुद्धा सामील व्हावे लागले. पण सर्वाधिक नुकसान तुमचेच झाले की नाही बोला. झाकली मूठ सव्वा लाखाची याला म्हणतात. आता ही रद्दची मोहीम करोनाशी संबंधित असल्याने तुम्हाला युवराजावर थेट आगपाखडही करता येत नाही. म्हणून त्याची खिल्ली उडवणेच हाती उरले. पण त्यात काय नवीन? करोनाच्या मुद्द्यावर गंभीर असलेला एकमेव नेता अशी नोंद होईल त्याची. तसेही करोनाचा धोका देशात सर्वात आधी ओळखणारा युवराजच होता हे ठाऊक आहे ना तुम्हाला? ते डावे बिचारे. त्यांनी तर ‘सभा रद्द’ म्हटल्याबरोबर सुटकेचा नि:श्वासच सोडला. तशीही त्यांची अवस्था ना घर का ना घाट का अशीच. सध्याच्या व्हॉट्सअ‍ॅपच्या जमान्यात विचाराची पोथी कोण वाचणार? त्यामुळे अल्पसंख्य असोत वा बहुसंख्य, सारेच त्यांच्यापासून दूर गेलेले. अशा वेळी युवराजाची एक खेळी त्यांच्या मदतीला धावून आली तर त्यांना हायसेच वाटणार ना! त्यामुळे आता तरी लक्षात घ्या, या खेळीने नुकसान केले ते तुमचेच. अजूनही समजले नसेल तर ही गोष्ट ऐका. औरंगजेबाच्या दरबारात एक पहिलवान असतो. राज्यातल्या सर्व कुस्त्या त्याने जिंकलेल्या असतात. एक दिवस हरियाणाचा मल्ल त्याला आव्हान देत दिल्लीत दाखल होतो. याच्यासोबतची कुस्ती आपण हरणार हे त्याच्या लक्षात येते. तो घाबरून बिरबलाकडे जातो. बिरबल त्याला सांगतो तू मैदानात उतरल्यावर गोल गोल धावायचे. मल्लाच्या तावडीत सापडून चितपट व्हायचे नाही. तरच तुझी इज्जत राहील. होतेही तसेच. पहिलवान मल्लाला हातच लावू देत नाही. मात्र गुणांच्या आधारावर मल्ल जिंकतो. पहिलवानाची इज्जत शाबूत राहते. हेही अगदी तसेच. भले तुम्ही बंगभू जिंकाल पण युवराजाच्या गोल फेऱ्यांकडे पाहात बसलात, हे नक्की!