आयुक्तपदाचा आदेश हाती पडताच साहेब भराभर पायऱ्या उतरून इमारतीबाहेर पडले व वाहनात जाऊन बसले. ‘चलो पुणे’ असा आदेश चालकाला दिल्यावर त्यांनी डोळे मिटले. गेल्या चार महिन्यांचा काळ त्यांच्या स्मृतिपटलावर फिरू लागला. महाबळेश्वरची परवानगी, नंतर उठलेला गदारोळ, चौकशी, शेवटी अलगद सुटका. नाही म्हटले तरी या सर्वाचा ताण आलाच होता. या नव्या आदेशामुळे ताण कुठल्या कुठे पळून गेला हे लक्षात येताच त्यांनी दीर्घ उसासा टाकला. तेवढय़ात त्यांना एका राजाची गोष्ट आठवली. हा राजा मेहुण्याच्या कलाने राज्य चालवायचा. त्याच राज्यात अतिशय लोकप्रिय असलेला एक नेता डोईजड ठरू शकतो हे लक्षात येताच हा मेहुणा सैनिकांकरवी त्याला ठार मारतो. जनता पेटून उठते. मेहुण्याला ताब्यात द्या म्हणून आंदोलन सुरू करते. राजा अडचणीत येतो. तेवढय़ात एक उपसेनापती मेहुण्याला वाचवण्यासाठी पुढाकार घेतो. त्याला तळघरात नेतो व तिथून राज्याबाहेर सुखरूप पळवून लावतो. या कृतीने राजा सुखावतो पण जनता भडकते. त्या उपसेनापतीला ताब्यात द्या अशी मागणी करते. मग राजा पुढाकार घेतो. जनता दरबार भरवतो. उपसेनापतीने पहिलीच चूक केली आहे तेव्हा त्याला माफ करा, हे राजाचे म्हणणे ऐकून जनतेचा विरोध थंडावतो. मग दोन महिन्यांनी त्या उपसेनापतीला सरसेनापती अशी बढती मिळते. या कथेतले उपसेनापती आपणच, हे लक्षात येताच साहेबांच्या चेहऱ्यावर मंद स्मित उमटते. नोकरीत येताना घेतलेली शपथ वगैरे सगळे ‘ठीकच’.. राज्यकर्त्यांशी निष्ठा हेच महत्त्वाचे असते याची जाणीव त्यांना नव्याने होते. आजकाल आपलेच काही सहकारी सरकारविरुद्ध उद्योग करण्यात गुंतलेले आहेत. राज्यकर्त्यांच्या विरोधात जाऊन काही फायदा नाही हे यांना कळत नाही. जे सत्तेत येतील त्यांच्या गोटात हळूच शिरायचे ही एक कला आहे. आपण ती अवगत करून घेतली. आजकालच्या नोकरी पेशात हे चालायचेच. महाबळेश्वरची परवानगी द्या, असा निरोप वरून आला तेव्हाच त्यातले फायदे व तोटे आपल्या लक्षात आले होते. दुर्दैवाने तोटय़ाची चर्चा आधी झाली. त्यामुळे सुरुवातीला गडबडून गेलो, पण ज्योतिषाने आश्वस्त केले. वधावन म्हणजे वाढणे, प्रगती असे तो सूचकपणे म्हणालाच होता. शेवटी फायदा झालाच. गदारोळाच्या काळात न बोलणेसुद्धा फायद्याचे ठरलेच की! राजकारणात शिक्षा आणि सन्मान यातली सीमारेषा बरेचदा धूसर असते. आता नोकरीपेशातसुद्धा तेच चित्र दिसू लागले. चौकशीच्या काळात अनेकांनी खरे बोला म्हणून आग्रह धरला, पण निष्ठेशी तडजोड करायची नाही असे ठरवले होते. ‘सब्र का फल मीठा होता है’ हे यांना कसे कळणार? राज्यकर्त्यांच्या मनात काय आहे हे ओळखता आले पाहिजे. नोकरीत खरे तर हाच गुण महत्त्वाचा. विचार करता करता साहेबांना झोप लागली. तिकडे मराठमोळ्या वाहनचालकाच्या डोक्यात वेगळेच विचार.. महाबळेश्वरचे पत्र त्यानेच नेऊन दिले, तेव्हाच हा साहेब व त्याला आदेश देणारे मनातून उतरले. ऊठसूट महाराजांचे नाव घेतात व कृती बघा कशी! त्या द्रष्टय़ा राजाची सर यांना कशी येणार? सहा वाजता गडाचे दरवाजे बंद होतात म्हणून वेशांतर करून आलेल्या महाराजांना अडवणारा रखवालदार आणि ‘खबरदार जर टाच मारून जाल पुढे, चिंधडय़ा उडवीन राई राई एवढय़ा’ हा पोवाडाही त्याला आठवला. आता तर नियम मोडून दार उघडणाऱ्यांना सुगीचे दिवस आले, या विचाराने खिन्न होत चालकाने वाहनाचा वेग वाढवला..!