मित्रांनो, आपण आंतरराष्ट्रीय योगदिन गेली सहा वर्षे साजरा करीत आहोत. या वर्षी हा दिवस आपण आपापल्या घरांतच, कुटुंबियांसमवेत साजरा केला. मात्र अनेकांनी योगदिनात सहभाग न नोंदवता, रविवार लोळतच घालवला. त्यांच्यासाठी आणि योगावर गाढ विश्वास असलेल्या सर्वासाठी, एका नव्या पैलूची ओळख इथे करून देत आहे. आपले शरीर हे योगसाधनेचे साधन असते, हे सर्वानाच माहीत आहे. अनुलोम विलोम, प्राणायाम आदींतून शरीरांतर्गत योग, तर अनेक आसनांमधून बाशरीराने योगसाधना केली जाते. अशा प्रकारे साऱ्या शरीराचा विचार योगात आहे. त्यामुळेच, गंभीर शारीरिक व्याधी असणाऱ्यांनी कठीण आसने करू नयेत असे योगगुरू सांगतात. हे तात्कालिक व्याधींनाही लागू आहे. उदाहरणार्थ आपण गाफील असताना गेल्याच आठवडय़ात कुणी आपल्या पाठीत फटके मारले असतील तर आपली पाठ दुखत असते. अशा वेळी पाठीच्या कण्यावर ताण पडेल, अशी आसने- उदाहरणार्थ हलासन, भुजंगासन, मयूरासन आदी आसने- करू नयेत, हे इष्ट सांगितले आहे. मात्र योगसाधनेत शरीर हे जसे साधन, तसे एका अर्थाने ते साध्यही असते. त्यामुळे पाठीच्या कण्याचे दुखणे बरे झाले, की मग ही आसने करायची आहेत. अशा आसनांमुळे पाठीच्या कण्यास लाभच होतो.  पाठीचा कणा लवचिक होतो. कणा लवचिक असेल तर चटकन कोणाहीपुढे वाकता येते. आता काही साधक विचारतील की कणा ताठ ठेवण्याचेही महत्त्व योगात आहे, ते कसे काय? ते महत्त्व आहेच. ते कुणी नाकारणार नाही. आपापले काम करताना कणा ताठ ठेवला, तर निश्चितपणे लाभ होतात. हे लाभ फक्त स्वत:ला नव्हे तर इतरांनाही होतात. मग लवचिक कण्याचा लाभ काय?

इथे आपण उदाहरण पाहू. हे उदाहरण आहे जिभेचे. जीभ लवचिक असते, हे साऱ्यांनाच माहीत आहे. या लवचिकतेचे बा आणि अंतर्गत, लौकिक आणि पारमार्थिक असे लाभ आहेत. ‘दोन हजाराची नोट येणार, मग काळा पैसा हद्दपार होणार’ असे सांगणारे लोक चार वर्षांपूर्वी सर्वत्र होते. नोट आली आणि काळा पैसा नष्ट झाला नाही, तेव्हा हेच लोक लोभीपणा नष्ट होत नाही तोवर काळा पैसा जाणार नाही, असे सांगू लागले. इथे पैशाचा रंग महत्त्वाचा नाही. जिभेची लवचिकता वाढली, हे आपल्या उदाहरणात महत्त्वाचे. जीभ जितकी वापरली जाते, तितकी तिची लवचिकता वाढते. आधार म्हणून, २०१४ पूर्वी जिभा कशा वापरल्या जात होत्या आणि आता जिभा कशा वापरल्या जातात, याची उदाहरणे तुम्ही आंतरजालावर शोधू शकता. जिभेच्या लवचिकतेवर भरपूर संशोधनही झाले आहे,अभिमानाची बाब म्हणजे ते भारतीयांनी केलेले आहे. असो. हे झाले अलीकडील उदाहरण. योगशास्त्र हे पुरातन शास्त्र आहे. ते सदा नवीन राहावे, या हेतूने आजच्या जगण्याशी ते जोडले पाहिजे! जिव्हा-आसन असे अशा अनेक उद्गारांना म्हणता येईल. त्या आसनांनी जिभेची जशी लवचिकता वाढली, तशी आपल्या पाठीच्या कण्याची लवचिकता विविध आसनांनी वाढू शकते, एवढेच या उदाहरणातील मर्म.