कर्नाटकातून आलेल्या एका लहानशा बातमीची दखल घेत पक्षाच्या सुकाणू समितीने मुख्यालयात एक तातडीची बैठक बोलावली होती. सारे उपस्थित नेते आधी एकमेकांकडे व नंतर टेबलाच्या मधोमध ठेवलेल्या एका पुस्तकाकडे गंभीरपणे बघत होते. त्यापैकी कुणाचीही त्या पुस्तकाला हात लावण्याची हिंमत होत नव्हती. तेवढय़ात पक्षाच्या इतिहास पुनर्लेखन  विभागाचे प्रमुख आले. त्यांना आधी अपलाप न करता सत्य सांगण्याचा आदेश देण्यात आला. कपाळावरचा घाम पुसत ते ‘ययाती’ राजाची कथा सांगू लागले. शुक्राचार्याची मुलगी देवयानीशी ययातीचे लग्न, तिच्यासोबत दासी म्हणून आलेल्या शर्मिष्ठाचे ययातीसोबत आलेले संबंध, नंतर यदू या औरस तर पुरू या अनौरस मुलाच्या जन्माची कथा, पुरू हा ययातीचाच मुलगा आहे हे कळल्यावर देवयानीचा झालेला संताप व शुक्राचार्याने ययातीला दिलेला वृद्धत्वाचा शाप. त्यातून बाहेर पडण्यासाठी पुरुने वडिलांना दिलेले तारुण्य व नंतर ययातीचे तरुण होत एक हजार वर्षे जगणे. तरुणपणाचा यथेच्छ उपभोग घेतल्यावर तेच तारुण्य ययातीने पुन्हा पुरुला परत करणे,त्याचा आधार घेत पुरुने सिंहासन मिळवणे व नंतर एका महान कुळाची निर्मिती होणे. तपशील संपताच प्रमुखाला थांबवण्यात आले व बाहेर जाण्याचा हूकूम देण्यात आला. मग बैठकीत हळुहळू सुरू झालेल्या चर्चेने वेग घेतला. कर्नाटकचे येदी या पुस्तकाची पारायणे करीत असल्याची बातमी आहे. त्यातून पुन्हा तारुण्य मिळवण्याचा त्यांचा हेतू दिसतो. तसे झाले तर आपण घालून दिलेल्या ७५ वर्षांच्या वयोमर्यादेचे काय? यावर खल सुरू झाला. उद्या हेच पुस्तक पक्षात महत्त्वाच्या पदावर बसलेले इतर नेतेही वाचतील. मार्गदर्शक मंडळातील वृद्धांच्या हाती आयतेच कोलीत सापडेल. येदींनी या पुस्तकाच्या प्रती पक्षातील अनेक ‘मार्गदर्शकां’ना पाठवायला सुरुवात केली आहे म्हणे! तसे झाले तर आपली रणनीतीच ढासळेल असा धास्तीवजा सूर काहींनी व्यक्त केला. आताच्या आधुनिक युगात हे शक्य नाही असे एकाने सांगताच सारे त्याच्यावर ओरडले. सध्याचे युग कसेही असले तरी आपला पक्ष पुरातन युगावर विश्वास ठेवणारा आहे. पक्षाचे अनेक नेते तेव्हाच्या तांत्रिक प्रगतीवर कमालीचा विश्वास ठेवतात. पुराणकाळ हाच कसा आधुनिक होता यावर आपली साऱ्यांची श्रद्धा आहे. त्याचा वापर करून एखादा म्हातारा तरुण झालाच तर आपले नियम आणि त्यामागले डावपेच उधळले जातील. परंपरेचा आधार घेऊन कुणी तरुण होत असेल तर त्याचा प्रतिवादसुद्धा आपल्याला करता येणार नाही. त्यापेक्षा हे पुस्तकच गायब करणे योग्य. त्याच्या लेखकाला गजाआड करणेच ठीक. तरीही कुणी बधले नाही तर ईडी व सीबीआयला कामाला लावावे लागेल. सुकाणू समिती अध्यक्षांच्या या कथनानंतर बैठकीत स्मशानशांतता पसरली. पुन्हा आधीच्या त्या प्रमुखाला बोलावण्यात आले. कोण आहेत याचे लेखक असे विचारताच स्वर्गीय वि. स. खांडेकर आदी माहिती त्याने दिली. अखेर विविध भाषांमधील प्रकाशकांच्या नावाची यादी तयार करण्यात आली. हे पुस्तक नेत्यांपर्यंत पोहोचू नये अशी सूचना सरकारला देण्याचे बैठकीत ठरले. यात कुणी आडकाठी आणलीच तर रासुका लावा इथवरच्या सूचना बैठकीत झाल्या.  तेवढय़ात बैठकीच्या खोलीतील टीव्हीवर बातमी झळकू लागली- ‘मी गृहविलगीकरणाच्या काळाययाती वाचत नव्हतो. कुणीतरी खोडसाळपणा केला. या काळात मी धर्मग्रंथांचा अभ्यास केला- येदी’

..बैठक बरखास्त नव्हे, पण स्थगित झाली!