03 March 2021

News Flash

डॉक्टर.. आम्हीसुद्धा..?

गेले चार महिने आपण कोविड कक्षात कर्तव्य बजावतोय.

संग्रहित छायाचित्र

 

सलग १२ तास कर्तव्य बजावून थकलेले डॉक्टर त्यांच्या कक्षात आले, तेव्हा त्यांच्यात उभे राहण्याचे त्राणसुद्धा उरले नव्हते. सहायकाच्या मदतीने त्यांनी शरीराभोवतीचा वैयक्तिक सुरक्षा संच उतरवला, कपाळापासूनचे मुखावरण काढून झाल्यावर त्यांनी स्वत:ला आरामखुर्चीत झोकून दिले. गेले चार महिने आपण कोविड कक्षात कर्तव्य बजावतोय. हे खरे तर राष्ट्रीय कर्तव्यच; पण अलीकडे रुग्णांच्या छळवणूक करणाऱ्या प्रश्नांनी नुसता वैताग आणलाय. दाखल होणाऱ्यांपैकी केवळ एक-दोन रुग्ण गंभीर अवस्थेत असतात. उर्वरित करोनाग्रस्त असले तरी  दिवसभर भ्रमणध्वनीवर करोनाकथा वाचत बसलेले. त्यातून येणाऱ्या प्रश्नांनी आता कळस गाठलाय. करोनावर नसेल सापडले अजून औषध, पण मीही डॉक्टर आहे ना.. रीतसर शिक्षण घेतलेला! मला काहीच समजत नसेल काय? हे म्हणजे मुख्याध्यापकांनाच शिस्त शिकवण्यासारखे झाले. एवढेच ज्ञान असेल तर घरी बसून उपचार करा ना! असे मी त्राग्याने एकाला म्हणालो तर तोच उलटला. आम्ही तर यायलाही तयार नव्हतो, इतरांना संसर्ग होतो म्हणून जबरदस्तीने उचलून आणले असे बरळला. अशांशी काय वाद घालणार? मग गप्प बसायचेच ठरवले. करोनापूर्वी रुग्णांच्या नातेवाईकांपासून बचाव करावा लागायचा. आता रुग्णांपासून बचाव करावा लागतोच, शिवाय त्याच्या प्रश्नांपासूनसुद्धा बचाव करण्याची विचित्र वेळ आली आहे. आजकाल तर लक्षणे नसलेला तंत्रस्नेही रुग्ण दिसला की भीतीच वाटते. या रुग्णांना डॉक्टरांशी गप्पाच मारायच्या असतात, त्याही गूगल, याहू किंवा यूटय़ूब आणि काय काय दाखवता दाखवता! खरे तर या औषधासंबंधीच्या परस्परविरोधी बातम्यांच्या उगमस्थानावरच बंदी हवी. नेमके औषध व लस नसल्यामुळे ही गोंधळाची स्थिती उद्भवली हे खरे; पण म्हणून काय रुग्णानेच डॉक्टर व्हायचे? मध्यंतरी माझ्या वॉर्डात भ्रमणध्वनीवर बंदी घालून बघितली, पण त्यावरूनही वाद झाले. एखादा रुग्ण गंभीर झाला व शेवटच्या घटका मोजू लागला तर नातेवाईकांशी बोलण्यासाठी भ्रमणध्वनीच हवा. संसर्गाच्या शक्यतेवर हाच रामबाण उपाय आहे असे वरिष्ठांनी सांगितल्यावर बंदी मागे घ्यावी लागली. आम्ही अतिशय कष्टाने हे शिक्षण घेतले, पदव्युत्तर झालो. अशावेळी एखाद्या नवख्याने ‘अमुकच औषध द्या’ म्हणत शास्त्र शिकवणे अपमानच नाही का? अशा वेळी गोंधळून जायला होते. अंगावर आवरणे असल्याने रागाचा एखादा कटाक्षही टाकता येत नाही. डॉक्टरच्या हाती सारे सोपवून मोकळे व्हावे, डॉक्टर हा  ईश्वरी अवतार ही भावनाच नवे तंत्र नष्ट करू लागले आहे. औषध नसल्यामुळे आम्ही वेगवेगळे प्रयोग करू लागलो, त्यामुळेच रुग्णांची हिंमत वाढली हेच खरे! पण विनाकारण प्रश्नांनी आम्ही विचलित होतो हे या चौकसांच्या लक्षातच येत नाही. आता नेमके औषध मिळेपर्यंत सरकारने या उपचार सुचवणाऱ्या बातम्यांवर बंदीच आणायला हवी. एखाद्या राष्ट्रभक्ताच्या कानी घालावे का हे? मग बंदीची मागणी समाजमाध्यमांवर सुरू होईल, त्यामुळे काहीतरी मार्ग निघेल..

..हे सुचताच डॉक्टरांना थोडे हायसे वाटले. त्यांनी समोर बघितले तर सहायकाने आणून ठेवलेला चहा कधीचाच थंड झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2020 12:00 am

Web Title: loksatta ulta chashma article abn 97 20
Next Stories
1 सुवर्णमुखपट्टी!
2 .. प्रश्नांची चिंताच करू नका!
3 बिनपाण्याने..
Just Now!
X