15 July 2020

News Flash

खरी डरकाळी!

जंगलालगत होऊ घातलेल्या कोळसा खाणीमुळे विस्थापनाचा धोका निर्माण झाल्याने चिंताग्रस्त वाघांची एक सभा भरलेली.

संग्रहित छायाचित्र

 

स्थळ : ताडोबाच्या जंगलातील पांढरबोडी परिसरातील एक अज्ञात ठिकाण. जंगलालगत होऊ घातलेल्या कोळसा खाणीमुळे विस्थापनाचा धोका निर्माण झाल्याने चिंताग्रस्त वाघांची एक सभा भरलेली. या खाणीला विरोध कसा करायचा, त्यासाठी कुणाकुणाची मदत घ्यायची यावर विचारमंथन चाललेले. ‘आपल्या सुरक्षेसाठी सारी मानवजात एकत्र आली आहे. अनेकांनी याविरुद्ध आवाज उठवणे सुरू केले आहे. त्यामुळे या जातीचे अभिनंदन केले पाहिजे.’ एकाने गुरगुरत व्यक्त केलेले हे मत ऐकून जमलेले इतर अवाक्  होतात. ‘हे म्हणजे मानवाशी दोस्ती करणे! मग खायचे काय?’ सर्वात मागे उकिडवा बसलेला एक वाघ पाय हवेत उंचावत विचारतो. सारे त्याच्याकडे रागाने बघतात. तेवढय़ात सभाध्यक्षांच्या बाजूला बसलेला एक ज्येष्ठ घसा खाकरत बोलू लागतो. ‘बसता, उठता आपले नाव घेणारे एक घराणे राज्यात सत्तेत असल्यामुळे ही खाण सध्या तरी होणे शक्य नाही. शिवाय याच घराण्याची धाकली पाती आपल्यासाठी मैदानात उतरली आहे त्याच्यामागे तरुणांची मोठी फौज आहे म्हणतात.’ हे ऐकताच नुकतीच मध्यप्रदेशातून आलेली एक वाघीण लाजत उद्गरते. ‘अरे वो ? नया है वह’ या वाक्यासरशी हास्याचा गडगडाट होतो. मग सभाध्यक्ष बोलू लागतात. ‘हे बघा, आपल्या नावावर राजकारण करण्याची पद्धत आता भारतदेशी रूढ झाली आहे. निवडणुकीत जोश भरण्यासाठी आपल्या नावाचा वापर होतो. अनेक राजकारणी तर जणू काही आपलेच वंशज असल्याच्या थाटात वावरतात. घरात फोटो काय लावतात, पुतळे काय बसवतात. आताही आपल्याला वाचवणे हे एक निमित्त आहे. खरा हेतू केंद्राला डिवचण्याचा आहे. शिवाय खाणमालक कधीतरी भेटेलच अशी आशाही या विरोधामागे आहे. यांना जर खरा कळवळा असेल तर हे शिकारी का थांबवत नाहीत? माणसांचे अतिक्रमण का रोखत नाहीत? खाण्यासाठी आपल्याला सावज मिळत नाही. ते का उपलब्ध करून देत नाहीत? आपले खाण्याचे व दाखवण्याचे दात एकच पण, यांचे वेगवेगळे!’ या गंभीर वक्तव्याने सभेत शांतता पसरते. त्याचा भंग करत कोपऱ्यात बसलेला एक बोलू लागतो. ‘आता आपणही रॉयल्टीच्या मुद्दय़ावर विचार करायला हवा. मुके असलो म्हणून काय झाले? आपणही राजे आहोत. देशातील अनेक राजे रॉयल्टीवर जगतातच की! यापुढे आपल्या नावाचा वापर करायचा असेल तर पैसे मोजावे लागतील. राजकारण करायचे असेल तर दुप्पट मोजावे लागतील. या पृथ्वीतलावर आपण आहोत म्हणून मानव आहे हे लक्षात आणून द्यावे लागेल. सध्या विस्थापनाचे संकट असल्याने तूर्त थांबू; पण यावर नंतर विचार करू.’ यावर सारेच माना डोलवतात. शेवटी खाणीच्या विरोधात मानवाची मदत घेण्यासंबंधीचा एक ठराव एकमताने पारित होतो. सारे जण डरकाळी फोडून त्याला अनुमोदन देतात. अचानक साऱ्यांच्या लक्षात येते, या डरकाळीचे पेटंट तर आपल्याकडेच आहे. कुणी कितीही नक्कल केली तरी त्याला ती फोडता येणार नाही. अगदी धाकल्या पातीला सुद्धा!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2020 12:00 am

Web Title: loksatta ulta chashma article abn 97 15
Next Stories
1 जिव्हा-आसनांचे कर्म आणि मर्म..
2 नॉट रीचेबल..
3 अजब न्याय वर्तुळाचा..
Just Now!
X