वांद्रय़ातील हिंस्त्र भासणाऱ्या पत्रकारांच्या कळपातून कशीबशी सुटका करून घेत घामाघूम झालेला पोस्टमन घरी पोहोचला तेव्हा घडलेला प्रकार टीव्हीवर बघून धास्तावलेली त्याची बायको दारातच वाट बघत उभी होती. नवऱ्याला आत घेण्याआधी दोन बादल्या पाणी तिने त्याच्या अंगावर ओतले. मग न्हाणीघरात नेऊन सुगंधी उटण्याने घासत त्याची आंघोळ घालून दिली. तेवढय़ात शेजारी राहणारे व सेवानिवृत्त शिक्षक असलेले काका घरात प्रवेश करते झाले. त्यांना बघून पोस्टमनच्या बायकोचा संयम सुटला. ‘या दांडकेधाऱ्यांनी सध्या देशभर उच्छाद मांडलाय. त्या रियाचे लचकेच तोडायचे बाकी ठेवले होते यांनी. आज माझा नवराच त्यांच्या तावडीत सापडला तेव्हा छातीत धस्स झाले. या मुडद्यांना माणसेही ओळखता येत नाही का? प्रत्येक खाकीवाला पालिकेचा कर्मचारीच कसा असेल? दिसला माणूस की लाव तोंडाला दांडका, विचारा काहीबाही प्रश्न. ही काय वागण्याची रीत झाली? यापेक्षा गिधाडे परवडली हो. ती तरी मेलेल्याचेच लचके तोडतात. त्यातली एक बया तर थेट बुलडोझरवरच चढली. चालकाचे नाव विचारले. त्याने ‘सांगत नाही’ असे बाणेदारपणे सांगितले. तुम्हाला असे बोलायला काय झाले होते?’ बायकोच्या प्रश्नाने पोस्टमन भानावर आला. ‘मीही बोललो पण कुणी ऐकून घ्यायलाच तयार नव्हते. कळपातून निघायचा प्रयत्नही केला पण हा माणूस पालिकेचाच आहे. जाणीवपूर्वक खोटे बोलतो असे कुणीतरी म्हणाले. शेवटी पत्रांची पिशवी दाखवली.’ त्याच्या बोलण्यातला सच्चेपणा बघून काकांना राहावले नाही. ‘फारच वाईट दिवस आलेत सध्या. मी आयुष्यभर निष्पक्ष न्याय देता यावा म्हणून न्यायदेवता आंधळी असते असे शिकवले. हाच दृष्टिकोन मीडियाच्या बाबतीतही बाळगला होता. आता तो पूर्ण गळून पडलाय. हा नवमीडिया पूर्णपणे आंधळा झालाय. त्या आत्महत्या प्रकरणानंतर तर सारेच गांजा प्यायल्यासारखे वागू लागले आहेत. तुम्ही दोघेही आता या धक्क्क्यातून बाहेर या. माझ्याकडे ‘तो मी नव्हेच’ या नाटकाची सीडी आहे. ती पाठवतो. ते नाटक बघा. भविष्यात असा प्रसंग ओढवलाच तर लखोबा लोखंडे सारखी उत्तरे द्यायला शिकले पाहिजे. आजकाल साध्यांचा जमाना राहिलेला नाही.’ काका निघून गेल्यावर घरात पुन्हा शांतता पसरली. तेवढय़ात दार वाजले. बायकोने ते उघडले तर समोर पालिकेचे कर्मचारी उभे. त्यांनी घरात येत सर्वप्रथम आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला असे म्हणत पोस्टमनची माफी मागितली. पाडकामाच्या ठिकाणी येणाऱ्या अशा अनुभवांना आम्ही सरावलो आहेत. तुम्ही नाही, त्यामुळे तुम्हाला त्रास झाला, असे म्हणत ते निघाले. पोस्टमनचा गणवेश सर्वात जुना आहे, तेव्हा पालिकेनेच खाकीऐवजी वेगळा गणवेश  केला पाहिजे असे बायकोने सुचवले पण त्यावर काहीच न बोलता कर्मचारी निघून गेले.

आता गेल्या तीन दिवसांपासून पोस्टमन झोपेतून अचानक उठतो व किंचाळतो ‘मी पोस्टमन, तुम्ही समजता तो नाही हो’ यामुळे चिंतेत पडलेल्या बायकोने त्याला डॉक्टरकडे नेले. दवाखान्यात पोहोचल्यावर हे दोघे काही बोलायच्या आधी डॉक्टर ‘तुम्हीच का ते?’ असे विचारताच पोस्टमनला पुन्हा घाम सुटला. डॉक्टरला त्याच्या तब्येतीपेक्षा तिथे काय घडले हे ऐकण्यातच रस! शेवटी, ‘पण यावर काही उपचार नाही का,’ असे पोस्टमनच्या बायकोने काकुळतीने विचारले तेव्हा डॉक्टर म्हणाले,‘‘धक्क्यातून ते लवकच बरे होतील, पण चेकाळलेल्या मीडियावर सध्यातरी काही उपाय नाही. एकदाचा करोनावर उपाय सापडेल पण मिडियावर नाही. सध्या त्याला ‘मास हिस्टेरिया’ने ग्रासले आहे.’’ हा अवघड शब्द समजून घेण्याच्या भानगडीत न पडता पोस्टमन औषधे घेऊन सपत्नीक बाहेर पडले.