राजकारणात बारामती आली की राजकारणाची मितीच बदलते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची राष्ट्रवादीच्या कोटय़ातून राज्यपालनियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर निवड होणार ही बातमी फार नाही सहा वर्षांपूर्वी आली असती तर लोकांनी ती बातमी देणाऱ्याला येरवडय़ालाच पाठवले असते. एक रुपया आणि एक मत या घोषणेची व त्या झंझावाताची आठवण करून दिली असती. २००४ मध्ये शिरोळच्या विधानसभा निवडणुकीत उतरलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी या तरुणाने निवडणुकीची मितीच बदलून टाकली. ऊस पट्टय़ातील हा अँग्री यंग मॅन, शेतकऱ्यांचा अमिताभ बच्चनच. ना राजकीय घराण्याची परंपरा ना गाठी पैशांचे ढीग; तरी काळ्या मातीतून उसाचे सोने पिकवणारे शेतकरी या एकप्रकारे कफल्लक तरुणाच्या मागे उभे राहिले. थोरल्या साहेबांचीही मती गुंग झाली. आणि बघता बघता हा गडी थेट विधानसभेत पोहोचला देखील. मग उसाचा दर ठरवायचा तर राजू शेट्टी हे महत्त्वाचे नाव झाले. नंतर आली २००९ ची लोकसभा निवडणूक. थोरल्या साहेबांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत पाऊल टाकलेले. एक-एक खासदार महत्त्वाचा. पुन्हा पहिल्या घासात खडा लागावा तशी राजू शेट्टी यांची उमेदवारी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात. तेवढय़ावर थांबले नाही. त्याचा परिणाम थेट शेजारच्या कोल्हापुरात बंडखोर सदाशिवराव मंडलिकांच्या पारडय़ात. निकाल लागला तेव्हा हे दोन मतदारसंघ तर हातातून गेलेच शिवाय खासदारांची संख्या वाढण्याऐवजी कमीच झाली. साखर हंगाम जवळ आला की पुन्हा राजू शेट्टी विरुद्ध राष्ट्रवादी हा सामना सुरू. अशाच एका सामन्यात वैतागलेल्या थोरल्या साहेबांनी थेट शेट्टी यांची जातच काढली. जातीची गणिते कधी चुकली नव्हती, पण शेट्टींची चुकीची जात काढली. त्यामुळे डाव आणखीच उलटला. लोकप्रियतेचे दान राजू शेट्टींच्या बाजूने पडले. नंतर साखर हंगामावेळी शेट्टी यांनी थेट बारामतीत शिरून आंदोलन करत आव्हान दिले. लोकसभा निवडणुकीत सत्तांतर झाले. सत्तांतराचे लोण राज्यातही पसरले आणि महायुतीचे राज्य आले. राजू शेट्टींना वाटले आता बळीराजाचे कैवारी आले. पण सरळसोट असेल तर ते राजकारण कसले. कालपर्यंत राजू शेट्टींची मर्जी राखणारी भाजप आता त्यांना विचारेनाशी झाली. कालपर्यंत मित्र असलेले सदाभाऊ खोत यांनाच शेट्टी यांच्यासमोर उभे केले. राजू शेट्टी हे भाजपचे शत्रू झाले. आणि शत्रूचा शत्रू तो आपला मित्र हे थोरल्या साहेबांइतके  कोण जाणतो. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी शेट्टी यांना आपल्याकडे ओढले. शेट्टींचा पराभव झाला. लोकांनी म्हटले खांद्यावर हात टाकू न संपवण्याचा बारामतीचा डाव यशस्वी झाला. पण ज्याची जात काढली त्या राजू शेट्टी यांची जातीवंत कार्यकर्ता-शेती-सहकारातील तज्ज्ञ म्हणून विधान परिषदेवर पाठवणी राष्ट्रवादी करणार. आणि ज्यांना राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना लुटणारी टोळी म्हटले होते त्या राष्ट्रवादीच्या आशीवार्दाने शेट्टी पुन्हा शक्तीची जुळवाजुळव करायला सज्ज. हाच तो अजब न्याय वर्तुळाचा. पण एक वर्तुळ अर्धवट आहे, हातकणंगले मतदारसंघ पुन्हा खेचण्याचे.. दोघांनाही ते पूर्ण करायचे आहे असे म्हणतात.