02 June 2020

News Flash

..वाजली नाही, वाजणारही नाही!

महिन्यामागून महिने आणि वर्षांमागून वर्षे कशी सरली, कळलेच नाही.

संग्रहित छायाचित्र

 

गॅलरीत बसल्याबसल्या कुणीतरी रस्त्यावरून जात असल्याची चाहूल लागल्याने काहीशा घाईघाईनेच नंदूने स्मार्टफोनमधले आरोग्यसेतू अ‍ॅप उघडले.. पण छेऽ! आजही नाही.. अ‍ॅप डाऊनलोड करून आज महिना होत आला. सगळी माहिती भरली त्यात. पण जी जादू हे अ‍ॅप करील, करील म्हणून वाट पाहिली, ती आजतागायत झालीच नाही. ‘नोटिफिकेशन’ आलेच नाही, एकदासुद्धा. कोणतीच इशाराघंटा वाजली नाही. त्यापेक्षा पोकेमॉन बरा..

..नंदूला आठवले ते तीन-चार वर्षांपूर्वीचे दिवस. नंदूने तेव्हा नव्यानेच स्मार्टफोन घेतला होता आणि मित्रांच्या आग्रहाखातर त्यावर ‘पोकेमॉन गो’ हे अ‍ॅपसुद्धा डाऊनलोड केले होते. नंदू आणि त्याचे मित्र, एकमेकांना अनेकदा भेटायचे त्या पोकेमॉनकाळात. पोकेमॉनला पकडण्याचा उद्योग या अ‍ॅपने साऱ्यांना लावून दिला होता. पुढला पोकेमॉन कुठे आहे, हे बहुतेकांना एकाच वेळी कळायचे. मग सारे जण घराबाहेर पडायचे. उद्देश एकच- गो पोकेमॉन गो..!

महिन्यामागून महिने आणि वर्षांमागून वर्षे कशी सरली, कळलेच नाही. म्हणजे, नंदूला तरी चार वर्षे कशी गेली कळले नाही. स्मार्टफोन तोच होता. नंदूही तोच होता. पण काळ झरझर पुढे सरकत होता. ‘पोकेमॉन गो’च्या खेळातली गंमत काही महिन्यांतच संपली. पुन्हा ‘कँडी क्रश’च्या गोळय़ा फोडणे किंवा ‘ट्रॅक रनर’सोबत सुसाट धावणे एवढेच सुरू झाले. दरम्यान सरकारने रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सेवा उपलब्ध करून दिली आणि मग धडाधड यू-टय़ूबवरून डाऊनलोड केलेले चित्रपट पाहण्यात दिवसच्या दिवस निघून गेले..

याउलट आजचा काळ. घराच्या गॅलरीत बसायचे आणि स्मार्टफोनवर ट्विटर, फेसबुक ही समाजमाध्यमे, काही वृत्त-संकेतस्थळे हे सारे वाचायचे, व्हॉट्सअ‍ॅप पाहायचे, हा नंदूचा दिनक्रमच हल्ली. स्मार्टफोनमधले एकही अ‍ॅप नंदू सोडत नसे. त्यात ही आरोग्यसेतूची भर हल्ली पडली. पण आपल्या अ‍ॅपवर समोरचा माणूस संशयास्पद असल्याची इशाराघंटा कधी वाजतच नाही, मग काय उपयोग? ती घंटा वाजण्यासाठी समोरच्या माणसाने त्याच्या स्मार्टफोनवरील त्याच्या आरोग्यसेतू अ‍ॅपमध्ये त्याला जर खोकला असेल, अस्वस्थ वाटत असेल, ताप येत असेल, तर ती माहिती नोंदवली पाहिजे. तशी माहिती स्वखुशीने, स्वहस्ते नोंदवणारे कुणी जर नंदूसमोर आले असते, तरच- नंदू जिची जणू वाटच पाहात होता- ती घंटा वाजली असती. म्हणजे नंदू तसा सज्जनच, कुणाचा जीव मुद्दाम दु:खात जावा, कुणाला काही त्रास व्हावा अशी इच्छा नव्हती त्याची.. पण ज्या उमेदीने त्याने, समोर कुणी संशयित रुग्ण असल्यास घणघण घंटा वाजू लागणार म्हणून स्वसंरक्षणाच्या उत्साहात हे आरोग्यसेतू अ‍ॅप बसवून घेतले होते, ती उमेद मात्र ग्रीष्माच्या उन्हात जणू कोळपून जाऊ लागली होती. त्यातच आता ही नवी बातमी. म्हणे, ‘आरोग्यसेतू अ‍ॅपची सक्ती कुणावरही नाही!’ – म्हणजे आता या अ‍ॅपची गंमतच संपली म्हणायची.. ‘पाळत नको’ म्हणणाऱ्या लोकांना सरकार एवढे कशाला भिते, असा विचार करीत नंदूने खूणगाठ बांधली- आता ऊठसूट हे अ‍ॅप पाहायचे नाही.. घंटा इतके दिवस वाजली नाही, आता बहुधा वाजणारही नाही.. तेच बरे!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2020 12:00 am

Web Title: loksatta ulta chashma article abn 97
Next Stories
1 ‘द्राक्षासवा’ची कथा..
2 दूर-दूर (सारलेले) ते सारे..
3 मिकी माऊसची शेंडी!
Just Now!
X