बरोबर एकच्या ठोक्याला एकाने, तर पाच मिनिटांनंतर दुसऱ्याने हॉटेलच्या लॉबीत प्रवेश करायचा असे ठरले होते. त्याप्रमाणे दोघेही आले व जेवण्याच्या टेबलवर स्थानापन्न झाले. दोघांनीही इकडेतिकडे बघितले. तेव्हा तिथे हजर असलेले तुरळक ग्राहक त्यांच्याकडेच बघत होते. एक तर तोंडात टाकण्यासाठी हातात घेतलेला घास तसाच ठेवून आ वासून बघत होता. त्याच्यावर झालेला परिणाम बघून दोघेही हसले.

भाऊ- एकमेकांना भरपूर शिव्या घातल्यावर आपण भेटतो आहोत.

राव- अहो, आमच्या शिव्या हे प्रेमच असते. महाजन, मुंढेंच्या लक्षात ते कधीचेच आले होते. त्यामुळे त्यांनी कधी मनावर घेतले नाही. तुम्हाला कळायला जरा उशीर झालेला दिसतो.

भाऊ- आम्ही नागपुरी माणसे. आमचे काम रोखठोक असते. शिव्या तर शिव्या, प्रेम तर प्रेम!

राव- कृपया रोखठोक हा शब्द वापरू नका. त्याचे पेटंट माझ्याकडे आहे. बरं, आमच्यावरचा तुमचा राग कमी कधी होणार ते सांगा.

भाऊ- राग तर राहणारच. मंगलाष्टके झाल्यावर ऐन हार घालण्याच्या वेळी मांडवातून तुम्ही पळून गेलात..

राव- (हसत) तोच आमचा झटका!

भाऊ- (थोडे मोठय़ाने हसत) मग आता आमचाही झटका तुम्ही अनुभवत आहातच की!

राव- हो, तेच बोलायचे होते. आपले शत्रुत्व नाही, लक्षात घ्या. तुम्ही तर रागाच्या भरात चौफेर हल्ले करत सुटले. सरकारी यंत्रणा, नटनटय़ा, थांबवा हो हे सगळे. आमच्या आदूची कारकीर्द आता कुठे सुरू झाली. हा साहेबांचा निरोप आहे.

भाऊ- मग या ना परत. उगीच ‘तीन तिघाडय़ा’त कशाला अडकता? आमचे दिल्लीचे नेतृत्व अहोरात्र देशसेवेसाठी झटत असताना त्यांच्याशी पंगा घेण्याची हिंमत कशाला करता?

राव- अहो, नेहरूसुद्धा देशासाठी झटत होते.

भाऊ- (संतापून) त्या नेहरूचे नाव घेऊ नका. आमच्या नेतृत्वाशी त्यांची तुलनाच होऊ शकत नाही. तसेही गेल्या सहा वर्षांत आम्ही बराचसा इतिहास पुसत आणलाय..

राव- बरं बुवा.. आमच्या साहेबांचा निरोप तेवढा लक्षात ठेवा. या यंत्रणांना आवरा जरा. हे अतिच होतेय. बाकी पुढचे पुढे बघून घेऊच की!

भाऊ- ठीक आहे. मी बोलतो दिल्लीशी. बरं, आजच्या भेटीसंदर्भात बाहेर स्पष्टीकरणे काय द्यायची ते सांगा.

राव- मी तो प्लान तयार करूनच आणला आहे. आमच्या मुखपत्रासाठी तुमची मुलाखत ठरवण्यासाठी ही भेट होती असे सर्वाना सांगू..

भाऊ- (हे ऐकताच भाऊंची कळी खुलली) हा चांगला प्लान आहे. मी त्यात बदल करतो. मुलाखत अन्कट कशी होईल यावर चर्चा झाल्याचे सांगतो. पण या भेटीमुळे आघाडी अस्वस्थ होईल ना! त्याचे काय?

राव- होऊ द्या. हे कळताच उद्या थोरले साहेब अस्वस्थ होत आमच्या साहेबांकडे जातील. आम्ही पलटी मारण्याच्या आधी आपणच का मारू नये असा विचार त्यांच्या डोक्यात घोळू लागेल. एकूणच करोना व शेतीची दैनावस्था या दोन्ही प्रश्नावरून जनतेचे लक्ष विचलित होईल.

भाऊ- खरंय. आम्ही गेल्या चार महिन्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी हेच करत आलोय. आता तर नवे डावपेच सुचेनासे झालेत. चला..

राव- बरोबर. चला तर! अहो पण जेवण..

भाऊ- मी तर घरूनच करून आलो.

राव- मी पण. तरीही पुरावा म्हणून न केलेल्या जेवणाचे बिल सोबत घेतो आणि ते मी सामना वाचत नाही असे म्हणू नका कधी.

भाऊ- (हसत) तुम्हीही तरुण भारत नावाचा पेपर आहे हेच मला ठाऊक नाही असे म्हणू नका.

दोघेही हस्तांदोलन करून पाच मिनिटांच्या अंतराने बाहेर पडतात.