उंची किती, वजन किती, बोलता किती.. असे म्हणत आमच्या राष्ट्रीय नेत्याला हिणवणाऱ्यांची आता तोंडेच बंद होतील. कशी, तर हा घ्या पुरावा. राष्ट्रीय पोषण आहार संस्थेने जाहीर केलेला. आता भारतीयांचे आदर्श वजन तब्बल पाच किलोंनी वाढले तर उंची तीन इंचांनी. आता सांगा देश प्रगतिपथावर नसता तर हे शक्य झाले असते का? येत्या सहा वर्षांपासून आम्ही हेच ओरडून सांगत होतो पण कुणी ऐकायलाच तयार नव्हते. आता कुणी म्हणेल की देशाच्या व नागरिकांच्या वजनाचा परस्पर काय संबंध? अहो, जेव्हा नागरिकांचे वजन वाढते तेव्हा आपसूकच देशाचे वाढते. त्यासाठी समर्थ व ५६ इंच छाती असलेले नेतृत्व लागते. ही सारी त्या नेतृत्वाची किमया! या सहा वर्षांत आमच्या नेत्याने देशातल्या प्रत्येकाचा विचार केला. त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घेतली. त्यामुळे प्रत्येकाचा आहार सुधारला आणि वजनात वाढ झाली. तरीही काही विरोधक म्हणतील भूक, कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू संपले का? गरीबी संपली का? या विरोधकांना अन्नातला केस तेवढा दिसतो. अरे, नसतील संपले हे प्रश्न पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत अन्न तर पोहोचले ना! कमालीची दूरदृष्टी असलेल्या या नेत्याने जगात देशाचे वजन वाढवले. त्यासाठी सतत दौरे केले. ते करताना प्रत्येकाच्या पोषणाकडेही लक्ष दिले. आता देशातील प्रतिष्ठित संस्थेने त्यावर मोहोर उमटवल्यावर तरी विरोधकांनी गप्प बसायला हवे. अच्छे दिन यालाच म्हणतात. अशा सकारात्मक बातम्या देशभक्ती प्रबळ करणाऱ्या असतात, यातून मान उंचावते ती नेत्याची, म्हणजेच पर्यायाने देशाची. तसेही करोनाच्या काळात खाणे वाढलेच होते. टाळेबंदीचा सकारात्मक परिणाम या सर्वेक्षणातून अखेर दिसलाच! आता काही म्हणतील, पायपीट करणाऱ्या मजुरांचे काय? त्यांच्याही खाण्याची काळजी घेतलीच की आमच्या परिवारातील लोकांनी. अन्नपाकिटांचे फोटो नाही पाहिले?

बरे हे सर्वेक्षण केवळ खात्यापित्या घरातल्या लोकांचे नव्हते. यावेळी अख्ख्या देशात सर्वेक्षण घडवून आणले. त्यामुळे कुजकट विरोधकांना खोट काढण्यासाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही. तरीही काही उपटसुंभ म्हणतीलच. नुसते वजन वाढून काय उपयोग? प्रतिष्ठेचे काय? अरे मूर्खानो वजन व प्रतिष्ठा हे आमच्या परिवाराच्या भाषेत समानार्थी शब्द आहेत. आमच्या नेत्याने टप्प्याटप्प्याने प्रत्येक नागरिकाचा स्तर उंचावण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. सहा वर्षांत पाच किलोची वाढ म्हणजे काय खायचे काम आहे? एकदा का शरीराचे वजन वाढले की मेंदूही प्रगल्भ होत जातो. त्यातून विकासासाठी नवी दृष्टी मिळते. प्रत्येकाला असे दिव्यज्ञान प्राप्त झाले की चौफेर प्रगतीचा वारू उधळणारच. वजनामुळे वाढलेल्या मेंदूत ज्ञानाचे अमृत पाजायला आमचे नेतृत्व आहेच की! त्यांचा प्रत्येक शब्द प्राण कंठाशी आणून ऐकणाऱ्यांची संख्या वाढतेय हल्ली! प्रगतीचेही काहीएक टप्पे असतात. त्यात वजन व उंचीचा समावेश असतो हे आजवर ठाऊकच नसेल ना? आता देशभर वेबिनार घेऊन आम्ही हा आनंद साजरा करणार आहोत. आहे कुणाची विरोध करण्याची हिंमत! तसा प्रयत्नही कुणी केला तर तुमची जागा तुरुंगात आहे हे लक्षात ठेवा! प्रगती व कायद्याच्या आड कुणी आलेले आम्हाला खपत नाही.