प्प्रश्न थोडय़ाथोडक्याचा नाही, चारशे वाघांचा आहे. तसा हा प्राणी एकांतप्रिय, आपल्याच मस्तीत जगणारा, कुणाच्या अध्यातमध्यात करण्याची सवय त्याला अजिबात नाही. आपण भले व आपले काम भले हीच त्याची वृत्ती. आता मात्र तो गर्दीने हैराण झालाय आणि ही गर्दी कुणी करावी तर पाळीव प्राण्यांनी. त्यातही कुत्र्यांची संख्या भरपूर. वाघांना जंगली कुत्र्यांच्या सहवासाची सवय आधीपासूनची, पण ते कुत्रे जंगलाचे नियम पाळणारे. शांतता भंगू नये याची खबरदारी घेणारे.  याउलट भटक्या व पाळीव कुत्र्यांना माणसांच्या सहवासात राहून अनावश्यक भुंकण्याची सवय लागलेली. आनंद होवो वा दु:ख किंवा कुणी दिसले नाही तरी भुंकण्याचे व्यसनच जडलेले. या सततच्या भो भो वटवटीने जंगलच्या नीरव शांततेचा भंग होतो हे यांना कसे कळणार? भुंकण्याने लक्ष तेवढे वेधून घेता येते दुसरे काहीही नाही. मानवी वस्तीत असे वर्तन ठीक, पण हे जंगल आहे. त्याचे काही नियम आहेत. आणि नियम न पाळायला ही काय मानवी वस्ती आहे? एकूणच या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा लागेल असे वाघांनी मनावर घेतले तर? एका पंज्यात गारद होतील असा या ग्रामसिंहांचा जीव, पण तोरा असा की जणू काही गल्लीप्रमाणे जंगलावरही आपले राज्य. खऱ्या राजाला वारंवार शौर्य दाखवायची गरज नसते हे यांना कोण सांगणार? वाघ आहेत म्हणून जंगल आहे आणि जंगल आहे म्हणून माणूस या साध्या निसर्गनियमाचा विसर साऱ्यांना पडला हेच खरे! अन्यथा माणसाने या पाळीवांना जंगलाच्या दिशेने येऊच दिले नसते. आजकाल प्रत्येकच जण जबाबदारी झटकू लागला. त्याची शिक्षा वाघांनी का सहन करायची? गर्दीवर नियंत्रण ही खरे तर मानवी समस्या, आता ती वाघांनाही भेडसावू लागली हे अक्रीतच नाही का? बरे, परक्या प्रदेशात आल्यावर शांत तरी बसावे ना! तसेही नाही, उगीच इकडून तिकडे भटकत असतात हे कुत्रे, अनेकदा हकनाक मरतातसुद्धा! दीर्घकाळ माणसांसोबत राहूनही ‘तमीज’, ‘अदब’ शिकून न घेतलेल्या या कुत्र्यांना काय म्हणावे? याचा दोष माणसांना द्यायचा की कुत्र्यांना? – यांसारख्या अनेक प्रश्नांनी सध्या वाघांना छळणे सुरू केले आहे म्हणे! तसाही वाघ एकलकोंडाच. वैश्विक असो वा शाश्वत, मैत्रीचा त्याला तिटकाराच. अशा स्थितीत अधिवासातला कुत्र्यांचा सुळसुळाट त्याला अस्वस्थ करणारच ना! तरीही त्याने आपले मौन अजून सोडलेले दिसत नाही. तो शूर असला तरी माणसासारखा जहरी विचार त्याच्या डोक्याला शिवत नाही. शांतचित्ताने पेचातून तोडगा काढायची त्याची सवय लवकरच दिसेल. अशी आशा करू या. तोवर सारे जंगल आपलेच अशा आविर्भावात हुंदडणाऱ्या कुत्र्यांना कोण समजावणार? आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये हा माणसातूनच दुर्मीळ होत चाललेला गुण त्यांच्या सहवासात राहून कुत्र्यांमध्येही आला असावा. वाघांनी मात्र अजून तरी आपल्या स्वभाव वैशिष्टय़ाला चरे पडू दिले नाहीत. म्हणून तर ते राजे! हे न समजणारे कुत्रे भुंकण्याला डरकाळी समजू लागले असतील तर त्याला वाघांचा नाइलाज आहे. शांतता भंगाने टोक गाठल्यावर काय करायचे हे वाघाला चांगलेच ठाऊक आहे. पाळीव प्राण्यांना चांगले वळण लावता आले नाही हा माणसांचा दोष, त्याचा त्रास वाघांनी तरी कशाला सहन करायचा?