कलानगरातील एक कुंद सकाळ. नुकताच पाऊस पडून गेल्याने वातावरणातील दमटपणा काहीसा कमी झालेला. साहेब दिवाणखान्यात पेपर वाचनात गढलेले. हातात लोकसत्ता, टेबलावर सामना. तेवढय़ात नाईकराव आत येऊन सांगतात. बारामतीहून फोन आहे. रोजरोज काय, असा चेहरा करीत साहेब फोन घेतात. बोलणे संपताच साहेब पुन्हा वाचनात दंग! सामना हाती घेताच त्यांचे लक्ष मोठय़ा साहेबांच्या तसबिरीकडे जाते. तुमचा दादू शिवरायाचा महाराष्ट्र सांभाळतो आहे असे मनात म्हणत ते तसबिरीला नमन करतात. साधारण तासभराने नाईकराव पुन्हा आत. नाशिकहून छगनराव आहेत. नाव ऐकताच साहेबांचा चेहरा त्रासिक होतो. त्यांना आदूशी बोलायला सांग असे म्हणत ते शिवचरित्रात डोके खुपसतात. नागपूरचे नितीनभाऊ तर कुरबुरीशिवाय दुसऱ्या महत्त्वाच्या विषयावर बोलायचे आहे असे कळवळून सांगतात. पण, या दुसऱ्यासाठीसुद्धा आदूचा पर्याय दिला जातो. दुपारी साहेबांचा कॅरमचा खेळ ऐन रंगात आलेला. आधी काळी व मग लाल सुंगटी एकदा आत ढकलली की जिंकलो या अविर्भावात साहेब असतानाच फोन वाजतो. पलिकडून निरोप येतो, नगरचे बाळासाहेब लाईनवर आहेत. मोक्याच्या क्षणी खेळाचा रसभंग झाल्याने साहेब जरा चिडतातच. लगेच नाईकरावांना आत बोलावले जाते. त्यांना निरोप द्या, तुमच्या सर्व कुरबुरी ऐकून घेतल्या जातील पण उद्या. नंतर याच आशयाचे फोन नांदेड व नागपूरहूनसुद्धा येतात. काँग्रेसचे वाढते फोन बघून खेळ संपताच साहेब अनिलरावांना फोनवर सांगतात, त्यांचे ऐकून घ्या. लगेच दुसरा फोन संजयरावांना केला जातो व उद्याच्या लेखातून एक जबरी चिमटा काढण्याची सूचना दिली जाते. सकाळपासून हे जाणीवपूर्वक नॉट रिचेबल होणे बघत असलेल्या वहिनीसाहेब अखेर न राहून विचारतात. ‘का बरं असं वागता?’ गोड हसत साहेब सांगतात. ‘हे असे अलिप्त वागणे धोरणाचा भाग आहे.  काही वेळा भूमिका न घेणे ही सुद्धा एक भूमिका असते. बराच काळ थिजत ठेवलेल्या प्रश्नांचे नंतर महत्त्वच उरत नाही.’ या वाक्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न वहिनींकडून सुरू असतानाच साहेब वामकुक्षीसाठी निघून जातात. फेबुलाईव्हवर आजच्या भाषणात शिवरायांचा महाराष्ट्र व माझा बळीराजा या शब्दांचा उपयोग चारदा करायचा, अशी जुळवाजुळव करीत असतानाच आणखी एक फोन. प्रसारमाध्यमांनीच आधी जी चर्चा होणार, होणार म्हणून गाजवली होती, त्याच संदर्भात हा फोन.  साहेब भेटीची वेळही देतात.. भेट होतेसुद्धा. साहेब ऐकून घेतात, भेट संपते आणि पुन्हा प्रसारमाध्यमांच्या फोनसाठी साहेब ‘नॉट रीचेबल’ होतात!