‘माझे नाव अमुक अमुक, माझे हे हे गाव. आणि या रावांचे सुचवते मी नाव.’ फेसबुक सुरू करून काव्यहोत्रावर स्थिरावताच वरील वाक्य ऐकून अंजनीसुत जाम भडकले. त्यांनी ताडकन भ्रमणध्वनी बंद केला व पलंगावर फेकून दिला. ‘अरे हे चाललेय काय? कोण, कुठले कवी, कवयित्री नटून थटून येतात काय? उखाणे घेतल्यासारखी नावे घेतात काय? हे काव्यहोत्र आहे की पोरखेळ. साऱ्या कवीजगताचा विचका करून टाकला या खेळाने. कवितेचे प्रसवणे इतके सोपे असते का कधी? थांब, आता त्या गोव्यातल्या कवयित्रीलाच फोन लावतो. आता टाळेबंदी संपायला आली, कोविडसंसर्ग थांबत नाही, मरणसत्र रोज वाढते आहे, तरीही यांचे होत्र सुरूच. अरे कोणत्या जगात वावरतात हे दीडशहाणे कवी? नुसते ट ला ट आणि री ला री लावले म्हणजे झाली का कविता? अर्थबोध नावाचा प्रकार तरी ठाऊक आहे का या नटव्यांना! हा केशवसुतांचा, कुसुमाग्रजांचा महाराष्ट्र आहे. किमान त्याचे तरी भान ठेवा रे! नका एवढे अवनत होऊ.’ पतीचे तारस्वरातले स्वगत ऐकून पत्नी धावतच अभ्यासिकेत आली. ‘अहो, गेले तीन महिने बघते आहे. तुम्ही कशाला याचा त्रास करून घेता? तुम्हाला आजवर शंभर जणांनी विचारले. या होत्रात नाव सुचवू का म्हणून. तुम्ही जायला नकार दिला. मग जे जाताहेत त्यांच्यावर ओरडता कशाला? दुसरा उद्योग नसल्याने करताहेत बिचारे लोकांची करमणूक. बंदीच्या काळात त्यांना व्यासपीठ मिळाले, तुमचे कार्यक्रम मात्र थांबले. म्हणून एवढा त्रागा करायचा?’ पत्नीने नेमके वर्मावर बोट ठेवलेले बघून अंजनीसुत सुतासारखे सरळ झाले. ‘पण, कविता दर्जेदार तरी असायला हवी ना! कुणीही कुणाचे नाव घेतो, मग तो येतो व आणखी दोन नावे घेतो. कविता म्हणजे काय मार्केटिंग चेनचा प्रकार वाटला की काय यांना? आधीच कवी म्हटले की लोक चार हात दूर पळू लागतात. कधी काही उत्स्फूर्तपणे सुचले व ऐकवतो म्हटले तरी दहादा विचार करावा लागतो. आजूबाजूचे नाराज तर होणार नाही ना याची भीती सतत मनात असते. आणि हे ‘होत्र’करू कशाचीही तमा न बाळगता सुटले सुसाट. त्या होत्राच्या पोस्टवर लोक टवाळीवजा पोस्टताहेत, त्याचेही भान यांना नाही. एकमेकांचे नाव सुचवत एकमेकांचे कौतुक करणे यात कसले आले कवीपण?’ सुतांचा त्रागा ऐकूनही पत्नीने स्वत:चा तोल ढळू दिला नाही. ‘अहो ते नवागत आहेत. त्यांचे कौतुक करायला हवे. प्रत्येक जण तुमच्यासारखीच कविता करेल हे कसे शक्य आहे? त्यापेक्षा तुम्ही त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे.’ ‘मी असले काही करणार नाही. कविता पाडायची नसते, प्रसवायची असते. यांना त्या प्रसववेणा कळणार नाहीत. जे आडातच नाही ते पोहऱ्यात कुठून येणार?’ आता वाद घालण्यात अर्थ नाही हे बघून पत्नी निघून गेल्या.

मध्ये दहा दिवसांचा काळ लोटला. अंजनीसुतांनी सहज म्हणून काव्यहोत्र बघितले तर त्यांच्या पत्नीला त्यात बघून ते उडालेच. नंतर भानावर येत त्यांनी तिची कविता ऐकली. ती अशी होती.. ‘यांना खूप सांगून कंटाळले,

सगळे भाग घेताहेत या काव्यहोत्रात,

तुम्हीही धगधगू द्या आपले अग्निहोत्र,

टाका चार समिधा आपल्याही कवितांच्या

आणि उजळू द्या प्रतिमा.

पण हे काही ऐकेनात, म्हणून माझी प्रतिभा’

हे ऐकून सुत सुन्न झाले. डोळ्यांतला अंगार कमी झाल्यावर होत्राच्या पोस्टच्या खाली बघितले तर पाचशे लाइक मिळाले होते. अजूनही त्याचा रतीब सुरूच होता!