‘पधारो म्हारो देस..’ रिंगटोनवरूनच हा आंतरराष्ट्रीय कॉल, हे शेठनी ओळखलं.

पलीकडून तात्या म्हणाले : हॅलो हाऊडी शेठ? हाऊ आर यू माय ट्र फ्रेंड?

शेठ : नमस्ते तात्या! हूं मजा मां. तमे केम छो?

तात्या : आय अ‍ॅम ऑल्सो मज्यामा. यू.. (पुढील सर्व संभाषण अमेरिकी इंग्लिश आणि गुजरातीमिश्रित हिंग्लिशमध्ये आहे. मात्र, वाचकांच्या सोयीसाठी सर्व संवाद मराठीत). हां शेठ. कसं काय चाललंय? त्या दिवशी मोराबरोबरचा फोटो पाहिला तुमचा इन्स्टावर. मी लाइक केला आणि ट्विटरवर रिट्वीटपण केला. मजाय तुमची. मोराच्या संगतीत राहायला मिळतंय. नाही तर आम्हाला इकडे गाढवांशी तोंड द्यावं लागतंय.

शेठ: गाढवांशी? (गमतीने) व्हाइट हाऊसमध्ये गाढवं पाळलीत की काय?

तात्या : शुभ बोला शेठ, व्हाइट हाऊसमध्ये पुन्हा गाढव दिसता कामा नये. हा आपला अजेंडा आहे. गाढव म्हणजे हे डेमोक्रॅट्स हो! गाढवंच ती. नाही तर काय? त्यांचा तो जो बायडेन..  निवडणुका तोंडावर आल्या तरी, सभा नाही की रॅली नाही. जिवंत आहे की नाही, कुणास ठाऊक?  तुम्हाला सांगतो, अमेरिकेच्या इतिहासातला सर्वात वाईट्ट उमेदवार आहे तो! जाऊदे या गाढवांना काय कळतंय, सभा-रॅल्यांचं महत्त्व!

शेठ : ते तर झालं. हे ट्वेंटीट्वेंटी वर्षच बेकार निघालंय. सहा महिने झाले, कुठे दौरा नाही की थेट सभा नाही. नुस्ता वीट आलाय. आता तर निवडणुकाही कधी येतील कुणास ठाऊक? त्यात या अर्थतज्ज्ञांनी उगाच रान उठवलंय. देश खोलात चाललाय म्हणून. यांना काय कळतंय? आमचं..

तात्या : (मध्येच तोडत) बरोब्बर शेठ. तुमचं सगळं बरोबर. मी तर म्हणतो, तुम्ही नसता तर तुमच्या देशाचा जीडीपी उणे २३ झालाच नसता!

शेठ : (कपाळावर अठी चढवत) अं?

तात्या : अहो म्हणजे, तो उणे ५०वर घसरला असता. तुमच्या अर्थनीतीवर तर तो देश तरतोय.

शेठ: (खुलून) तात्या, तुम्हाला जितकी कदर आहे तितकी या देशातल्या बुद्धिवाद्यांना नाही. अहो, याबाबतीत आपण दोघंही समदु:खी. आपण जे करतो त्याला नावं ठेवणं, एवढंच काम या पंडितांना जमतं.

तात्या : जाऊ द्या हो शेठ. त्यांना नसली तर मला आहे ना? आपण दोघं आहोत की एकमेकांसाठी! टेस्टिंगबाबत तुम्ही माझी तोंडभर स्तुती केली ते, काल मी बोललो मीडियाला.

शेठ : हो तात्या हो, या टेस्टिंगमुळे तुम्ही जबरदस्त काम केलंय. एकदम चोक्कस! (गालातल्या गालात हसत मानेवर रुळत असलेल्या केसांना आकार देतात.)

तात्या:  बोलावं लागतं बाबा, निवडणुका डोक्यावर आहेत. तुमचे असंख्य चाहते आमच्याकडे पण आहेत. त्यांना गुदगुल्या कराव्या लागतात. म्हणूनच तर आपल्या टेक्सास आणि अहमदाबादच्या सभांमधील तुमचे बाइट्स ठेवलेत आमच्या प्रचारफितीत. मी तर म्हणतो, तुमची एखादी व्हर्च्युअल सभाही होऊन जाऊद्या आमच्यासाठी. अहाहा, तुम्हाला सांगतो, काय बहार येईल!

शेठ : करू की, नक्की करू! तात्या, तुमच्यासाठी कायपण. बरं चला, आता ठेवतो. मोरांना दाणे टाकायची वेळ झालीय. व्यायामही करायचाय.

तात्या : हो हो, चला ठेवतो. माझीही रॅली आहेच. पुन्हा भेटूच! बाय