सध्या छोटय़ांनी मोठय़ांना घाबरवण्याचे दिवस आले आहेत. करोना हा केवढासा विषाणू, पण साऱ्या जगाची घाबरगुंडी उडवत आहे. या विषाणूचा हल्लासुद्धा टोळधाडीसारखाच एक प्रकार. जगाच्या कानाकोपऱ्यात मानवी शरीरांवर, श्वसनावरच करोनाची धाड आली आहे. धाड घालण्याची क्षमता असलेले एक सूक्ष्म रूप पृथ्वीतलावर अवतरले आहे हे बिचाऱ्या टोळांना कसे कळणार? गेले वर्षभर भरपूर पाऊस झाला. सारी जमीन हिरवीगार दिसू लागली. त्यामुळे ते मोठय़ा उत्साहात जगप्रवासाला निघाले. त्यांनी मानवाची भूक भागवणाऱ्या शेतीवरच डल्ला मारणे सुरू के ले. आपण चुकीच्या वेळी प्रवासाला निघालो याची जाणीव या टोळांना कशी होणार? शेवटी त्यांच्याही पोटापाण्याचा प्रश्न आहेच की! तर ही टोळांची टोळी राजस्थानातून देशात प्रवेश करती झाली. तिथली रखरखीत व कोरडी शेती बघून वैतागलेल्या या टोळांनी आश्रय तरी कु ठे घ्यावा, तर आयकर खात्याच्या कार्यालयात! या खात्यातील लोकांना अचानक धाडी घालण्याचा अनुभव असतो. त्यामुळे येथे काही तरी नक्की मिळणार असा समज कदाचित या टोळांनी करून घेतला असावा. शिवाय हे खाते असो वा आपण, दोघांचीही भूक मोठीच असते याची उपजत जाणीव या टोळांना झालेली असणार! एरवी धाडी घालण्यात सराईत असलेले आयकरवाले या धाडीने जाम घाबरले व कार्यालय सोडून पळाले हा भाग अलहिदा! तर आता या टोळांचे देशभ्रमण अगदी वेगात सुरू झाले आहे. त्यांची भूक तर मोठी आहेच. एकाच वेळी कैक टन हिरवा पाला फस्त करण्याची. अगदी राजकारण्यांच्या ‘निधी’-भुकेपेक्षा किती तरी पटीने जास्त. या टोळांना हे तरी कु ठे ठाऊक आहे की भारतातील राजकारणी आभासी टोळांमुळे त्रस्त आहेत ते! ‘ट्रोल’ म्हणवणाऱ्या या आभासी टोळभैरवांनी २०१४ पासून समाजमाध्यमांवर उच्छाद मांडला आहे. टोळ शेती नष्ट करते तर हे आभासी टोळ एखाद्याचे राजकीय पर्व! ज्यांनी या आभासी टोळांना जन्माला घातले तेच आता आभासी युगात वारंवार पडणाऱ्या या धाडींची तक्रार करू लागले आहेत. या धाडी टाकणाऱ्यांवर कारवाई करा, हे चुकीचे आहे असा टाहो फोडू लागले आहेत.

या धाडींचे मूळ जनक असलेल्या टोळांना कदाचित या नव्या घडामोडींची कल्पना नसावी, कारण अजून तरी त्यांनी या राजकारण्यांच्या हिरव्या झाडीत दडलेल्या बंगल्यांकडे मोर्चा वळवलेला नाही. आपलीच लघुरूपे वेगवेगळय़ा क्षेत्रांत तयार करून पेटंट कायद्याचा भंग केला म्हणून या टोळांनी खरे तर राजकारण्यांना, करोनाचा जनक असलेल्या चीनला जाब विचारायला हवा. शेती फस्त करून झाल्यावर कदाचित त्यांचे लक्ष याकडे वळेलही. सध्या मात्र टोळधाड जावी म्हणून शेतात नगारे, पिपाण्या, फवारे यांसारखे कै क उपाय केले जात आहेत. त्यात टोळांच्या काही झुंडी नष्टही झाल्या. आभासी युगातील टोळ व करोनाकाळातील विषाणूजन्य धाडींचे तसे नाही. त्यांना संपवण्याचा कितीही प्रयत्न के ला तरी नव्या रूपात ते डोकावतातच. या बदलाची नोंद घेत पुढील वर्षी नव्या रूपात यायचे या टोळांनी ठरवले तर..?