25 September 2020

News Flash

राजकारण : रात्र आणि दिवस!

सरकार बनवणे, पाडणे, आमदार फोडणे अशी कामे कधी कुणी दिवसा केलेली यांनी बघितलीत काय? सारेच यासाठी रात्रीचे मुहूर्त निवडतात.

(संग्रहित छायाचित्र)

 

‘म्हणे दिवसाची कामे रात्री करता. अरे यांना राजकारण तरी कळते का? राजकारणात दिवसापेक्षा रात्रीच जास्त घडामोडी घडतात. तुमच्यासारखे दहाच्या ठोक्याला झोपून कसे चालेल?  दिवसभर लोकांच्या गराडय़ात राहावे लागते. यांना गर्दीचा तिटकारा.. गराडा ठाऊकच नाही. सरकार बनवणे, पाडणे, आमदार फोडणे अशी कामे कधी कुणी दिवसा केलेली यांनी बघितलीत काय? सारेच यासाठी रात्रीचे मुहूर्त निवडतात. जाणून घ्यायचे असेल तर आघाडीच्या भीष्म पितामहाला विचारा! त्यांचा अनुभव दांडगा आहे. हे तर राजकारणातले नवखे. मला ‘शार्टकट’ सांगायला निघाले. राज्यपालाच्या दारातून सभागृहात प्रवेश करण्याची धडपड ‘चोरवाट’ नाही तर काय होती? म्हणतात आम्ही सर्व कामे दिवसा करतो. मग नामनिर्देशनपत्रातील संपत्तीची प्रपत्रे भरताना अनेक रात्री कशासाठी जागवल्या? त्यासाठी मोठा लवाजमा घेऊन रात्री खलबते करण्याची पाळी का आली? सांगा ना! होय, आम्ही रात्री आरेवर आरी चालवली पण मेट्रोसाठी.. जनतेच्या सोयीसाठी!  लपवण्यासारखे काही नसते आमच्याकडे. दिवसाची रात्र व रात्रीचा दिवस करून पायाला भिंगरी लागल्यागत राज्यभर फिरतो आहोत आणि तुम्ही! घरी बसून दिवस रात्रीचे गणित जुळवता? दादांच्या बाबतीत रात्रीचे गणित चुकले असेल आमचे, पण राजकारणात हे चालायचेच. तुम्ही ज्या पदावर आहात तिथे काम करतो म्हटले तर २४ तास अपुरे पडतात. दिवसाची रात्र कधी होते हेही कळत नाही. तुम्हाला ती कळते यातच सारे आले.’ विचार करूनच भाऊंना धाप लागली. त्यांनी घसा खाकरला. हे लक्षात येताच वहिनींनी शहद पाण्याचा ग्लास समोर ठेवला.

‘हातून सत्ता गेल्याचे दु:ख यांच्या चेहऱ्यावरून काही जात नाही. म्हणे अहंकार बाळगता. कुणी तरी मला अहंकारी म्हणेल का? सारेच माझ्या नम्रतेला भाळलेले आहेत हे यांच्या लक्षातही येत नाही. यांनी रोज एक पत्र लिहायचे व मी उत्तर देत बसायचे ? तारस्वरात बोलतात आणि ‘या ठिकाणी’, ‘त्या ठिकाणी’ म्हणत राहतात. दिवसरात्र राजकारण करण्याची पद्धत असेल तुमची, आमची नाही. आम्ही कुटुंबवत्सल आहोत. योग्य नियोजन केले तर दिवसा सारी कामे उरकता येतात. त्यासाठी रात्रीची गरज काय? कुटील राजकारण आमच्या रक्तातच नाही. त्यामुळे रात्र जागायची गरज आम्हाला नाही. विरोधक म्हणून तुमचे अंगावर येणे समजू शकतो पण नट, नटय़ांना समोर करण्याचे कारण काय? हे कसले घाणेरडे राजकारण? अरे लढायचे असेल तर मर्दासारखे समोर या ना! बुजगावण्यांना समोर करत मागून वार का करता? म्हणतात फिरत नाही, दौरे करत नाही. त्याची काही आवश्यकता नाही आम्हाला. ठिकठिकाणचा सैनिक समर्थ आहे स्थिती सांभाळायला. कमीत कमी कष्ट करत सत्तेचा रिमोट कसा चालवायचा हा गुण वंशपरंपरेने आमच्यात आला आहे. आमच्या झाडांना थेट फुले उगवतात. तुमच्यासारखे  कळ्या, पाकळी, फळ मग फुले असे आमच्याकडे नाही. आमचे निसर्गप्रेम अस्सल आहे एवढे लक्षात ठेवा. दिवसरात्र प्रयत्न करा. आघाडी म्हणजे फेविकॉलचा जोड आहे, तुटणार नाही.’ साहेबांचे विचारचक्र सुरू असताना वहिनी आल्या. सलग दोन दिवस तुम्ही घराबाहेर होतात.. आता पंधरा दिवस बाहेर पडायचे नाही अशी तंबी देत निघून गेल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2020 12:00 am

Web Title: loksatta ulta chashma article abn 97 31
Next Stories
1 हक्कभंगाचा हर्षवायू!
2 घरचीच परीक्षा..
3 तव्यावरची गोळी
Just Now!
X