गेले दहा दिवस वसंतरावांच्या डोळ्याला डोळा लागला नव्हता. काकूंच्या हातातील जपमाळ सुटता सुटत नव्हती. जमवलेली सारी पुंजी खर्च करून मुलाला उच्चशिक्षणासाठी अमेरिकेत पाठवले. हा आनंदच या दहा दिवसांत मावळला होता. दोन वर्षांपूर्वी प्रद्युम्न गेला तेव्हा अख्ख्या सोसायटीभर आपण पेढे वाटले होते. सारे कसे कौतुकाने, विस्मयाने तर काही असूयेने बघत होते. एकदा शिक्षण पूर्ण झाले व मुलाला तिकडेच नोकरी मिळाली की मस्तपैकी सहा महिने तिकडे राहून यायचे स्वप्न वसंतरावांनी बघितले होते. शेजारच्या गुर्जरांजवळ त्यांनी ते अनेकदा बोलूनही दाखवले. सोसायटीच्या प्रत्येक बैठकीत प्रद्युम्नचा विषय निघाला की वसंतरावांचा ऊर अभिमानाने भरून येई. मुलगा तिकडे गेल्यापासून वसंतरावांचे देशातील घडामोडीमधील स्वारस्य संपले होते. तशी ही अख्खी सोसायटी देशभक्तीने भारलेली. विषय राजकारणाचा असो वा शिक्षणाचा, बोलताना प्रत्येकाची भक्ती उतू जाई. वसंतराव मात्र येथे राहूनही अमेरिकामय. घरातले सगळे पेपर बंद करून त्यांनी ‘न्यू यॉर्क टाइम्स’ वाचणे सुरू केले. तेथील शिक्षण, त्याचा दर्जा, राजकारण, त्यातले ट्रम्प यावर वसंतराव भरभरून बोलत. मोदींचा अमेरिका दौरा सुरू झाला की रात्ररात्र जागत. ‘न्यूटा’च्या साइटवरील प्रत्येक अपडेट वाचून, सकाळी सोसायटीच्या बागेत तपशीलवार कथन करत. तिथे गुर्जर व बाकी सारे मोदींच्या चाणक्यनीतीवर चर्चा करत, पण वसंतराव ट्रम्पची बाजू मांडत. करोनाकाळ सुरू झाला आणि प्रत्येक बाबतीत अमेरिका व भारत यांच्यात तुलना होऊ लागली. मग तो चाचण्यांचा विषय असो अथवा टाळेबंदीचा. कधी मुखपट्टी की दुपट्टा असाही विषय चर्चेला यायचा तेव्हा ट्रम्प तोंड झाकत नाही म्हणून वसंतराव दोन्हीला विरोध करायचे. मध्ये एचसीक्यूवरून ट्रम्पनी भारताला खडसावले तेव्हाही वसंतराव डगमगले नाहीत. ‘जगाच्या कल्याणातच राष्ट्रहित आहे,’ असेही त्यांनी गुर्जरांना सविस्तर ऐकवले होते. साऱ्या सोसायटीत ट्रम्प हा टवाळीचा तर मोदी भक्तीचा विषय. अशा वेळी वसंतराव एकटे साऱ्यांना पुरून उरत. ट्रम्पला कितीही नावे ठेवा, तो एका शक्तिशाली देशाचा प्रमुख आहे, त्यामुळे त्याची मुजोरी खपवून घ्यावीच लागणार असे ते ठणकावून सांगत. पण दहा दिवसांपूर्वी ती विद्यार्थ्यांना माघारी पाठवण्याची बातमी आली अन् वसंतरावांचे अवसानच गळाले. शेजारच्या गुर्जरांच्या घरात थाळीवादन सुरू असल्याचा भास त्यांना प्रारंभीचे काही तास होत राहिला. मग त्यांनी खाली बागेत जाण्याचेसुद्धा टाळले. रोज सकाळी ते गच्चीतून बघायचे तेव्हा जमलेली मंडळी त्यांच्याकडे बघून हसत असल्याचे त्यांना वाटायचे. बी विंगमध्ये राहणारा तो खवचट सुखदेव एकदा मुद्दाम घरी येऊन ‘काय म्हणतात तुमचे ट्रम्प’ असे दात विचकत विचारून गेला. हे बघून काकूंच्या डोळ्याला धारा लागलेल्या. वसंतरावांना दार उघडण्याची भीती वाटू लागलेली. शेवटी मनाचा हिय्या करून त्यांनी सोसायटीतील अनेकांना फोन लावले. प्रद्युम्न परत आला तरी त्याला पदवी तिकडचीच मिळणार अशी सारवासारव करून बघितली. त्यांचे हे प्रयत्न कुणी गांभीर्याने घेतले नाहीत. रात्री मुलाचा फोन यायचा तेव्हा दोघांनाही गलबलून येई. शेवटी तो दिवस उजाडला. ट्रम्पने निर्णय मागे घेतला! हे कळल्यावर वसंतरावांनी काकूंना मिठीच मारली. लगेच त्यांनी संगणक सुरू केला. गूगलपेवरून ‘न्यूटा’ची वर्गणी भरली. तिकडे काकू दहा दिवसांपूर्वी काढून टाकलेला ट्रम्पचा फोटो पुसून पुन्हा उदबत्ती लावत होत्या.