स्वर्गात मिळणाऱ्या निवांत वेळात पृथ्वीच्या भोवताल फिरणारी विमाने बघण्याचा राइटबंधूंचा छंद तसा जुनाच. त्यालाही २००८ सालीच शतक लोटलेले. मध्यंतरी जग भरपूर बदलले, विज्ञानवादी झाले. आपण लावलेल्या शोधाला जगाने अधिक प्रगत बनवले. अनेक नवनवीन विमाने भूतलावर अवतरली. हवाईमार्गाचा विस्तार झाला. प्रवास अधिक सुरक्षित व सुखकर झाला. हे बघून या बंधूंना स्वर्गीय सुखाचा आनंद मिळे. मात्र अलीकडेच आशिया खंडातून येणाऱ्या बातम्यांनी हे दोघे चिंताग्रस्त झाले. प्रारंभी पुराणकथा म्हणून त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. कशाला त्यात पडायचे असे त्यांचे विज्ञानवादी मन सतत सांगायचे, पण अलीकडे या बातम्यांची संख्या कमालीची वाढली. त्या सविस्तर वाचण्याआधी या दोघांनीही या खंडातील वेगवेगळ्या देशांत वेगवेगळ्या स्वरूपात असलेले रामायण वाचले. त्यातून त्यांना प्राचीन कथेपलीकडला अर्थबोध होईना. या बंधूंच्या डोक्यात प्रश्नांचे काहूर माजले. तो इवलासा श्रीलंका म्हणतो रावण हाच जगातला पहिला पायलट. त्याने पाच हजार वर्षांपूर्वी केलेल्या हवाईप्रवासाचा म्हणे शोध घेणार! कसा घेणार, असा प्रश्न राइटबंधूंना पडला. जर तेव्हा विमान होते तर ते काळाच्या ओघात टिकले का नाही? तेव्हाच्या हवाई सेवेने आधुनिक स्वरूप धारण करायला हवे होते. तसे झाले असते तर श्रीलंकेची सेवा जगातील पहिली ठरली असती. त्याचा फायदा साऱ्या जगाला  झाला असता व विमानाचा शोध घेण्याची गरज आपल्याला पडली नसती. रावण हे विमान घेऊन हिमालयात गेला होता म्हणे, आता तो मार्गही त्यांना शोधायचाय, पण हे कसे शक्य आहे? सरकारने कितीही आवाहन केले तरी सत्याच्या कसोटीवर टिकेल असे उत्तर कुणी कसे देईल? इतिहासाचे उत्खनन एक वेळ समजून घेता येईल, पण पुराणकथांचे उत्खनन कसे शक्य आहे? आधी त्या श्रीलंकेने त्यांची विमाने दुरुस्त करावीत. नुसते ढेकूण असतात त्यात. मध्ये तर मेलेल्या उंदराच्या वासाने प्रवाशांनी गोंधळ घातल्याचेही ऐकले होते. आजकाल साऱ्या जगात अशा सत्योत्तरींचा बोलबाला सुरू झालाय. आम्ही म्हणू तेच सत्य! पण त्याने काहीही फरक पडणार नाही. शेवटी काळाच्या कसोटीवर टिकते ते फक्त विज्ञानच. पाच हजार वर्षांपूर्वीच्या काळाला आज प्रगत ठरवून नेमके काय साध्य होणार हे श्रीलंकेलाच ठाऊक. या विचाराबरोबर राइट  बंधूंच्या चेहऱ्यावर समाधान पसरले. तेवढय़ात विल्बरने आणखी दोन बातम्यांकडे आर्विलचे लक्ष वेधले. नेपाळने नुकताच रामाचा जन्म आपल्याच देशात झाला असा दावा केला. तो करताना अयोध्या ही रामाची जन्मभूमी नाहीच असेही म्हटले, तर दुसरीकडे भारतात अयोध्येला भव्य राम मंदिर बांधण्याची तयारी सुरू झालेली. भारताच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर नेपाळ व श्रीलंकेने रामायणातील दाव्यांना अचानक महत्त्व देणे यामागे राजकारण तर नसेल ना व या साऱ्यांच्या पाठीशी चीन तर नसावा ना,  या शंका उपस्थित झाल्याबरोबर राइटबंधू चमकले. उगीचच आपण या बातम्यांवर एवढा विचार करत बसलो, स्वत:लाच प्रश्न विचारत बसलो, विज्ञाननिष्ठा तपासत बसलो, अशी या दोघांची भावना झाली. बातम्यांची कात्रणे बाजूला सारत दोघे पुन्हा पृथ्वीभोवती फिरणाऱ्या विमानांकडे बघू लागले!