आदरणीय महामहीम,

टपाल खात्याच्या पत्रलेखन स्पर्धेत तुम्ही गांधींवर लिहिलेल्या पत्राला पहिला पुरस्कार मिळाल्याचे वाचून अत्यानंद झाला. अलीकडच्या काळात राजभवनाला वृद्धाश्रम म्हणण्याची प्रथाच पडली आहे. या कृतीने साऱ्यांना तुमचे वय विसरायला लावले. तुमच्यातील विद्यार्थी अजून तसाच ताजा आहे याची प्रचीती सर्वाना आली. खरे तर तुम्ही हाडाचे शिक्षक. त्यामुळे तुम्ही कित्येकांना पत्रलेखनाचे धडेही दिले असतील. मुंबईस आल्यावर तुमच्यातील या कलेला आणखी बहर आला असावा.. तुम्ही मुख्यमंत्र्यांना लिहिलेली अनेक पत्रे तर लाजवाब होती. तेव्हा अनेकजण म्हणू लागले की, ही पत्रे म्हणजे प्रशासनातील अनावश्यक हस्तक्षेप आहे. पण, त्यांना तुमचे पत्रलेखनप्रेम तेव्हा ठाऊक नसावे. आता या पुरस्कारामुळे त्या सर्वाची तोंडे बंद होतील अशी आशा करू या. आपल्याकडे माणूस कसा आहे, त्याचा हेतू प्रामाणिक आहे का हे न बघताच टीका करण्याची सवय अनेकांना जडली आहे. तुम्ही या टीकेला न बोलता दिलेले प्रत्युत्तर तुमचे मोठेपण सिद्ध करणारे आहे. राजभनावरची सारीच पत्रे सचिव लिहितात, महामहीम फक्त स्वाक्षरी करतात. त्यामुळे स्पर्धेसाठी पाठवलेले पत्र तुम्हीच लिहिले का अशी शंका काहीजण उपस्थित करू लागले आहेत. या नतद्रष्टांकडे दुर्लक्षच इष्ट. माणसाने स्वत:शी प्रामाणिक असले म्हणजे झाले! तुम्ही या पदावर येण्याआधीची राजकीय पार्श्वभूमी बघता गांधींवर तुम्ही लिहिले याचेही अनेकांना आश्चर्य वाटले. सोनू सूदसारखा हा नवा खेळ तर नाही ना अशीही शंका काहींनी घेतली. पण, एव्हाना गांधी देशातील सर्व विचारधारांना प्रात:स्मरणीय झाले आहेत याची या शंकाखोरांना कल्पना नाही. सांप्रतकाळी अर्धवट माहितीच्या आधारे बोलणे व कृती करणे अशी सवय काहींना जडली आहे. त्यामुळे तुम्ही त्यांना भल्या मनाने माफ करणेच योग्य. जाहीरपणे स्पर्धेत भाग घेतल्याने तुम्हाला बक्षीस देण्याशिवाय आयोजकांकडे पर्याय नव्हता असेही काही बोरूबहाद्दर म्हणतात. आता स्पर्धा जर सर्वासाठी खुली असेल तर एक नागरिक या नात्याने तुम्ही त्यात भाग घेण्यात गैर काय? आणि तुम्हाला मिळालेले बक्षीस हे शुद्ध गुणवत्तेच्या आधारे आहे याची ग्वाही खुद्द सरकारी टपाल खात्यानेच दिल्यामुळे या आक्षेपातही अर्थ नाही. बक्षीस जाहीर झाल्यावर तुम्ही उदार मन दाखवत ते दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या एखाद्या होतकरू विद्यार्थ्यांला द्यायला लावले असते तर ते आणखी शोभून दिसले असते असा काहींचा तर्क. त्यात थोडेफार तथ्य असले तरी गांधींच्या विषयावरचे बक्षीस मिळण्याचे अप्रूप ज्यांना नाही, त्यांना गांधीही कळले नाहीत आणि भगतसिंगदेखील. आता राहिला प्रश्न, तुम्ही पत्रच का लिहिले, लेख का नाही असा. लेख लिहिला असता तर माध्यमांनी विनाविलंब प्रकाशित केला असता. नसता केला तरी परिवारातील माध्यमे होतीच. तुमच्यासारख्या ज्ञानींनी खरे तर या प्रश्नांना महत्त्व देऊच नये. पत्रलेखन आवडते म्हणून घेतला स्पर्धेत भाग असे परखड उत्तर देऊन मोकळे होणे केव्हाही योग्य. शेवटी पुन्हा एकदा तुमचे अभिनंदन!

आणि हो.. ते मराठी शिकण्याचे काम कुठवर आले? आता तुमचे मराठीतील पत्र वाचण्याची उत्सुकता तमाम मराठीजनांना लागली आहे. या सर्व पत्रांचा एक संग्रह ‘राजभवनावरचे खलिते’ या नावाने प्रकाशित झाला तर उत्तमच.

बाकी सर्व क्षेम!

कळावे लोभ असावा.