प्रसंग एक- पहाटे योगसाधना, मग आन्हिक उरकून आटोपशीर न्याहारी केल्यावर बरोबर साडेसातच्या ठोक्याला दादा अभ्यागतांना भेटण्यासाठीच्या दालनात आले तेव्हा तिथे कुणीच नव्हते. वाद मिटला तरी पारनेरचा विषय त्यांच्या डोक्यात घोळत होताच. आघाडी असली म्हणून काय झाले. पक्षविस्ताराचा अधिकार आहेच की आपल्याला. म्हणून तर बरोबर गेम केला पण शेवटी नाही जमले. सरकारात बिघाडी करायची नव्हतीच, एक धक्का तेवढा द्यायचा होता. अशा काळात उपद्रवमूल्य सिद्ध करत राहणे महत्त्वाचे. नाही तर सहयोगी पक्ष गृहीत धरायला लागतात. ‘हाता’चे एक वेळ ठीक आहे पण, ‘घडय़ाळा’ला गृहीत धरणे सोपे नाही हे साऱ्यांना जाणवून देणे गरजेचे होते. आता नाइलाजाने तिकडे गेलेले पाच मनाने आपल्या सोबतच राहतील यात काही शंका नाही. त्या पाचांसोबत आमदाराला मुद्दाम पाठवले. चिमटा घेतल्यावर थोडे औदार्यही दाखवायला हवे ना! पुढच्या निवडणुकीत नेमके काय घडणार याची जाणीव यानिमित्ताने सर्वाना झाली तरी पुरे! शेवटी एकेक जागा महत्त्वाची. नंतरच्या आघाडीचे पुढे बघून घेता येईल की!

प्रसंग दोन- साहेबांचे पेपरवाचन नित्याप्रमाणे चाललेले. सोबत विचारचक्रही सुरूच. सत्तेतील सहकारी असले म्हणून काय झाले? वाघाच्या जबडय़ात हात टाकण्याची हिंमत होतेच कशी यांची? युतीच्या काळात दीर्घ काळ सडल्याने आम्ही बरेच सावध झालो आहोत हे यांच्या लक्षात यायला हवे होते. कुठे परदेशी बनावटीची घडय़ाळे व कुठे शुद्ध व पवित्र असे देशी शिवबंधन. या दोघांची तुलनाच होऊ शकत नाही हे किमान दादांच्या तरी लक्षात यायला हवे होते. हे काय रायगडातला कामगार पक्ष समजतात की काय आम्हाला? असे सहजासहजी गुंडाळता येणार नाही आम्हाला. म्हणूनच मुद्दा प्रतिष्ठेचा केला व मिलिंदला कामाला लावले. बिघाडीचा थोडा जरी प्रयत्न केला तरी तो खपवून घेतला जाणार नाही म्हणजे नाही! शेवटी सत्तेची गरज सर्वानाच आहे. आमचा जबडाही भारी आहे व त्यातले दातही मजबूत आहेत. शेवटी काहीही झाले तरी तरुण रक्ताचा पक्ष आहे, म्हाताऱ्यांचा नाही. आमच्या पक्षात मेंदू नसला तरी चालतो पण, डोकी महत्त्वाची. निवडणुकीच्या वेळी गोड बोलून कसा व्यवहार करायचा हे युतीच्या काळात चांगले शिकून घेतले आहे आम्ही.

प्रसंग तीन- मुंबई ते पारनेर असा रात्रभर प्रवास करून थकलेले पाचही जण घरी जाण्याआधी गावाशेजारच्या एका धाब्यावर चहासाठी थांबलेले. साऱ्यांचे चेहरे उतरलेले. निवडणुकीच्या वेळीच आमदारांसोबत घडय़ाळ बांधले असते तर आज ही पाळी आली नसती यावर साऱ्यांचे एकमत झालेले. इकडून तिकडे व तिकडून इकडे करत मिळाले काय तर गावाला पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून एक पाण्याची टाकी! आता त्या टाकीवर चढून ओरडायचीसुद्धा सोय राहिली नाही. या घडय़ाळ शिवबंधनाच्या घोळामुळे लोक हसतील ते वेगळेच! राजकारणात आपल्यासारख्यांची डोकी महत्त्वाची, भूमिकेला काही महत्त्वच नाही. आता आमदार सांगतात काही दिवस कळ काढा. ती काढूच, पण तोंडावर आलेल्या नगरपंचायत निवडणुकीचे काय? सरकारात बिघाड नको म्हणून आपला बळी दिला गेला. आता ऐकायचे तरी कुणाचे? आमदाराचे, मुंबईच्या साहेबांचे की दादांचे? या गोंधळाने डोके कावले राव! आपण न रचलेल्या डावाचे खापर नाहक आपल्यावरच फुटले. राजकारणात हानी होते ती लहान माणसांचीच.