‘चार्ली स्पीकिंग, अटॅक ऑन पप्पू’ असा संदेश भाईकडून मिळताच रावसाहेबांच्या अंगात भरलेला आळस कुठल्या कुठे पळून गेला. वाटय़ाला आलेल्या खात्यात कवडीचे काम नाही, यामुळे तसेही ते वैतागले होतेच. त्या हाथरसच्या प्रकरणात सलग दोन दिवस लहान पडदा व्यापणाऱ्या राहुलवर वार करण्यासाठी आपली निवड केल्याचे बघून रावसाहेबांना एकदम तरतरी आली. वार असा करायचा की तो आयुष्यभर लक्षात राहिला पाहिजे, असा विचार मनात येताच त्यांनी सलग दोन दिवस वाहिन्यांनी दाखवलेले सर्व फुटेज अगदी बारकाईने बघायला सुरुवात केली. महामार्गावरचे त्याचे वेगाने पायी चालणे बघून इंदिरा गांधीच चालताहेत की काय, असा भास त्यांना होताच ते दचकले. आपला पक्ष कुठला आणि विचार कसला सुचतोय हे लक्षात येताच त्यांनी दोन्ही गालावर हात मारून घेत मनातला विचार काढून टाकला. फुटेज बघता बघता ते त्या निर्णायक क्षणावर आले. पोलिसांनी त्याला धक्का देणे, त्यात त्याचे पडणे, मग उठणे हे सारे तपशीलवार बघितल्यावर याची पडण्याची थिअरी खोटी ठरवायची असेल तर काय करायला हवे यावर रावसाहेब विचार करू लागले. अचानक त्यांना कल्पना सुचली. लगेच त्यांनी जालन्याला फोन करून २० विश्वासू कार्यकर्त्यांना दिल्लीला बोलावून घेतले. राहुलला त्यांच्या कार्यकर्त्यांनीच पाडले असे विधान करण्याआधी गर्दीत चालणे नेमके कसे असते, याचा सराव बंगल्याच्या आवारात करण्याचे त्यांनी ठरवले. सकाळी कार्यकर्ते पोहोचताच त्यांना फुटेज दाखवल्यावर सराव सुरू झाला. रावसाहेब पुढे व त्यांच्यामागे खेटून कार्यकर्ते, कधी मध्यम लयीत, कधी झपाझप, कधी वेगाने तर कधी जवळपास धावतच, असा चालण्याचा सराव सुरू झाला. योगींना बदनाम करण्यासाठी राहुलसमवेतच्या एखाद्या कार्यकर्त्यांनेच त्यांच्या पायात पाय अडकवून पाडले असू शकते, असा विचार साहेबांच्या मनात आला. लगेच त्यांनी कार्यकर्त्यांना तसे करायला लावले. ‘साल्यांनो, मला पाडू नका’ असे सांगण्यास ते विसरले नाहीत. दोन-चार प्रयत्नात महामार्गावरचा प्रसंग जसाच्या तसा उभा करण्यात या साऱ्यांना यश आले. पायात पाय अडकवून पाडण्यात वाकबगार असलेल्या कार्यकर्त्यांनी रावसाहेबांच्या सोबत चालणाऱ्या एकाला अगदी बेमालूमपणे पाडले. या सरावावर देखरेख ठेवणाऱ्या, बंगल्यातील सुरक्षारक्षकांच्यासुद्धा ते लक्षात आले नाही. लगेच त्यांनी भाईंना फोन करून कार्यकर्त्यांनीच पाडले असा प्रतिवाद करू का असे विचारले. तिकडून ‘ये मराठी लोग’ असे ऐकू आल्यावर चक्क गुजराथी शिवीच ऐकायला मिळाल्याने रावसाहेबांना घामच फुटला. त्याच्यावर टीका करताना तो राजपुत्र आहे हे ध्वनित झाले पाहिजे हे लक्षात ठेवा, असे दरडावून सांगत पलीकडून फोन बंद झाला. मग त्यांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. राहुलला गर्दीत चालण्याची सवय नाही या एकाच वाक्यात सारे काही आले हे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी सराव थांबवला. फोन करण्याची हिंमत होत नसल्याने त्यांनी या एका वाक्याचा संदेश टाईप करून भाईंना पाठवला. तिकडून ‘डन, चार्ली’ असे उत्तर येताच रावसाहेब माध्यमांना सामोरे जाण्यासाठी सज्ज झाले. तेवढय़ात एक उपटसुंभ कार्यकर्ता म्हणाला, ‘साहेब तुम्हाला पण गर्दीत चालता येत नाही हे आज दिसलेच.’ रावसाहेबांनी रागाने त्याच्याकडे बघत ‘बे गप रे तू’ असे म्हणत एक जोरदार मराठवाडी शिवी हासडली व सुहास्यवदनाने माध्यम कक्षात प्रवेश करते झाले.