कोरडाठाक दुष्काळ तसा गावाच्या पाचवीलाच पुजलेला.. पण कवितेचे पीक मात्र तरारून यायचे. प्यायचे पाणी आणायला ‘रेल्वे’ लागायची. पण दरघराआड जन्मलेले कवी मात्र शब्दांचा पाऊस बदाबदा पाडायचे. अशा या कवितेत भिजलेल्या दुष्काळी गावाचा सरपंच होण्याची पाटलांना भारी हौस! पदरची दोन एकर जमीन विकून पाटील मैदानात उतरले. प्रचाराचा धुरळा उडला.. सभा सजली.. पाटील माइकवर गरजले.. एकदा निवडून तर द्या, तुम्हाला तुमच्या कवितांसकट सातासमुद्रापार विश्व साहित्य संमेलनाच्या मंचावर नाही उभे केले तर पाटील नाव लावणार नाही! अद्याप गावची नदी पार न केलेले गावकरी हरखले.. त्यांचे मन कवितांच्या होडय़ांवर बसून सातासमुद्रांवर तरंगू लागले.

गावची झाडून सारी मते पाटलांना पडली अन् पाटील गुलाबी फेटा बांधून झोकात ग्रामपंचायतीत पोहोचले. पाहतात तर काय.. अख्खा गाव बॅगा भरून दारात उभा! पाटलांनी डोळ्यांनीच सावलीसारखे शेजारी उभे असलेल्या गोऱ्या दादांना विचारले, हे गाव कुठे निघालेय? दादांनी पाटलांसमोर टेबलावरचा पृथ्वीगोल धरला अन् त्याला गोलगोल फिरवत म्हणाले, ठेवा कुठेही बोट! पाटलांनी बोट ठेवले, त्याखालचे नाव होते.. सॅन होजे. पाटील चरकले, म्हणजे आता अख्ख्या गावाला सॅन होजेला न्यावे लागणार? दादांनी होकारार्थी मान हलवली आणि पाटलांनी आणखी पाच एकरांचा सातबारा मागवून घेतला. तेवढय़ात दादा म्हणाले, पाटील, हा सातबारा ठेवा खिशात. तिकडचाच एखादा हौशी शोधू आणि हे सगळे नवशे त्याच्या माथी मारू. आपलीही वारी फुकटात होऊन जाईल. दादांचे हे ऐकून पाटलांनी जुनी डायरी उघडली अन् लावला थेट आयएसडी सॅन होजेला. आपल्या मराठी मुलखाचे पाहुणे घरी येणार हे ऐकून बे एरियातली मराठी माणसे तर नाचायलाच लागली. तिकिटा ठरल्या, विमान उडाले अन् २४ तासांनी अवघे गाव पाटलांसह सॅन होजेत उतरले. मानपान जोरात झाले, पण पाटलांचे गाल मात्र फुगलेलेच. यजमानांनी धाडस करून विचारले. तर पाटील म्हणाले, कसंय, केशवसुतांनी कवितेला आकाशातली वीज संबोधले होते. त्या कडाडत्या विजेला पापण्यांवर झेलायचे म्हणजे डोळे तितके समर्थ नकोत? त्यासाठी तुमच्या हॉटेलबाहेरचा निसर्ग तितका प्रेरक असला पाहिजे ना! पण, तुम्ही ज्या हॉटेलात मला थांबवलंय तिथे सिलिकॉन व्हॅली तर सोडा पांढऱ्या पालीही दिसत नाहीत कविता सुचायला. पाटलांचे हे सुविचार ऐकून आयोजकांना त्यांची चूक लक्षात आली. त्यांनी लगेच पाटलांची खोली ‘हवेशीर’ केली. रानातली कविता हॉटेलात पोहोचली तशी झिंगू लागली. तशी पाटलांचीही कळी खुलली. मंच सजला, कवितांना बहर आला.  त्याच मंचाहून पाटील पुन्हा गरजले, आता पुढचे संमेलन थेट आमच्या शेतात होणार. या घोषणेप्रमाणे पुढच्या वर्षी संमेलन त्याच दुष्काळी गावात भरले. सॅन होजेचे पाहुणे आले. पाटलांनी त्यांना थेट शेतातल्या तंबूत पाठवले. पाहुणे म्हणाले, पाटील, एखादे हॉटेल नाही का? हे ऐकताच पाटलांचा पारा चढला. ते म्हणाले, केशवसुतांनी कवितेला आकाशातली वीज संबोधले होते. तिला झेलायचे म्हणजे हात कसे काळ्या आईच्या ढेकळांसारखे कणखर हवेत. म्हणूनच आम्ही तुम्हाला शेतात थांबवले. शेत ‘जीवनावश्यक’ गोष्ट आहे अन् तुम्ही ती हॉटेलात शोधताय. तुम्हाला दर्जेदार कविता ऐकायची आहे की गारगार हॉटेलात झोपायचे आहे? पाटलांचा सवाल ऐकून सॅन होजेचे पाहुणे मात्र संभ्रमात पडले. सिलिकॉन व्हॅली दिसत नाही म्हणून रुसून बसणाऱ्या पाटलांची हॉटेलातली ‘अर्वाचीन’ कविता गावात येताच ‘प्राचीन’ कशी झाली, या संभ्रमात सॅन होजेचे बिच्चारे पाहुणे शेतातल्या तंबूत वाकळ पांघरून झोपी गेले.