अधिवेशन सुरू असताना दिवसभरातील नारेबाजीने कान किटल्यावर रात्रीच्या नीरव शांततेत दिव्यांनी उजळलेली संसद न्याहाळणे हा बापूंचा नेहमीचा छंद. परवा आठ खासदारांनी त्यालाच छेद दिल्यावर बापू प्रारंभी हिरमुसले. या आठांचा धरणे सत्याग्रह रात्रीही चालणार, त्यासाठीची तयारी बघून बापूंचे कुतूहल जागे झाले. पंखे, चादरी, शिवाय दिमतीला अनेक कर्मचारी बघून वेळ, काळ व स्थळाची तमा न बाळगता देशभर केलेली उपोषणे आठवली. काळानुरूप बदल होणारच, अशी स्वत:ची समजूत काढत बापूंनी त्यांची चर्चा ऐकायला सुरुवात केली. देशाला स्वातंत्र्य मिळून लोकशाही स्थापित व्हावी म्हणून आपण दीर्घकाळ लढा दिला. कधी चर्चा तर कधी आंदोलन असे त्याचे स्वरूप राहिले. आजकाल राज्यकर्त्यांना चर्चेत रसच राहिला नाही. तेव्हा सारा देश पाठीशी असूनही धीर, संयम कधी सोडला नाही. आता तर देश पाठीशी असण्याचा अर्थच राज्यकर्त्यांनी बदलून टाकलेला दिसतो. चर्चेतून मैतक्य या संकल्पनेवर कुणाचा विश्वासच दिसत नाही. बहुमताचा भलताच अर्थ रूढ होतोय हे बघून बापूंचे मन दु:खी झाले. सोबतच या खासदारांच्या वर्तनाचाही त्यांना राग आलाच होता. ओडोमॉस लावल्यावरही एक डास चावल्याबरोबर जागा बदलणाऱ्या या नेत्यांकडे बघून बापूंना हसू आले. तुरुंगात डासाच्या सान्निध्यात काढलेली अनेक वर्षे त्यांना आठवली. ‘सत्याग्रह’ हा शब्द आपण जन्माला घातला तो किती उदात्त हेतूने! आजकाल राजकारणासाठी त्याचा सर्रास वापर होतो. शिवाय तो वापरताना हटकून माझा आधार घेतला जातो. सुरुवातीला याचे वाईट वाटायचे, आताशा काही तेही वाटत नाही. स्वातंत्र्यानंतरची काही दशके या आवारात असूनही वर्षांतून दोनदाच सर्वाना माझी आठवण यायची. आता ऊठसूठ अनेकजण रोज गर्दी करतात. मला अपेक्षित असलेल्या स्वातंत्र्याचा अर्थच यापैकी कुणाला अजून उमगलेला नाही हेच खरे!

विचार करता करताच बापूंचा डोळा लागला. भल्या पहाटे सुरू झालेल्या वर्दळीने त्यांना जाग आली तर हरिवंशजी चहा घेऊन आलेले. आपल्याला अजिबात आवडत नसलेल्या या पेयाचे २०१४ नंतर वाढलेले महत्त्व बघून बापूंना आधीच यातना व्हायच्या. त्यात सकाळी आणखी भर पडली. धरणेकऱ्यांनी चहा नाकारला पण त्यामागचे राजकीय कारण लक्षात आल्यावर बापू अधिकच दु:खी झाले. या साऱ्यांच्या अंगात लोकशाही रुजली की राजकारण, असा प्रश्न त्यांना पडला. नंतर कळले की हरिवंशांनी एक दिवसाचे उपोषण सुरू केलेय. तेवढय़ात शरद पवारांच्या अन्नत्यागाची चर्चा सुरू झाली. हे सारे कानावर पडताच बापू हळहळले. हरिवंशजींचे उपोषण चहा नाकारला म्हणून होते की वरिष्ठांच्या आदेशान्वये चर्चा होऊ दिली नाही म्हणून झालेल्या आत्मक्लेषासाठी? कायम संभ्रम निर्माण करणाऱ्या पवारांचा अन्नत्याग सभागृहात जाणीवपूर्वक गैरहजेरीसाठी होता की होत असलेली बदनामी टाळण्यासाठी? असे अनेक प्रश्न बापूंना पडू लागले. खरे तर उपोषण म्हणजे आत्मक्लेषातून आत्मशुद्धीकडे नेणारा मार्ग. त्यातून विरोधकांच्या मनात सद्भाव जागृत होणे हा त्यामागचा उद्देश. आता राजकारणासाठी सारेच त्याला तिलांजली देऊ लागलेले. शिवाय या साऱ्यांना माझ्या नावाचा आधार सुद्धा सोडायचा नाही. सारेच खेदजनक असे म्हणत बापूंनी पुन्हा नजर निश्चल केली. आता नव्या वास्तूत तरी हे असेच पाहावे लागू नये, अशी अपेक्षा बाळगत बापूंनी खाली बघितले तर सारे निघून गेले होते.