रेल्वेच्या फलाटावर पडलेल्या पेटीच्या फटीतून देठ बाहेर काढत हापूसरावांनी इकडे तिकडे बघितले तर समोरच्या पेटय़ांमध्ये संत्राभाऊ पहुडलेले. तशीही दरवर्षी या दोघांची भेट ठरलेली. कधी मालवाहू गाडय़ांमध्ये तर कधी याच फलाटांवर. तेव्हा माणसांची गर्दी असायची. यंदा मात्र, सारे काही सुनेसुने. ग्रीष्माची चाहूल लागली की राव व भाऊंचा प्रवास देशविदेशात सुरू व्हायचा. यंदा त्यालाही उशीर झालेला. तापलेल्या उन्हात व करोनाभयाच्या वातावरणात स्वत:तला तजेला कायम राखण्याची धडपड दोघांकडूनही चाललेली. दरवर्षी मानवाच्या उदरात गडप झाल्यावर त्याच्या तृप्तीची ढेकर ऐकण्याची सवय झालेले हे दोन्ही जीव यंदा त्या आवाजासाठी आसुसलेले. हा करोना यंदा सडवत मारतो की काय अशी भीती दोघांच्याही मनात. याच अस्वस्थतेतून या दोघांमध्ये संवाद सुरू झाला. शेवटी बोलूनच एकमेकांना धीर देता येतो यावर दोघांचाही विश्वास बसलेला. बोलणे काय तर केवळ व्यथा सांगणे. सध्या सारे जगच या व्यथाकथनात अडकलेले. त्याला राव व भाऊ कसे अपवाद असणार!

‘‘यंदा आम्ही खूप बहरलो. वर्षभर आमची काळजी घेणाऱ्या कोकणी माणसाला खूश करून टाकू असेही ठरवून टाकले. पण मध्येच हा विषाणू उपटल्यानी सारीच बोंब झाली. हंगामाच्या सुरुवातीला तर कोकणाच्या बाहेर पडतो की नाय अशी परिस्थिती उद्भवलेली. पण, कोकणी मोठे जिद्दी! वाहतुकीच्या साधनांची कमतरता असतानासुद्धा त्यांनी जमेल तिथवर आम्हाला पोहोचवले. थोडीफार विदेशवारीही घडली. पण हवे तेवढय़ा दूरवर जाताच आले नाही..’’

बोलता बोलता हापूसरावांना धाप लागली. जास्त बोललो तर शरीरातला रस आटून अंगावर सुरकुत्या पडायला लागतील अशी भीती क्षणभर वाटून गेली. हे लक्षात येताच संत्राभाऊ सुरू झाले. सध्याचा कठीण काळ लक्षात घेता अघळपघळ बोलायचे नाही असे भाऊंनी आधीच ठरवलेले.

‘‘वर्षभर अधूनमधून पाऊस कोसळत राहिला तरी आम्ही बहार कोसळू दिला नाही. आधीच पिचलेल्या वैदर्भीयांना यंदा नगद मिळवून द्यायचीच असा निर्धार केलेला. विषाणूची चर्चा सुरू झाल्यावर थोडी धास्ती वाटली, पण आमच्यातले पेय शक्तिवर्धक आहे, विषाणूला दूर सारणारे आहे असे कळताच आकांक्षांना नवी पालवी फुटली. खरा घात केला तो वाहतूक बंदीने. मागणी असूनही परदेशात जाता आले नाही. शेवटी रस्तोरस्ती ठाण मांडावे लागले. पडेल त्या भावात कसेबसे घराघरात पोहोचलो.’’

भाऊची व्यथा ऐकून रावांना गलबलून आले. मग एरवीचीच ख्यालीखुशाली सुरू झाली. तुमचे ते तळकोकणातले नारायणपंत सध्या काय करतात असे भाऊंनी विचारताच ‘विजनवासात’ असे उत्तर मिळाले. आणि त्या वैदर्भीय नितीनभौंचे काय सुरू आहे असे रावांनी विचारताच ‘मोठी स्वप्ने वास्तवात आणण्याचा प्रयत्न जोमात’ असा प्रतिसाद मिळाला. हा करोना नसता तर दोघांच्या जेवणाच्या मेजावरची आपली हजेरी दीर्घकाळ दिसली असती अशी खंत व्यक्त करत राव व भाऊ हळहळले. बरे झाले, या विषाणूची पैदास आपल्यापासून झाली नाही, नाही तर काही खरे नव्हते असे रावांनी म्हणताच भाऊंनी त्याला हसून दाद दिली. तोवर गाडी फलाटावरून निघून गेलीसुद्धा..